ब्लॉग : चित्रपट परिक्षण – कांतारा: अ लिजेंड चॅप्टर १

‘कांतारा: अ लिजेंड चॅप्टर १’ हा चित्रपट म्हणजे २०२२ साली गाजलेल्या ‘कांतारा’  या चित्रपटाचा प्रीक्वेल अर्थात पूर्वकथा आहे. ‘कांतारा’ मध्ये लोककथा, दंतकथा, कथा मांडणी यांचा अनोखा संगम होता. शेवटी १५ मिनिटाचा क्लायमॅक्स या मुळे चित्रपट प्रचंड गाजला होता. ‘वराह रुपम’ गाणे विशेष लक्षात राहिले आणि आजही ‘वराह रुपम’ गाणे मी सतत ऐकतो. ‘कांतारा’ चित्रपटा मुळे ऋषभ शेट्टी हा दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता म्हणून उदयाला आला. मागे मी विशेष लेख ‘३ शेट्टी ऑफ कन्नडा इंडस्ट्री’ वाचला होता. त्यात ऋषभ शेट्टी, राज शेट्टी आणि रक्षित शेट्टी याबद्दल विशेष ओळख आणि माहिती होती.

पहिल्या भागातील काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे “कांतारा: चॅप्टर १” या चित्रपटात मिळतात. काही प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत आणि उत्तरे आणखी गडद होतात. कथा आपल्याला थेट चवथ्या दशकात कदंब राजसत्ता असलेल्या काळात घेऊन जाते. कथेत पंजूरली आणि गुलिगा दैवाची उत्पत्ति पासून पुढे कथा उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. जिथे निसर्ग, दैव, राजा, प्रजा आणि जंगलातील रहिवाशी यांचा अधिवास, संघर्ष, लालसा आणि भूत-कोला परंपरा यांचा प्रवास आहे. लोककथा, दंतकथा, निसर्ग आणि मनुष्य यांच्यातील नातेसंबंध आणि संघर्ष यांच्या पार्श्वभूमी वर कथा साकारलेली आहे. सोबत विनोदाचा तडका, सुरेख संगीताचा नजराणा, उत्तुंग अभिनयाचा आविष्कार, लढाईचा थरार, उच्च निर्मिती मूल्य आणि चित्रपटाचा शेवटी क्लायमॅक्स अतिशय वेगळ्या ऊंची वर नेऊन ठेवल्याने चित्रपट उत्तम जमून आला आहे.

चित्रपटात भव्य दिव्य सेट आहेत. कथेत कॅस्केडिंग प्रभाव जाणवतो. एका मागोमाग प्रसंगाची साखळी कथेत येत राहते. कथेच्या पहिल्या भाग चित्रपटाच्या पायाबांधणी आणि पात्र प्रस्थापित करण्या साठी खर्च झाला आहे. जणू काही पाऊस पडण्या अगोदर जमीन कसतात तसा. पण मध्यांतरा नंतर मात्र चित्रपट वेग पकडतो. कथानकात खोली आणि गती कधी कमी जास्त असल्याने प्रेक्षकांना समजेल थोडा वेळ लागू शकतो. शेवटच्या २५ मिनिटाचा क्लायमॅक्स हा वेगळ्याच अभिनय, कथानक आणि VFX या सगळ्यांना वेगळ्या उंची वर नेऊन ठेवल्याने हाच चित्रपटाचा उच्च बिंदू आहे. तोच उच्च बिंदू आपल्याला चित्रपट संपल्या नंतर सुद्धा अंगावर काटा आणतो.

दोन उत्तम गाणी ब्रह्मकलश आणि रिबेल गाणे लक्षात राहतात. त्याला ‘वराह रुपम’ या गाण्याची उंची गाठता आली नाही. संगीत दिग्दर्शक “B. Ajaneesh Loknath” यांनी दिले आहे. पार्श्वसंगीत दमदार आहे आणि युद्ध दृश्यांना, प्रसंगाना जादुई करत. चित्रपटाचे चित्रीकरण अतिशय सुरेख आहे. विशेषत: जंगलातील दृश्य, नदी, डोंगररांगा लक्षात राहतात. युद्धभूमी, भूतकोला दृश्य चित्रपटात जीव ओततात. यासाठी सिनेमॅटोग्राफर यांचे विशेष कौतुक करावे लागेल. VFX / ग्राफिक्स अतिशय दर्जेदार आणि भव्यदिव्य आहेत. वाघाचे दृश्य अतिशय समर्पक आहेत. काही ठिकाणी VFX मध्ये थोडी कमतरता आहे. कॉस्च्युम डिझायनर प्रगती शेट्टी यांनी चित्रपटाचा चवथ्या दशकातील काळ बघता उत्तम पोशाख निर्मिती केली आहे. आर्ट दिग्दर्शन आणि इतर तांत्रिक बाबी यांची गुणवत्ता चांगली आहे.

ध्वनी मिश्रण, गाणी, पार्श्व संगीत आणि भूतकोला दृश्यांचा परिणामकारक सिद्ध करते. कथा सूत्र पहिल्या भागात काही ठिकाणी कमजोर वाटते पण दुसऱ्या भागात उठावून दिसते. कथा समजायला थोडा वेळ लागू शकतो कारण अनेक संदर्भाची रसमिसळ आहे. शेवटी २-३ दृश्य अद्भुत आणि समर्पक आहेत. लोक पूजा, दंतकथा आणि युद्ध, लढाई आणि विनोद यांची सांगड घालणे अतिशय कठीण काम आहे. त्यामुळे काही लढाई प्रसंगात विनोद काही वेळ खटकतो. चित्रपट लांबी कमी असती तर चित्रपट आणखी परिणाम कारक झाला असता. काही ठिकाणी हिंदी अनुवाद परिणामकारक वाटत नाही. काही पात्राचा परिचय अपुरा आहे. काही उणिवा सोडल्या किंवा दुर्लक्ष केल्या तरी चित्रपट प्रेक्षकांना कधीही कंटाळवाणा करत नाही. “कांतारा: चॅप्टर १ उत्तुंग अभिनय, भूतकोला परंपरा प्रेक्षकांच्या अंतर्मनाला भिडणारा आध्यात्मिक अनुभव ठरतो.” मी या चित्रपटाला ५ पैकी ४.५ स्टार देतो.

Views: 177

Leave a Reply