ब्लॉग : चित्रपट परिक्षण – चंदू चॅम्पियन – मुरलीकांत पेटकर यांची प्रेरणादाई कथा – स्पॉइलर अलर्ट 

काही दिवसा पूर्वी शीतल देवी या हात नसलेल्या मुलीने एशिया गेम्स मध्ये पायाने धनुर्विद्या मध्ये पदक मिळवले होते. त्या वेळेस मला अतिशय नवल वाटले होते कारण तिला हात नसताना पदक मिळवले होते. त्यासाठी प्रचंड मेहनत आणि एकाग्रता ही तिच्या पदकातून साफ जाणवत होती. त्याच प्रमाणे आज एक असामान्य व्यक्तिरेखे वर चित्रपट आला आहे. त्यांचे नाव आहे “चंदू चॅम्पियन” आणि व्यक्तिरेखा “मुरलीकांत राजाराम पेटकर” यांच्या वर आधारित आहे.

       लहान मुरली त्याच्या मोठ्या भावा सोबत कराडच्या रेल्वे स्टेशन वर जातो. तिथे १०००० लोक खाशाबा जाधव यांच्या साठी त्यांच्या स्वागता साठी हजर असतात. खाशाबा जाधवखांद्या वर असतात तर मुरली भावाच्या खांद्यावर असतो. ते दृश्य छान चित्रित झाले आहे. संघर्ष केलेल्या योद्धा ला जेव्हा यश मिळते तेव्हा दुसर्‍या व्यक्ती साठी तो आपोआप प्रेरणा स्तोत्र बनत असतो. इथूनच “चंदू चॅम्पियन”ची खरी कथा चालू होते. खाशाबा जाधव त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन मुरलीकांतला ऑलिंपिक मध्ये पदक मिळवायचे असते. त्यासाठी तो लहान पणा प्रयत्न करत असतो पण त्याला सगळे “चंदू चॅम्पियन” म्हणून हिणवत असतात. या सगळ्या वर मात करून तो आपल्या ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करतो आणि विजय मिळवतो हीच चित्रपटाची कथा बेतली आहे.

       जेव्हा प्रेक्षकांना कथेचा शेवट माहीत असतो त्या वेळेस कथा व्यवस्थित फुलवली नसेल तर कथा कंटाळवाणे होण्याचा संभव असतो. पण शेवट माहिती असलेले कथानकाची जर नीट मांडणी केली आणि त्यात उत्तम अभिनय गुंफला तर चित्रपट उत्तम बनतो. “कार्तिक आर्यन” ने “मुरलीकांत राजाराम पेटकर” यांचे पात्र अतिशय उत्तम रित्या साकारले आहे. हा कार्तिकचा पर्यंतचा उत्कृष्ट अभिनय आहे. यात कार्तिक ने जीव ओतला आहे. लहानपण ते मोठेपणीचा “मुरलीकांत” हे अवस्थांतर अतिशय उत्तम आहे. कार्तिक ने तरुण ते म्हातारंपण पात्र जबरदस्त साकारुन अभिनयात चार चांद लावले आहेत. सगळ्या चित्रपटाचा भार आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलला आहे.

सह-कलाकारानी अतिशय छान काम केले आहे. सह-कलाकारानी यादी मोठी आहे. यात टोपास म्हणून राजपाल यादव. यशपाल शर्मा “मेजर उत्तम सिंग”, श्रेयश तळपडे “सचिन कांबळे”, भुवन अरोरा “कर्नल”, सोनाली कुळकर्णी “वार्ताहर”, हेमंगी कवी “आई”, विजय राज “टायगर” यांनी अतिशय छान पात्र रंगवलेली आहेत. त्यात विशेष उल्लेख विजय राज “टायगर” यांचा करावा लागेल. यांचा दोघा मधील काही संवाद अतिशय छान आहेत. गुरु शेवटी गुरुच असतो. तो शिष्यात आपल्या भूतकाळातील चुका टाळून वर्तमान काळातील स्वत:ला बघत असतो. विजय राज ने संयत अभिनय केला आहे.             

चित्रपटातील संगीत लक्षात राहील असे नाही. सत्यानाश गाणे कमी केले असते तर चित्रपटाची लांबी कमी झाली असती. भारतीय सेनेतील लढाईचे क्षण आणखी दाखवता आले असते. इतर गाणी सुद्धा विशेष लक्षात राहतील असे नाहीत. पण शेवटचे क्लायमॅक्स गाणे अतिशय छान चित्रित झाले आहे. स्पर्धेच्या शेवटी काही मिनिटात मुरलीकांत यांचा पूर्ण जीवन पट उलगडतो. त्यात त्यांच्यावर  झालेली दगडफेक, जीव वाचवून पळ काढणारा, असह्य पणे खुर्चीवर बसलेला, अवघड निर्णय घेणारा मुरलीकांत, आणि असे असंख्य क्षण त्यांच्या समोरून झरकण येतात. त्यामुळे शेवटचे १५ मिनिटे अतिशय सुरेख आहेत.

चित्रपटात काही दृश्य अतिशय कमाल आहेत जसे की हॉस्पिटल मधील दृश्य, मुरलीला जेव्हा ९ गोळ्या लागतात तो क्षण आणि मुरलीकांतला मेडल जिंकतो तो क्षण. असे सगळी दृश्य कमाल झाली आहेत. मध्यंतरा नंतर पकड घेणारी कथा, कार्तिक आर्यनच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेला, मुरलीकांत यांची प्रेरणादाई जीवनकथा आणि त्यावर उत्तम सादरीकरण, टोपासचा विनोद, विजय राज आणि कार्तिक आर्यन मधील संभाषण, उत्तमोतम लोकेशन, दिग्दर्शकाने पटकथेवर घेतलेली मेहनत. स्वभावातील आणि व्यक्तिरेखेतील विविध कंगोरे, आणि सह कलाकारांनी केलेले चोख अभिनय. यामुळे या चित्रपटाला मिळतात ५ पैकी ३.५ स्टार. चित्रपट पाहून आल्यावर प्रेक्षकांना फक्त कार्तिक आर्यनचा अभिनय, प्रेरणादाई कथा, गुरु-शिष्य यांच्यातील संवाद एव्हढेच लक्षात राहते. लक्षात राहत नसलेली सामान्य गाणी, फॅमिलीला सोबत कमी संवाद, एका खेळात उच्च कोटीचा संघर्ष दाखवता आला असता, लढाईचे क्षण आणखी फुलवता आले असते यामुळे चित्रपटाचे १.५ स्टार कमी होतात. पण हा उत्कृष्ट चित्रपट एकदा तरी बघितलाच पाहिजे.

Views: 295

Leave a Reply