स्टार ट्रेक कार्यक्रमासाठी मी २७ तारखेला सकाळी १०.३० वाजता निघालो. Primesandzooms (उपकरण भाड्याने देणारी संस्था) मधून काही उपकरणं घेतली. १.३० वाजता मी बस जवळ पोहोचलो. एका अनोख्या एक दिवसीय सफरीवर मी पहिले पाऊल टाकले. मी मढेघाटला ४.३० ला पोहोचलो. तिथे बऱ्याच वेळ सूर्यास्त आमची वाटच बघत होता.
स्टार गेझिंग ईवेंट हा कार्यक्रम स्टार ट्रेक आयोजित आणि SAS R&D च्या WOP (World of Parenting) या प्रकल्पा अंतर्गत घेण्यात आला होता. त्यात जवळपास ८०+ लोकांनी नोंदणी केली होती. कार्यक्रम पत्रिका भरगच्च होती आणि त्यात प्रमुख ३ भाग होते. १. दुर्बीण सत्र (Telescopic session) २. आकाश दर्शन सत्र (Sky Session) ३. संवाद (Interactive Session). पूर्ण रात्रभर तुम्ही हलणार सुद्धा नाही अशा सत्रांची रेलचेल होती. सोबत चहा, नाश्ता आणि जेवण यांचे सुद्धा अचूक वेळापत्रक होते. संवाद भागात प्रश्नोत्तरे आणि व्हिडीओ, माहिती, गप्पा गोष्टी यांची भरमार होती. प्रश्न व उत्तर असा लहान मुलांसाठी एक खास भाग होता. लहान मुले बहुतेक करून पहिल्या रांगेत होती आणि माझ्या बाजूला २ मुलं होती. प्रस्तुतकर्त्याने एखादा प्रश्न विचारला की १० सेकंदामध्ये पहिल्या रांगेतून किंवा माझ्या बाजूला बसलेले मुलं उत्तर देत होती. मोठ्यांना विचार करायला वेळ सुद्धा मिळत नव्हता. मला तर बहुतेक उत्तरं माहितीच नव्हती. अशा अवस्थेत मला “गेम ऑफ थ्रोन्स” एका संवादाची आठवण झाली “You know nothing, Jon Snow”. “अरविंद जगताप” यांनी कृष्णविवराची (Black hole) व्याख्या सांगा आणि कसे बनते असा प्रश्न विचारल्यावर काय उत्तर देणार. खगोलशास्त्रा विषयी माहिती नसल्याने माझ्यासाठी “You know nothing about Atronomy, Bhagwat” हे वाक्य जास्त लागू होईल. अरविंदने सविस्तर सांगितले की ताऱ्यामधील इंधन संपल्यानंतर ताऱ्याचे कृष्णविवर बनते. जसे की माणसाची वैचारिक बैठक संपली की माणूस अविचारी होतो. कृष्णविवर आजूबाजूचं सगळं फस्त करून टाकतो. त्याच प्रमाणे अविचारी माणसे सुद्धा पृथ्वी वरील संपदा नष्ट करून आपला स्वार्थ साधत आहेत.
मला शाळेत आणि वाचनात खगोलशास्त्राचे जेवढे ज्ञान मिळाले, त्यापेक्षा बऱ्याच पटीने एकाच दिवसात भरपूर ज्ञान मिळाले. शाळेत शिकवलेले आत्ता बहुतेक विसरलो असेल. प्रात्यक्षिक केल्यामुळे माझ्या माहितीत भरपूर भर पडली. लहानपणी एकदा मी माझ्या वही वर पत्ता लिहताना माझा गाव, तालुका पासून ते देश, ग्रह पर्यंत लिहिले होते. पहिल्या पानाचा अर्धा भाग तर पत्ता लिहिण्यात संपला होता. समजा ही माहिती लहानपणी असती तर वहीचे २ पान सुद्धा पुरली नसती. पत्ता लिहताना माझा गाव पासून सुरुवात करून पार आकाशगंगेच्या पुढे जाऊन ब्रह्मांड आणि मल्टीवर्स पर्यंत माहिती दिली असती. पृथ्वी चार गतीने फिरते “स्वतः भोवती, सूर्याभोवती, आकाशगंगेभोवती आणि विश्वाभोवती” आणि त्यामुळे आपण प्रत्येकी सेकंद ३९० किलोमीटरने फिरतो. फक्त पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे आपण स्थिर असतो. हे ऐकून मलाच गरगरायला लागले. आकाशगंगा कृष्णविवरा भोवती फिरते आणि एक दिवस तोच कृष्णविवर पृथ्वीला खाणार आहे. अमोलने सांगीतले की ते होण्यासाठी लाखो वर्ष जातील, म्हणल्यावर कुठे माझा जीव भांड्यात पडला.
3 आठवड्यापूर्वी माझे स्टार ट्रेक – स्टार गेझिंग ईवेंट साठी जाणे पक्के झाले. मी लहानपणी उन्हाळ्यात आमच्या घराच्या गच्चीवर झोपायचो. खरे तर झोपताना जेवढे तारे दिसायचे, त्या पुरताच माझा आणि ताऱ्याचा संबंध आहे. तरी पण आपण एकदा सितारे बघावे असे ठरवले. त्या सोबत माझ्या मधील फोटोग्राफीचा किडा मला स्टार ट्रेल्स (Star Trails) करण्यासाठी उद्युक्त करत होता आणि मला त्यातील काहीच माहित नव्हते. पण मला सचिन सरांनी कोणत्या अक्सेसरीज लागतील यांची माहिती दिली. कुठे भेटतील याची सुद्धा माहिती दिली. primesandzooms नोंदणी करण्यासाठी काही वेळ गेला. मी स्टार ट्रेल्स करण्याची आशाच सोडून दिली. पण दोन दिवस अगोदर नोंदणी पूर्ण झाली आणि परत माझ्या मधील फोटोग्राफीने उचल खाल्ली. मी लगेच सचिन सरांनी सोबत बसून कोणती लेन्स, अक्सेसरीज लागेल. याची चौकशी केली आणि लगेच काही उपकरणं primesandzooms वर भाड्यांनी मागवली. फक्त इंटरव्हालोमीटर हे उपकरण त्यांच्या कडे नव्हते. मग काय गुगल जिंदाबाद!! आणि त्याबद्दल परत माहिती काढली त्या विशिष्ट उपकरणासाठी कोणते मोफत अॅप आहे आणि त्यासाठी काय करावे लागेल. त्यात बराच वेळ गेला. मला आदल्या दिवशी स्टार ट्रेल्स टेस्टिंग करता आले नाही. केबल साठी बरीच पायपीट केली पण बसकडे जाताना ज्ञान प्रबोधनी येथील एका दुकानात केबल सापडली.
स्टार ट्रेक दिवशी स्टार ट्रेल्स टेस्टिंग केली पण हाय रे दैवा त्याच मोफत अॅपने धोका दिला. त्या विशिष्ट उपकरणाची सुविधा फक्त त्यांच्या पूर्ण आवृत्तीमध्ये दिली होती. परत नशीबाने कच खाल्ली. मी सहज प्रसाद यांच्या कडे चौकशी केली तर त्यांच्याकडे उपकरण उपलब्ध होते. प्रसाद आणि त्यांच्या मुलाने मला मला खूपच मदत केली. ते उपकरण घेऊन मी स्टार ट्रेल्सची टेस्टिंग पूर्ण केली आणि १०.०० ते १२.०० या वेळेत मी काही फोटो काढणार होतो. परत नशीबाने पुन्हा कच खाल्ली. जेवणानंतर बघतो तर काय आकाशावर ढगाचे साम्राज्य होते. सगळी मेहनत केराच्या टोपलीत गेली. असाच अनुभव मला गीर नॅशनल पार्कमध्येही आला होता. फोटोग्राफीमधे भयंकर संयम लागतो, हे परत एकदा सिद्ध झाले. माणूस कितीही प्रयत्न आणि प्रगती करू द्या, निसर्गा पुढे त्याला हात जोडूनच उभे राहावे लागते.
“राम फडणवीस” यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटला, जेव्हा त्यांनी सांगितले की पृथ्वी तिरकी होऊन फिरते. पृथ्वीचा अक्ष २३.४ अंशाने तिरपा फिरत असल्यामुळे वर्षभरात सहा ऋतु निर्माण होतात. फक्त ५ मिनिटात राम यांनी झाडांचा, ऋतुचा, चंद्राच्या गुरूत्वाकर्षण आणि आठवड्यातील प्रत्येक दिवसाचा सूर्यमालेतील ग्रहाचा संबंध सांगितला. खरे तर हे सगळे मला डोक्यावरून गेले, पण दुसर्यांदा परत समजावून सांगितले. बाकी प्रत्येकांनी छान माहिती दिली. दुर्बीण सत्रात मी जिथे ताऱ्यांचा जन्म होता असा ओरायन नेब्युला पाहिला. अनेकांनी पहाटे ३.३० वाजता शनी ग्रह आणि त्याची कडी, गुरु आणि त्या सोबत ४ चंद्र, वृश्चिक राशी, शुक्र, सप्तर्षी बघितला. लहान मुलांचा उत्साह बघण्यालायक होता. माझे काही २-३ लहान दोस्त सुद्धा झाले. त्यांच्या सोबत लहान होऊन गप्पा सुद्धा मारल्या. जाताना माझे लहान दोस्त निरोप घ्यायला विसरले नाहीत.
सुंदर सूर्योदय आणि अतिसुंदर सूर्यास्त बघून मन प्रसन्न होणार नाही का? मधे बराच वेळ ढगांचे साम्राज्य असल्यामुळे काही फोटो काढता आले नाहीत. हिरमोड झाला पण निसर्गापुढे कोणाचेही चालत नाही. एक आगंतुक पाहुणा येत होता, पण त्याला मागच्या मागे परतावं लागला. परिपूर्ण नियोजन आणि त्याला प्रामाणिक प्रयत्नांची जोड. माहितीचे भांडार आणि लहानांचा उत्साह यामुळे कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला. ८५० रुपयात तुम्हाला भरपूर मनोरंजन, माहितीचा खजिना, ताऱ्यांची, सौरमाला आणि आकाशगंगेची सफर, छान आल्हाददायक आणि खेळीमेळीचे वातावरण. एक सुंदर दिवस साजरा करण्यासाठी आणखी काय पाहिजे.
तळटीप: पुढील आठवड्यात ४ मे या तारखेला स्टार ट्रेक परत एकदा स्टार गेझिंग ईवेंट करणार आहे. जमल्यास तुम्ही जरूर जा.
काही क्षणचित्रे
|
प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – group photo |
|
प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – निलेश |
|
प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – स्वच्छंदी |
|
प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – दोस्त company |
|
प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – अमोल माहिती देताना |
|
प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – घाट |
|
प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – घाट |
|
प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – Style |
|
प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – Couple Goal |
|
प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – Family Goal |
|
प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – निरागस
प्रवासवर्णन – मढेघाट स्टॉर ट्रेक – अस्मादिक
|
Photo Courtesy: Star Trek Whatsapp group
Photo Courtesy: Star Trek Whatsapp group