भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित लेखक श्री शिवाजी सावंत लिखित “छावा” या कादंबरीवर आधारित आहे. “छावा” चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकरांनी केले आहे. संगीत ‘ए आर रहमान’ यांनी दिले आहे. ‘सौरभ गोस्वामी’ यांचे छायाचित्रण, कॉस्च्युम ‘शीतल शर्मा’, संवाद ‘ऋषी वीरमणी’ यांचे, चित्रपटाचे संपादन/एडिटिंग ‘मनीष प्रधान’ यांनी केले आहे. छत्रपती संभाजी महाराजाचा आकृतीबंध एका ३ तासाच्या चित्रपटात साकारणे शक्य नाही. महाराजाचा अनेक भाषा येत असत. शस्त्र आणि शास्त्र पारंगत होते. ‘बुध भूषण’, ‘नायकभेद’, ‘सातसतक’ आणि ‘नखशिखा’ अशी पुस्तके लिहिली आहे. “छावा” कादंबरीवर आधारित असल्याने फक्त बुऱ्हाणपूर स्वारी पासून पुढे असा घटनाक्रम दाखवला आहे. लक्ष्मण उतेकरांनी छत्रपती संभाजी महाराजाचे चरित्र मांडण्याचा केलेला धाडसी आणि तितकाच यशस्वी प्रयत्न आहे.
लेखक शिवाजी सावंत यांनी त्यांच्या छावा या कादंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांना सिंह आणि त्यांचा पुत्र संभाजी यांना सिंहाचा पिल्लू म्हणजेच छावा म्हटले आहे. ही उपमा पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजा साठी सार्थ लागू पडते. छत्रपती संभाजी महाराज यांची व्यक्तिरेखा प्रचंड ताकदीने साकारली विक्की कौशल या गुणी अभिनेत्याने साकारली आहे. विक्की कौशलने दमदार अभिनय केला आहे. क्षणभर सुद्धा पडद्यावर विक्की नसून स्वत: छत्रपती संभाजी महाराज आहेत असा विश्वास वाटतो. काय जबरदस्त अभिनय आहे. युद्ध, संवाद, डोळ्यातील चमक, छावाची डरकाळी /गर्जना असो, पत्नी सोबत बोलणे, अन्वयित यातना सहन करणे असो विक्की ने अक्षरश: हुबेहूब छत्रपती संभाजी महाराज हे पात्र उभारले आहे. तल्लख बुद्धी, संभाषण, पराकोटीचा पराक्रम, करारी भाव मुद्रा, शत्रूची क्रूरता सहन करताना, युद्धाचे नियोजन करताना, आणि कौटुंबिक परिस्थिती हाताळताना अश्या सगळ्या प्रसंगात जबरदस्त अभिनय सादरीकरण करून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. विक्कीला या वर्षीचं नॅशनल पुरस्कार नक्कीच मिळणार याची प्रचिती त्याच्या सिंह गर्जनेतूनच मिळतो. आज पासून छत्रपती संभाजी महाराज म्हटले तरी विक्की कौशलचाच चेहरा आपल्या समोर तरळेल.
अक्षय खन्ना याने ज्या प्रकारे साकारला आहे त्याला तोड नाही. अक्षयला तसे संवाद कमीच आहेत. पण आलमगीर औरंगजेब त्यांने फक्त देहबोली, चेहऱ्या वरील आव भाव, आणि डोळ्यांनी साकारला आहे. चेहऱ्यावर पसरलेले केस, आग ओकणारी नजर, परिणामकारक देहबोली असा जबरदस्त अभिनय केला आहे. बुऱ्हाणपूर बघून किमोन्श काढतानाचा प्रसंग अ-दर्जाचा चित्रित झाला आहे. धूर्त, चाणाक्ष, पाषाणहृदयी आलमगीर फक्त देहबोली, डोळ्याच्या हाव भावानेच प्रचंड ताकदीने साकारला आहे. प्रसंगी उद्विग्न, प्रसंगी प्रचंड चीड आणणारा, प्रसंगी नियोजन करणारा औरंगजेब अक्षय खन्नाने साकारला आहे. ‘रश्मिका मंदाना’ने महाराणी येसुबाई/श्री सखी संयत भूमिका साकारली आहे. रश्मिका भूमिकेला न्याय दिला आहे पण आवाज कधी-कधी खटकतो. विक्की आणि रश्मिका मधील केमिस्ट्री पडद्यावर दिसते. संभाजी महाराजाचा एवढा विश्वास श्री सखी वर का होता हे दाखवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
इतर सहाय्यक कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आहे. ‘आशुतोष राणा’ यांनी ‘हंबीरराव’ यांचे पात्र रंगवलेले आहे. ‘दिव्या दत्ता’ यांनी ‘सोयराबाई’, ‘विनीतकुमार सिंग’ यांनी ‘कवी कलश’, ‘नील भूपालम’ यांनी ‘अकबर’, ‘डायना पेंटी’ यांनी ‘झीनत’, ‘प्रदीपसिंह रावत’ यांनी ‘येसाजी कंक’ अशी कलाकाराची फौज आहे. ‘संतोष जुवेकर’ यांनी ‘रायजी मलगे’, ‘किरण करमरकर’ यांनी ‘अण्णाजी दत्तो’, ‘सारंग साठे’ यांनी ‘गणोजी शिर्के’, ‘सुव्रत जोशी’ यांनी ‘काणोजी शिर्के’ आणि इतर या सगळ्यांनी अतिशय चांगले काम केले आहे. विशेषत: ‘आशुतोष राणा’, ‘दिव्या दत्ता’, ‘प्रदीपसिंह रावत’, ‘किरण करमरकर’ ही अनुभवी मंडळीनी आपला दमदार प्रयोग सादर केला आहे. दिव्याचे अतिशय कमी संवाद असून सुद्धा आपली छाप सोडली आहे. ‘आशुतोष राणा’ नी नेहमी प्रमाणे उत्तम कामगिरी सादर केली आहे. ‘संतोष जुवेकर’ ने सुद्धा दमदार काम केले आहे. ‘विनीतकुमार सिंग’ आपल्या उत्कृष्ट संवादाने मन जिंकले आहे. त्यांचा संवाद ‘मैं नमक हू महाराज’ हे कानात गुंजरव करत राहते.
ज्यांना मराठ्यांचा किंवा छत्रपती संभाजी महाराजाचा इतिहास माहित आहे त्यांना कथा नक्कीच माहिती असणार पण ज्यांना छत्रपती संभाजी महाराजा बद्दल माहिती नाही त्यांना चित्रपट कथा समजायला थोडे कष्ट पडू शकतात. एक समांतर कथानक चालू असते महाराजचे अंतर्मन आईच्या मायेसाठी व्याकुळ असते ती कथा चित्रपटाच्या शेवटा पर्यंत जाऊन त्या समांतर कथेचे वर्तुळ पूर्ण होते. चित्रपटात प्रेक्षकांच्या नजरेत भरावेत असे उत्कृष्ट दृश्ये आहेत. चित्रपटात काही चुका आहेत जश्या महाराणी सोयराबाईचा अचानक शेवट दाखवला आहे. बुऱ्हाणपूर स्वारी का केली? लढाईची दृश्ये जी की पृथ्वी, जल, अग्नि, आकाश अश्या वेगवेगळ्या विषयावर आधारित आहे. पण लढाईची पार्श्वभूमी कळाली असती तर आणखी गुणवत्ता वाढली असती. सिंहा सोबतची लढाई दृश मध्येच कट केले आहे. ७ गाणी आहेत चित्रपटात पण फक्त १-२ लक्षात राहतात. पण पार्श्वसंगीत लढाई, शेवटच्या २०-३० मिनिटा साठी अतिशय परिणाम कारक आहे. चित्रपटात थोडीशी कमी असली तरी शेवटची २० – २५ मिनिटे सगळ्या गोष्टीची उणी भरून काढतात. अतिशय परिणामकारक, उत्कृष्ट दिग्दर्शन, अ दर्जा अभिनय, चित्रपटाचे सार आहेत शेवटची २० – २५ मिनिटे. वेषभूषा विभागाने मेहनत घेतलेली दिसत आहे. मेकअप विभागाने सुद्धा चांगले काम केले आहे. प्रॉडक्शन विभागाने सुद्धा गुणवत्ता पूर्ण काम केले आहे. व्हीफक्स(vfx) विभागाने छान काम केले आहे. व्हीफक्स चा अतिरेक नाही पण व्यवस्थित आहे. सगळ्यात कमाल तर डायलॉग लिहणाऱ्या केली त्यांना शाबासकी तर मिळालीच पाहिजे.
शेवटची २० – २५ मिनिटाचा चित्रपट पाहून प्रेक्षक भावनिक होऊन रडतोच. विक्कीचा नितांत सुंदर अभिनय, दिग्दर्शकाची उत्तम पकड, कादंबरी आधारित कथा, अक्षयचा देहबोलीतून जबरदस्त अभिनय, दमदार पटकथा, सह कलाकारांची मुबलक फौज, उत्तमोतम लोकेशन, परिणाम कारक संवाद, उत्तम पार्श्वसंगीत, माफक गाणी, श्वास रोखून धरणारी शेवटची २५ मिनिटे आणि या मुळे या चित्रपटाला मिळतात ५ पैकी ४.५ स्टार. हा चित्रपट कमीत कमी एक वेळेस तर नक्कीच पाहायला पाहिजे.

Views: 113
Masta review!