प्रकरण – भेट
मैत्रा ऑफिसच्या मैत्रिणी सोबत पार्टीचा आनंद लुटत होती. शहरातील ते एक नामांकित हॉटेल होते. हॉटेल इमारतीच्या छताच्या खुल्या जागेवर होते. संध्याकाळची वेळ… छान आल्हाददायक वातावरण… मंद सुटलेली हवा… यामुळे पार्टीचा माहोल बनला होता. मैत्राच्या मैत्रिणी सोबत मस्त गप्पा टप्पा चालल्या होत्या. पार्टी आता रंगात आली होती. मैत्राच्या मैत्रिणी बोलण्यात इतरत विखुरल्या होत्या. मैत्रा तिच्या जिवलग मैत्रिण किर्ती सोबत जेवणाचा पुरेपूर आस्वाद लुटत होती.
तेवढ्यात काहीतरी पडल्याच्या आवाज आला. कोणाचा तरी धक्का लागून वेटरच्या हातातून प्लेट पडली होती. त्यामुळे एका ग्राहकाचा शॅर्ट खराब झाला होता. हॉटेलचा व्यवस्थापक वेटरला रागवत होता आणि तो ग्राहक व्यवस्थापकाला वेटरला रागावू नका म्हणून विनंती करत होता. ग्राहकाने नम्र विनंती फळाला आली आणि वेटर शाब्दिक चकमकीतून सुटला. मैत्रा हे सगळे लांबून बघत होती. तिच्या लक्षात आले तो नम्र ग्राहक दुसरा तिसरा कोणी नसून तिच्याच ऑफिस मधला कर्मचारी मिहीर होता. अशी माणसे गर्दीच्या सागरात झाकले जातात, पण त्यांच्या जवळ जाताच चांगल्या गुणामुळे हिऱ्या प्रमाणे चमकतात.
मैत्रा आणि मिहीर दोघ उच्च विद्या विभूषित होते आणि मुंबईत एकाच कंपनीत काम करायचे. दोघांच्या रहाणीमानात खुप फरक होता. मिहीर हा दुसर्या विभागात काम करायचा त्यामुळे मैत्राला त्यांची जास्त ओळख नव्हती. पण त्याच्या बद्दल मैत्रा ने बरेच चांगले ऐकले होते. पण आजची आठवण खूपच ताजी होती. एका CSR (कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व) कार्यक्रमा साठी ते दोघं एकत्र आले. मात्र मिहीरला त्यांच्या दोघांच्या विचारातील फरक लगेच जाणवला. मैत्रा प्रत्येक वेळेस तिच्या मतावर ठाम राहणारी आणि कोणत्याही परिस्थितीत भूमिका तडजोड न करणारी मुलगी होती. मिहीर मात्र परिस्थितीतून मार्ग काढणारा होता आणि खूपच भावनिक होता. पण दोन विरुद्ध स्वभावाचे माणसे एकत्र आली आणि त्यांच्या विचाराची देवाण-घेवाण होऊन ते जवळ-जवळ येत गेली. मग कामा व्यतिरिक्त बाहेर फिरणे सुद्धा हळूहळू चालू झाले. कधी-कधी कॉफी शॉप, हॉटेल किंवा प्रेक्षणीय स्थळ फिरून झाली. मैत्राला एकदा फिरायला जाताना वाटले आपल्यावर कोणी तरी लक्ष ठेवतयं. पण परत तशी घटना घडली नसल्यामुळे तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. पण वेळ जात होता त्याप्रमाणे त्यांची मैत्री घट्ट होत होती.
एकदा फिरायला गेल्यावर मैत्राने मिहीरला विचारले की तुझ्या घरी कोण-कोण असते.
मिहीर उत्तरला “सध्या तरी मी एकटाच. दुसरे कोणी नाही”
“काही भूतकाळात होते आणि मी वर्तमानात जगत असल्यामुळे सध्या मी फक्त एकटाच आहे”
मैत्रा – “तुझे शिक्षण कुठे आणि कधी झाले?”
“माझे बारावी पर्यंत शिक्षण ग्रामीण भागात झाले आहे. त्यानंतर मी स्वत: कमवा आणि स्वत: शिका या तत्वा वर चालून मी इथ वर पोहोचलो आहे.” –मिहीर
मिहीरने त्याचे कॉलेज शिक्षण कुठे आणि कधी झाले याची माहिती सांगितली. हॉस्टेलच्या छान गमती- जमती सांगीतल्या. त्याने शिक्षण आणि नोकरी करताना त्याची कशी दमछाक व्हायची त्याच्या आठवणी सुद्धा उलगडल्या.
कुटुंबा बद्दल बोलायला मिहीर जास्त काही उत्सुक दिसला नाही आणि मैत्राने ही यावर खूप ताणले नाही. परत तो विषय तिने कधीच काढला नाही. मैत्रा मात्र तिच्या कुटुंबा विषयी भरभरून बोलत होती. तिच्या लहानपणाच्या आठवणीत ती रमून गेली. मिहीर सगळं उत्सुकतेने आणि तन्मयतेने ऐकत होता. मैत्रीत वेळ कसा जातो त्यांना कळलेच नाही. जवळपास ३ वर्ष निघून गेले आणि त्यांची मैत्री खूप घट्ट झाली आणि बघता-बघता मैत्राला मिहीर आवडायला लागला.
अवचित भेट…
चित्त सैरभैर…
भावनांना वाट…
जाणीवा सैरवैर…
प्रकरण – लग्न
मिहिरचे बालपण गावात झाले होते आणि मैत्रा शहरातील आधुनिक युवती होती. मिहीर मैत्राला फक्त जवळची मैत्रिण म्हणून मान्य होती. तो मैत्राशी एक जवळची मैत्रिण म्हणूनच तिच्यापाशी आपल्या भावना व्यक्त करायचा. त्याने कधी त्यापलीकडे विचार केला नाही पण मैत्राचा सहवास त्याला खूप आवडायचा. आधी कधी त्याची अशी द्विधा मनस्थिती झाली नव्हती. विचारातील फरकामुळे त्याला या प्रेमाची काही शाश्वती वाटत नव्हती. त्यामुळेच त्याने आपल्या मनाचा दरवाजा बंदच करून टाकला.
मैत्रा तर मिहीर मध्ये खूप गुरफटली होती. तिला मिहीर शिवाय काही सुचत नव्हते. ऑफिस मध्ये मिहीर, घरी असताना मिहीर सोबत बोलणे. सगळी कडेच मिहीर तिला दिसायला लागला. तिच्या विचारात सुद्धा मिहीर झळकायला लागला. ती मिहीरमय झाली. त्यामुळे कळत-नकळत मैत्रा मिहीरवर प्रेम करू लागली होती. किर्तीला सुद्धा ही गोष्ट माहीत होती. तिने मैत्राला सांगीतले की तू मिहीर जवळ मनातील भावना व्यक्त कर. पण मैत्राची इच्छा होती की मिहीरनेच तिला प्रपोज करावे. पण मिहीरला ते कधीच मान्य झाले नसते. त्यामुळे पेच निर्माण झाला होता.
पण ती समस्या किर्तीच्या मध्यस्थीने सुटली. कीर्ति दोघांची मैत्रिण होती. किर्तीला वाटायचे की दोघ एकमेकाला अनुरूप आहेत. किर्तीला मन जुळवायचे काम करायचे होते. एकदा नाष्टा करताना मिहीरने किर्तीला समजावून सांगीतले की दोघांच्या विचारसरणीत, रहाणीमानातील किती फरक आहे. त्याच्या स्वत:च्या मागे कुटुंबाची काही पार्श्वभूमी नाही. त्याच्या कडे आर्थिक पाठबळ सुद्धा नव्हते. त्याला कोणी आधारस्तंभ सुद्धा नव्हता. किर्तीने सगळी माहिती मैत्राला पुरवली. मैत्राने सगळ्या समस्या मान्य केल्या तरी पण तिचे मिहीर वरील प्रेम काही कमी झाले नाही.
मिहिरचे विचार बुरसटलेले नव्हते. तो या शहरातील वातावरणात पाण्यात जशी साखर विरघळते तसे तो वातावरणात मिसळून गेला होता. मिहिरने परत आपल्या मनाचा दरवाजा किलकिला करून मैत्रावरचे त्याचे प्रेम आणि मैत्राचे त्याच्या वरचे प्रेम यावर अभ्यास केला. प्रेमाचा झरोका बंद केल्यामुळे त्याची बेचैनी खूप वाढली होती. शेवटी त्याला मान्यच करावे लागले की त्याचेही मैत्रावर खूप प्रेम आहे. त्यामुळे त्याने मैत्राचे विचार मान्य केले आणि शेवटी त्याच्या कडे प्रपोज शिवाय काही पर्यायच नव्हता.
मैत्रा आज खुप आनंदात होती कारण मिहीरने तिला आकस्मित रित्या लग्नासाठी प्रपोज केले होते. त्याने प्रपोज करण्या अगोदर त्याच्या बद्दल सगळी माहिती सांगितली. यथावकाश त्यांचे लग्न जमले. सगळ्यांना खूप आनंद झाला कारण मैत्रा आणि मिहीर हे एक आदर्शवत जोडपे होणार होते. शेवटी एकदाचे विवाह नोंदणी कार्यालयात लग्न लागले. मिहीरचा वयाच्या २८व्या वर्षी मैत्रा सोबत लग्न होऊन त्यांचा राजा राणीचा संसार चालू झाला. घरात दोघेच असल्यामुळे काहीही वादविवाद होण्यास वावचं नव्हता. दोन वर्षा नंतर दोघांत तिसर्याचे आगमन झाले.
आस सोबतीची…
दमछाक मनाची…
मैत्री विचाराची…
भाषा जिवलगाची…
प्रकरण – कुटुंब
अचानक एक दिवस एक साठीतील महिला मिहीरला भेटायला आल्या. मैत्राला वाटले की कोणी तरी ओळखीची असेल. महिलेचा सोज्वळ चेहरा, कपाळावर थोड्या आठ्या, करारी आवाज मैत्राला जाणवला. ज्यावेळेस त्या बाई जवळ येऊन मैत्राचा चेहरा न्याहाळत होत्या त्यावेळेस मैत्राला खूप विचित्र वाटले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. डोळ्यातून काहीतरी सांगायचा त्या प्रयत्न करत होत्या. पण मैत्राला चेहर्यावर काहीच वाचता आले नाही. मिहिरच्या वागण्यात काही विशेष जवळीक जाणवली नाही. मिहीरला त्या दोन मिनिटे बोलल्या. बोलणे म्हणजे काय त्या महिलेने मिहिरला काहीतरी सांगीतले आणि मिहिरने नकार दर्शवण्यासाठी मान हलवली. जाताना त्या निराश दिसल्या. मैत्राने त्या स्त्रीबद्दल माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लागली.
मग त्या गेल्या नंतर मिहीरला विचारले त्या काकू कोण होत्या आणि का आल्या होत्या? मिहिर म्हणाला त्याचं नाव सुभद्रा आहे म्हणजे तुझ्या सासूबाई होत्या. मैत्राला जबरदस्त धक्का बसला. मैत्राला काय बोलावे हेच सुचेना. आत्ता गेलेल्या महिला दुसर्या तिसर्या कोणी नसून तिच्याच सासूबाई होत्या. आत्ता तिला कोडे पडले की आपल्या आईशी हा माणूस असा अलिप्त का वागला असेल? तिच्या मनात त्यांच्या बद्दल विचाराचे थैमान सुरू झाले. तिला आठवले मिहिरने तिला कधीच सासूबाई बद्दल सोडा कुटुंबा बद्दल सुद्धा सांगीतले नव्हते. ही अशी अचानक सासूबाईची भेट आणि मिहीरचे वागणे तिच्या काही पचनी पडत नव्हते. बरं त्यांनी सुद्धा आपली ओळख सांगीतली नाही की मी मिहीरची आई आहे. एवढ्या दिवसाच्या संसारात आणि लग्ना अगोदरच्या ओळखीत एकदा सुद्धा मिहीरने आईचे नाव काढले नाही. तिला काय गौडबंगाल आहे काहीच कळत नव्हते. मिहीरने कंपनीतील ओळखीपासून ते लग्ना पर्यंत कधीच नाव काढले नाही तेही आई असून सुद्धा. ऐकावे ते नवलच आणि बघावे ते नवलच. किती ही लपवले तरी आपल्या माणसा बद्दल आपुलकी आणि प्रेम डोळ्यात आणि वागण्यात दिसतेच. आणि तेच तिच्या सासूबाई डोळ्यातून सांगत होत्या.
मैत्राने मिहीरला या सगळ्यांचा खडसावून जाब विचारला. महत्त्वाची गोष्ट का लपवली यावर मैत्राने आगपाखड केली.
मैत्रा – “मिहीर तू मला विनाकारण फसवले आहेस? का असा वागलास माझ्याशी?”
मिहीर – “मी तुला माहिती दिली नाही. पण मी तुला फसवले नाही.”
मिहीर – “माझे कुटुंब जळगावच्या एका तालुक्याच्या ठिकाणी राहते. माझे शिक्षण तिथेच झाले. माझे माझ्या घरच्या सोबत पटत नसल्या मुळे मी त्यांच्या पासून वेगळा राहतो. मी त्यांना मागेच १० वर्षा खाली सोडून आलोय. आत्ता माझा त्यांच्याशी काहीच संबंध नाही. आणि मी हे सोडून काहीही लपवलेले नाही. आणि यामुळे तुला काय फरक पडणार आहे. तू तर आधुनिक आहेस आणि तुला सासू असली काय नसली काय फरक पडणार आहे? त्यांचा आपल्या संसारात काहीच अडसर नाही.”
मैत्रा – “हे तुला मला आधी सांगीतले असते तर बरे झाले असते. आणि तू तुझ्या जन्मदात्री आईला कसे काय विसरलास?”
“त्या इथे कशासाठी आल्या होत्या? काय बोलल्या.”
“त्या मला इथे भेटायला आल्या होत्या आणि समजावून सांगण्यासाठी की घरी कधी तरी येत जा?”
“मला माहिती नाही ते आधी त्यांना परत बोलवून घे आणि ठीक ओळख करून दे.”
मिहिरने त्यांच्या आईला फोन लावला तर त्या गावी परत निघाल्या होत्या.
कुटुंबाची पडझड…
मनाची घुसमट…
नात्याची धडपड…
जीवाची फरफट…
Views: 171