तुम्ही लहानपणी विक्रम वेताळाची गोष्ट नक्कीच वाचली असेल. विक्रम प्रत्येक वेळेस वेताळाला पकडतो आणि वेताळ त्याला प्रत्येक वेळेस एक गोष्ट सांगतो. गोष्ट संपल्या नंतर वेताळ प्रश्न विचारतो. राजा विक्रमादित्य ने जर उत्तर दिले नाही तर त्याच्या डोक्याचे हजार तुकडे होतील असे सांगतो. राजा विक्रमादित्यने उत्तर दिल्या नंतर मात्र वेताळ उडून जातो. अशीच कथा चित्रपटात रूपांतरित झाली तर काय होईल. कोणताही संदर्भ, घटना, गोष्टीला दोन पैलू असतात. दोन्ही पैलू पडताळून पहिल्या नंतरच खर उत्तर मिळते. कारण सत्य आणि असत्य मध्ये सुद्धा थोडसच अंतर असते.
एक बाजूला सत्याची बाजू दर्शवणारा कर्तव्यदक्ष, हुशार, तडफदार, बायको साठी प्रेमळ, सहकाऱ्यांना आदर्शवृत, सगळ्यांना आवडणारा आणि कडक शिस्तीचा पोलीस अधिकारी “आर. माधवन” ने पोलीस अधिकार्यांचे पात्र रंगवले आहे. त्याने आत्ता पर्यंत अठरा एंकाऊंटर केले आहेत. पण त्याच्या विचारसरणी मध्ये त्याने गुंड संपवले आहेत आणि त्यात त्याला काही गैर आणि चुकीचे वाटत नाही. त्यामुळे १८ लोकांना मारून सुद्धा त्याला शांत झोप लागते. “आर. माधवन” चा अभिनय एकदम सहज, अकृत्रिम, आणि संपन्न आहे. “आर. माधवन” या चित्रपटात देह बोलीतून, आवाजातून, अभिनय क्षमतेतून एक तंतोतंत पोलीस अधिकारी आणि तोही एंकाऊंटर स्पेशालिस्ट रंगवतो. माधवन असा गुणी अभिनेता आहे जो कोणतेही पात्र करताना जीव ओतून काम साकारतो.
दुसर्या बाजूला असत्याचे प्रतिनिधित्व करणारा क्रूर माफिया, थंड डोक्याने विचार करून १६ खून करणारा, गुंड प्रवृत्तिचा मनुष्य असतो. हा मनुष्य निर्दयी, हिंस्त्र पणाची एक-एक पायरी चढत माफिया बनलेला असतो. त्याची स्वत:ची टोळी असते. त्या टोळीच्या जोरावर, हिंमतीवर माफिया होऊन राज्य करतो. हे खलनायकी पात्र “विजय सेतुपती” नी वठवले आहे. पात्र रंगवताना खलनायकाचा आवेश, खुनशीपणा रंगवत, भूमिकेला योग्य न्याय्य दिला आहे. माफिया असून सुद्धा पोलिस स्टेशन मध्ये आरामात, सहज, बिनदिक्कत प्रवेश करतो. त्यानंतर सत्य/असत्य, चांगली आणि वाईट विचारसरणी, दृष्टिकोन, नैतिक आणि वाईट आचरण यांचा एक रहस्यमयी खेळ सुरू होतो.
परीक्षण – Scam 1992: The Harshad Mehta Story https://bhagwatbalshetwar.com/filmreview/2020/seriesscam1992review.html
चित्रपटाची सुरुवातच एका पोलीस एंकाऊंटरने होते. “विक्रम” वेधाच्या गुंडांना पकडून मारतो. त्यात एक सामान्य माणूस मारला जातो. तेथून चित्रपटाला खरी सुरुवात होते. त्या अगोदर राजा विक्रमादित्य आणि वेताळ यांची सृजनात्मक कथा दाखवण्यात येते. पण जेव्हा दोघं समोरा-समोर येतात तेव्हा वेधा विक्रमला नव-नवीन कथेच्या भूल भुलैयात अडकवून विक्रमची बुद्धीभेद करण्याचा सतत प्रयत्न करतो आणि नैतिक व अनैतिक च्या अंतरद्वंद्व मध्ये अडकवून टाकतो. आणि प्रत्येक कहाणीच्या शेवटी विचारतो की इथे कोणाचे चुकले आणि कोणाचे बरोबर आहे? विक्रम सुद्धा काही कच्च्या गुरूचा चेला नसतो. विक्रमचे उत्तर सुद्धा न्यायाला धरून असते.
चित्रपटाचा बाज जरी मारामारी, माफिया आणि गुन्हेगारी असला तरी कथा आणि पटकथेवर घेतलेली मेहनत स्पष्ट जाणवते. चित्रपटात दिग्दर्शकाने कथेत जीव ओतला आहे. छोट्या-छोट्या गोष्टीतून कमाल दाखवली आहे. माधवनचे काही दृश्य अतिशय उत्तम झाले आहेत. गुन्हा घडल्या नंतर माधवन घटना स्थळी जातो आणि गुन्हा कसा घडला असेल ते मनश्चक्षुनी कल्पना चित्र रेखाटतो. आणि त्यावर विचार करून गुन्हेगार पकडतो. असे दृश्य मी फास्ट आणि फुरीॉऊस या चित्रपटाच्या श्रृंखलेत पाहिले होते. अशी दृश्ये अतिशय उत्तम रित्या साकारली आहेत. “साऊथ च्या चित्रपटात लॉजिक नसते” असे आपण विनोदाने म्हणतो. पण या चित्रपटात पूर्ण कथाच लॉजिक वर उभी आहे.
चित्रपटातील इतर व्यक्तिरेखा सुद्धा लक्षात राहतील अश्या आहेत. “श्रद्धा श्रीनाथ” हिने विक्रमची बायको “प्रिया”, “काथीर” याने वेधाचा भाऊ “पुली”, “वरललक्ष्मी” हिने पुलीची मैत्रिण “चंद्रा”, विक्रमचा बॉस (सुरेन्द्र), सतनाम, गुंडाचा बॉस (चेता), इतर व्यक्तिरेखा चांगल्या झाल्या आहेत. सगळ्यानी आप-आपल्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे. वेधा आणि त्याच्या भावाचे, विक्रम आणि प्रिया यांचे भावविश्व सुंदररित्या दर्शवले आहे. पोलीस अधिकारी आणि त्यांच्या निगडीत प्रश्न, गुन्हेगारी विश्व दाखवले आहेत. दिग्दर्शकाने माणूस चांगला का वाईट या पेक्षा प्रत्येकाच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न कथेत पुरेपूर उतरला आहे. त्यामुळे दिग्दर्शक आणि चित्रपट लेखक चित्रपटाचा काय अर्थ सांगायचा आहे यात यशस्वी झाला आहेत. शेवट सुद्धा विचार करायला भाग पडणारा आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत सुद्धा चित्रपटाला साजेसे, गंभीर, आणि रहस्यमयी आहे. पार्श्वसंगीत मोक्याच्या क्षणी उत्कंठा वर्धक आहे. नायक आणि खलनायक या दोघांच्या भूमिका संगीताद्वारे उत्तम रित्या दाखवल्या आहेत. मी हिन्दी डब वर्जन बघितल्या मुळे गीत काही भावली नाहीत. चित्रपट गीते श्रवणीय किंवा विशेष लक्षात राहतील अशी नाहीत.
ब्लॉग : चित्रपट परिक्षण – छलांग – खेळाचा त्रिकोणी तडका https://bhagwatbalshetwar.com/filmreview/2020/seriesscam1992review.html
अतिशय उत्तम कास्टिंग, मुख्य पात्राचा जबरदस्त आणि दमदार अभिनय, सोबत इतर अभिनेत्याची सुंदर साथ, उत्तम कथा आणि तेवढीच चांगली पटकथा, वैविध्य पूर्ण सादरीकरण चित्रपटात आहे. इतर विभाग जसे की छायांकन, स्टंट, संपादन, सेट सजावट (Set Decoration), पोशाख डिझाइन, आर्ट आणि साऊंड विभाग या सगळ्या विभागानी आपले १०० टक्के योगदान दिले आहे. कथा, सादरीकरण, अभिनय, चांगले संपादन (Editing), उत्तम उत्पादन मूल्य (Production value), सोबत सुंदर छायांकन (cinematography) यामुळे चित्रपटाला मी देतो ४ स्टार.
Views: 543
Pingback: अद्वितीय अनुभव... - ब्लॉग : लेख : चित्रपट पार्श्वसंगीत (Back Ground Music)
Pingback: अद्वितीय अनुभव... - ब्लॉग : चित्रपट परिक्षण – '96 – तरल भावनेचा उत्कृष्ट आविष्कार