#ब्लॉग: INS Kavaratti आणि INS सिंधुकीर्ति – भाग २ – समुद्राच्या गर्भातील अदृश्य योद्ध्याची भेट
## पाणबुडीचा परिचय
भा. नौ. पो. सिंधुकीर्ति ही भारतीय नौदलातील किलो वर्गातील (सिंधुघोष क्लास) डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे. सोव्हिएत संघात तयार झालेली ही पाणबुडी १९८९ साली भारतीय नौदलात दाखल झाली. जवळपास चार दशकांपासून भारतीय सागरी सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या या अदृश्य योद्ध्याने अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे.
### तांत्रिक तपशील
लेफ्टनंटने सांगितले की भा. नौ. पो. सिंधुकीर्तिची लांबी सुमारे ७२.६ मीटर, रुंदी ९.९ मीटर आहे. ती पाणबुडी कमाल सुमारे ३०० मीटर खोली गाठू शकते. पूर्ण इंधनसाठ्यासह ती सुमारे ४५ दिवस मोहिमेवर कार्यरत राहू शकते. अंदाजे ५२-६८ कर्मचारी प्रवास करू शकतात. भा. नौ. पो. सिंधुकीर्तिचे विस्थापन २३०० टन (पृष्ठभागावर) / सुमारे ३००० टन (पाण्याखाली) आहे. भा. नौ. पो. सिंधुकीर्ति मध्ये 2 डिझेल जनरेटर, १ मुख्य इलेक्ट्रिक मोटर, सात-पाती प्रोपेलर आहे. पृष्ठभागावरील वेग १८-२२ किमी/तास, पाण्याखाली वेग साधारण ३१-३५ किमी/तास आहे.
## पाणबुडी पाण्याखाली कशी चालते?
पाणबुडी पाण्याखाली कशी चालते याचे उत्तर लगेच लेफ्टनंटने दिले. बॅलास्ट टँक्स हे मोठे टँक्स Outer Hull आणि Pressure Hull मधील जागेत असतात. बॅलास्ट टँक मधील हवा बाहेर सोडली जाते आणि समुद्राचे पाणी आत घेतले जाते. त्यामुळे पाणबुडी समुद्रात खाली जाते. टँक मधील समुद्राचे पाणी बाहेर फेकले जाते आणि High-pressure compressed हवा बॅलास्ट टँक्स मध्ये सोडली जाते. जेणे करून पाणबुडी पाण्यावर येते. Diving Planes हे विमानाच्या पंखांसारखे समोर आणि मागे असतात आणि यांचा उपयोग पाणबुडीचा कोन नियंत्रित करण्यासाठी होते. हे सर्व नियंत्रण कक्षातून केले जाते.
Bow Section विभागात टॉर्पेडो ट्यूब्स, सोनार उपकरणे सोबत काही सेन्सर प्रणाली असतात. समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवणे आणि शत्रू जहाजे किंवा पाणबुड्यांवर टॉर्पेडो डागणे ही या विभागाची प्रमुख कार्ये आहेत. ५३३ mm टॉर्पेडो ट्यूब्स असतात. टॉर्पेडो Reload प्रणाली असते. भा. नौ. पो. सिंधुकीर्ति मध्ये Klub-S क्षेपणास्त्र लॉन्च क्षमता आहे आणि समुद्री माईन्स वाहून नेण्याची क्षमता सुद्धा आहे.
### सोनार प्रणाली — पाणबुडीचे कान
सोनार विभागाला पाणबुडीचे कान मानले जाते. सोनारचे कार्य म्हणजे शत्रू जहाजे / पाणबुड्या शोधणे. पॅसिव्ह(Passive) सोनार, अॅक्टिव्ह(Active) सोनार, USHUS सोनार प्रणाली कार्यरत आहेत. लेफ्टनंटने सांगीतले की पॅसिव्ह सोनार फक्त समुद्रातील इतर जहाजे, पाणबुड्या किंवा प्रोपेलरमधून निर्माण होणारे आवाज ऐकते. गुप्त निरीक्षणासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरते आणि शत्रूला आपल्या उपस्थितीची चाहूलही लागत नाही. Active Sonar मध्ये पाणबुडी स्वत: ध्वनी लहरी समुद्रात पाठवते. त्या लहरी एखाद्या वस्तूवर आदळून परत येतात आणि त्यावरून अंतर, दिशा, वेग, वस्तूचा आकार यांचा अंदाज काढला जातो. त्याद्वारे लक्ष्याचे अचूक स्थान निश्चित करता येते. USHUS हे पॅसिव्ह + अॅक्टिव्ह दोन्ही प्रकारचे एकत्रित आधुनिक सोनार प्रणाली आहे.
## बहुउद्देशीय कक्ष
लेफ्टनंटने आम्हाला एका छोट्याश्या खोलीमध्ये नेले. तो एक बहुउद्देशीय कक्ष होता. गरजेनुसार या एकाच कक्षाचा विविध उद्देशांसाठी वापर केला जातो. त्या कक्षाचा वापर कधी डायनिंगसाठी, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर म्हणून आणि कधी लहान समारंभासाठी सुद्धा वापर होतो. तिथे एका भिंतीवर टीव्ही, दुसर्या भिंतीवर लहान पण भा. नौ. पो. सिंधुकीर्तिची प्रतिकृती होती. प्रतिकृतीवर भा. नौ. पो. सिंधुकीर्तिचा ओळख क्रमांक S61 अलंकृत केलेला होता. आणि बोध चिन्हात ‘हिंसक देवमासा’ (Killer Whale) आहे. ज्याला ‘ओर्का’ (Orca) असेही म्हणतात. बोधवाक्य “अविनाशी • अजिंक्य • अपराजेय” आहे. लेफ्टनंटने सांगीतले थोड्याच दिवसांपूर्वी एका मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे. ही मिसाइल लक्ष्याच्या आरपार भेदून मारा करू शकते. कितीही मोठे किंवा लहान जहाज/वस्तू असले तरीही कमी आकाराच्या जागेत सुद्धा अचूक ठिकाणी लक्ष्याचा अचूक वेध घेण्याच्या क्षमतेमुळे हे क्षेपणास्त्र अत्यंत प्रभावी मानले जाते. तेथून निरोप घेऊन आम्ही पुढे नियंत्रण कक्षाकडे निघालो.
## नौसैनिकांची निवास व्यवस्था
त्यानंतर लेफ्टनंटने आम्हाला नाविक निवास विभाग दाखवला. तिथे जवळपास रेल्वे स्लीपरसारखे १८ बर्थ दिसले. तिथे नौसैनिकांना दर ६ तासांनंतर आराम करता येतो. स्वयंपाकघर व भोजन विभाग सुद्धा दाखवला. त्यात फक्त दोन स्वयंपाकाला उभे राहता येत होते.
## डिझेल इंजिन विभाग
त्यानंतर लेफ्टनंट आम्हाला डिझेल इंजिन विभाग घेऊन गेला. हा विभाग पृष्ठभागावर किंवा स्नॉर्कल मोडमध्ये कार्यरत असतो. यात बॅटरी चार्ज करणे, Propulsion प्रणाली चालवणे आणि यात डिझेल जनरेटर आणि सहायक प्रणाली प्रस्थापित केलेली असते.
## पाणबुडीतील जीवनाचे कठोरपण
विशेष म्हणजे पाणबुडीतील जीवन अत्यंत कठीण असते. सूर्यप्रकाश नाही, मोबाईल नेटवर्क नाही, बाहेरील जगाशी मर्यादित संपर्क आणि सतत सतर्क राहण्याची जबाबदारी. अनेक दिवस समुद्राच्या खोल पाण्यात राहूनही भारतीय नौदलाचे जवान अत्यंत शांतपणे आणि धैर्याने देशसेवा करतात, याची जाणीव त्या भेटीत प्रकर्षाने झाली.
भा. नौ. पो. सिंधुकीर्तिने अनेक वर्षे भारतीय नौदलात कार्य करताना विविध आधुनिकीकरण प्रक्रियाही अनुभवल्या आहेत. विशाखापट्टणम येथील हिंदुस्तान शिपयार्ड मध्ये तिचे मोठे मिडलाईफ रिफिट करण्यात आले होते. त्यानंतर ती अधिक आधुनिक शस्त्रसज्ज आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम बनली.
पाणबुडीच्या बाहेर पडताना मनात एक वेगळाच अभिमान दाटून आला. समुद्राच्या गर्भात शांतपणे कार्य करणाऱ्या या अदृश्य योद्ध्यांमुळेच भारताची सागरी सीमा सुरक्षित आहे. युद्धकाळ असो किंवा शांततेचा काळ — भारतीय नौदलाचे योगदान नेहमीच अतुलनीय राहिले आहे.
शब्द/Long Form
FOSM – Flag Officer Submarines
SONAR – Sound Navigation and Ranging
आयएनएस – INS – Indian Naval Ship
ASW – Anti-Submarine Warfare अँटी-सबमरीन वॉरफेअर
भा. नौ. पो. – भारतीय नौसेना पोत
GRSE – Garden Reach Shipbuilders & Engineers Ltd
DND – Directorate of Naval Design
Views: 3

