ब्लॉग : चित्रपट परिक्षण – छलांग – खेळाचा त्रिकोणी तडका

खेळावर आधारित चित्रपटात रोमांच पूर्ण, खेळातील चढ उतार, भावनिकदृष्ट्या पणाला लागलेली शक्ती आणि युक्ती, दोन खेळाडू मधील संघर्ष आणि खेळ प्रशिक्षण यावर असल्याने चित्रपट आपल्याला अतिशय भावतात आणि कथा जवळची वाटते. खेळावर आधारित चित्रपटात सांघिक भावना कशी निर्माण होते. एखादा खेळाडू महान बनण्यासाठी किती कष्ट करतो किंवा संघर्ष करतो असे दाखवतात. विविध खेळावर आज पर्यंत भरपूर चित्रपट आले आहेत. खेळावर आधारित माझे आवडते दोन चित्रपट ‘Mircle’ आणि ‘चक दे इंडिया’ आहेत. हे दोन्ही चित्रपट परत-परत जरी बघितले तरी प्रेरणा मिळते. पण आपल्याकडे तर “पढोगे लिखोगे बनोगे नवाब खेलोगे कूदोगे बनोगे खराब” हेच धोरण आधीपासून अवलंबले आहे. त्यातल्या त्यात क्रिकेट मध्ये पैसा असल्याने त्यामुळे क्रिकेट मध्ये जायला हरकत नाही अशी मानसिकता बनली आहे. इतर खेळात सुद्धा साईना नेहवाल, मेरी कोम सारखे स्टार खेळाडू आहेत. पण इतर खेळा बद्दल आज सुद्धा उदासीनता आहे. या मानसिकतेला तडा नाही पण ओरखडा ओढण्याचे काम हा चित्रपट करतो.

राजकुमार राव हा कसलेला अभिनेता आहे. राजकुमार राव आणि हंसल मेहता या जोडीने अतिशय उत्तम असे चित्रपट दिले आहेत. या चित्रपटात राजकुमार ने “मोंटू” पात्र साकारून अतिशय उत्तम अभिनय केला आहे. मी तर म्हणेन राजकुमार मुळेच चित्रपट बघणे सुसह्य होते. नुसरत भरूच्या ने “निलू” पात्र उत्तम रित्या साकारले आहे. कधी-कधी हरयाणवी उच्चारण कठीण वाटते. मोहम्मद झीशान यांनी “आकाश सिंग”, सतीश कौशिक, इला अरुण, सौरभ शुक्ला, जतीन सरना ऊर्फ ‘छत्रीवाला’ वाला डीम्पी, अशी दमदार स्टार कॉस्ट यात आहेत. “मोंटू”, “निलू”, “आकाश सिंग” यांचा प्रेमाचा त्रिकोण आणि त्यासाठी खेळाची पार्श्वभूमी, विनोदी तडका चित्रपटाचा जीव आहे.

अलीकडेच हंसल मेहता यांनी “स्कॅम १९९२” वेब सिरीज ही जबरदस्त बनवली आहे. त्यामुळे या चित्रपटा कडून अपेक्षा वाढल्या होत्या. मध्यांतरा पूर्वी चित्रपट संथ आणि रटाळ आहे. चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण आणि विनोदीचा चुरचुरीत तडका, खेळासाठी लढाई अशी भट्टी जमून आली आहे. मध्यांतरा नंतर चित्रपटाची गती वाढते. चित्रपटात काही बिनकामाच्या गोष्टी घूसवल्या आहेत. पण कथेवर आणखी काम करायला हवे होते. कथा आणखी दर्जेदार हवी होती. संगीत सुद्धा सुरेल असे हवे होते. इतर बाबतीत चित्रपटाचे दिग्दर्शन चांगले झाले आहे. पण ग्रामीण जीवनाशी सुसंगत पार्श्वभूमी असल्याने चित्रपट कंटाळवाणा होत नाही. मध्यांतरा नंतर काही भावनिक आणि निर्णायक क्षण छान जमून आले आहेत.

अतिशय उत्तम कास्टिंग, मुख्य पात्राचा अतिशय संयत आणि परिणामकारक अभिनय, सोबत इतर अभिनेत्याचा दर्जेदार अभिनय, हरयाणवी विनोदी तडका, दमदार सादरीकरण चित्रपटात आहे. चित्रपट संपल्या नंतर संगीत सुद्धा लक्षात राहत नाही. वैशिष्टपूर्ण अशी कथा नाही. पटकथेवर आणखी जोरदार काम करून उणीव कमी केल्या असत्या तर चित्रपट परिपूर्ण झाला असता. पण राजकुमार आणि इतर कास्टिंग साठी हा चित्रपट एकदा बघायला काहीच हरकत नाही. मुख्य पात्राचे दर्जेदार सादरीकरण, चांगले संपादन (Editing), उत्पादन मूल्य (Production value), सुंदर छायांकन (cinematography), चित्रीकरणासाठी निवडलेला साजेसा परिसर, उत्तम विनोदी तडका, खेळावर आधारित कथा यामुळे चित्रपटाला मी देतो २.५ स्टार. 

Views: 141

Leave a Reply