मागचे दोन आठवडे खेळाच्या बाबतीत खूपच वैविध्यपूर्ण होते. काही सुपरस्टार खेळपट्टी वर उदयाला आले आणि काही सुपरस्टार उत्तुंग कामगिरी करण्या अगोदरच विरघळले. पण काहीनी आपली जबरदस्त छाप सोडली आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रेक्षकाची मन जिंकली आणि कृतीतून आदरच काय हृदय सुद्धा जिंकले. मला त्यातील तीन ठळक उदाहरण दिसतात.
“हिमा दास” हिने IAAF संघटनेच्या वीस वर्षा खालील ४०० मीटरच्या जागतिक स्पर्धेत भाग घेऊन स्वर्ण पदकाची कमाई केली. तिने पदक मिळवणारी भारतातील पहिली महिला बनून इतिहास रचला आहे. तिने टेम्पेरे फिनलंड इथे ही कामगिरी साकारली. हिमा दासने ४०० मीटर पार करण्यासाठी फक्त ५१.४६ सेकंद घेतले. तिची कामगिरी ही ऐतिहासिक तर आहेच पण भारतीयांना अभिमानास्पद वाटणारी आहे. त्यासाठी हिमा दास यांचे मनापासून अभिनंदन.
पदक स्वीकारण्या अगोदर राष्ट्रगीताची धून लावली गेली त्यावेळेस हिमा दासचे हृदय उचंबळून आले आणि तिने स्वत: राष्ट्र गीत म्हणता-म्हणता तिचे अष्टसात्विक भाव जागृत होऊन अश्रु रूपाने प्रकट झाले. ज्या देशासाठी आपण प्रतिनिधित्व करतो त्या भारत देशासाठी आपण काहीतरी करू शकलो ही कृतज्ञता वाटली. साधे पण परिणामकारक वर्तन फक्त एक संवेदनशील मनुष्यच करू शकतो. आपल्याला प्रेक्षा ग्रहात राष्ट्रगीत ऐकायला त्रास होतो. एक खेळाडू म्हणून तिने वेगळीच उंची गाठली आहे पण माणूस म्हणून तिचे वेगळेपण तिने सिद्ध केले आहे. तिच्या वागण्यातून तिने एक सशक्त आणि राष्ट्राभिमानी खेळाडूची वाटचाल होत आहे हे दाखवून दिले. हिमा दासला माझा सलाम.
“किलीअन म्बाप्पे” या तरुण, तडफदार, युवा आणि 19 वर्षीय खेळाडूने फुटबॉल विश्व चषकावर नाव कोरले. त्याची चपळाई वाखाणण्या जोगी आहे. तो चित्त्याच्या चपळाईने विरुद्ध संघावर आक्रमण करतो. आलेल्या संधीचे सोन्यात रूपांतर करतो. तो फुटबॉलच्या क्षितिजावर उभरता सितारा आहे. त्याने विश्व चषकात खेळताना पेले सारख्या महान खेळाडूचा कित्ता गिरवत त्यांच्या काही पराक्रमाची बरोबरी केली आहे. नेमार, रोनाल्डो आणि मेस्सी यांच्या समोर दमदार कामगिरी करून आपण येणार्या भविष्य काळातील सितारा आहोत हे सिद्ध केले आहे. मला त्याची एक गोष्ट खूप आवडली त्याने तो एक सर्वोत्तम खेळाडू आहे हे तर सिद्ध केलेच पण माणूस म्हणून सुद्धा श्रेष्ठ आहे हे सुद्धा सप्रमाण दाखवले. त्याने विश्व चषका मध्ये मिळालेली सगळी रक्कम आणि कमाई जवळपास २३ करोड रुपये मदत म्हणून केली आहे. Preiers de Cordees association या संस्थेला त्यांनी ही मदत दिली आहे. तो काही जन्मजात श्रीमंत नाही. या गुणी खेळाडूचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्याने खूप कष्ट सोसून फ्रान्स संघात स्थान मिळवले आहे. त्याला “फिफा युवा खेळाडू पुरस्कार” प्राप्त झाला. आणि सर्वात युवा खेळाडूने विश्व चषकात गोल करून पेले यांच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली.
“नोवाक जोकोविच” या एकतीस वर्षीय सर्बिअन खेळाडूने तेरावे ग्रँड स्लॅम जिंकले. या गुणवान खेळाडूने आत्ता पर्यंत १३ ग्रँड स्लॅम, ५ ATP फॉयनल, ६ ऑस्ट्रेलिया ओपन, २ अमेरिका ओपन, १ फ्रेंच ओपन आणि इतर बऱ्याच काही महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. जोकोविच हा सर्वोत्तम टेनिसपटू मधील एक खेळाडू म्हणून गणला जातो. तेरावे ग्रँड स्लॅम जिंकल्या नंतर त्याने एक भावनिक आणि हृदयस्पर्शी पोस्ट केली. आपल्याला स्वत:चे गुणगान करायला आवडते पण आपण आपल्या चुका जगजाहीर करत नाही. त्या पोस्ट मध्ये त्याने त्याच्या जीवनातील कुटुंब, दुखापत आणि टेनिस बद्दल प्रेरणादायी पोस्ट लिहिली आहे. या खेळाडूच लग्न झाल्या नंतर त्याला कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव झाली. दुखापत झाल्यानंतर स्वत:च्या दोषाची आणि गुणाची उजळणी यांचा लेखाजोखा त्याने मांडला आहे. त्यावर जबरदस्त मात करून त्याने यशस्वी पुनरागमन केले आहे. असे करून या खेळाडूने सगळ्याचं मन जिंकलं आहे.
Views: 31