दि. 25 नोव्हेंबर 2021
मित्र अभिजीत,
नमस्कार विनंती विशेष,
पत्रास कारण की …
माणसाने स्वप्न आणि प्रगती करण्याची इच्छा दर्शवणे आणि त्यासाठी संकल्प करणे आणि विशेष प्रयत्न करून तडीस नेणे ही उद्योजक बनण्याची पहिली पायरी आहे. मला आठवते तू प्रसिद्ध “येवले” चहा franchise साठी प्रयत्न केला होता. “The secret of getting ahead is getting started. – Sally Berger”. सॅली यांनी म्हंटल्या प्रमाणे तू आता मित्रा सोबत उद्योजक होण्याचे पहिले पाऊल “मैत्री कट्टा हॉटेल” च्या उद्घाटनाने टाकत आहेस. तू जेव्हा “मैत्री कट्टा” ची माहिती देत होतास त्या वेळेस मला काहीही विशेष वाटले नाही. कारण मला माहिती होते, तुला उद्योग जगतात येण्याची तीव्र इच्छा काही स्वस्थ बसू देणार नाही. “येवले” नंतर तू या गोष्टीचा पाठपुरावा करतच असशील आणि योग्य वेळ येताच त्यातून सुसंधी निर्माण करत उद्योग जगताला जवळ करशील आणि झालेही तसेच. माझ्या वडीलांनी सुद्धा त्यांच्या तिशीत असताना 7-8 प्रकारचे व्यवसाय केले होते. आज ही त्यांना व्यवसाय करण्याची अनावर इच्छा आहे. यशस्वी होण्यासाठी लागणारे गुण जसे की गुणवत्ता, नियोजन, चिकाटी, जोखीम व्यवस्थापन, सुसंघटितपणा या तुझ्या मध्ये आधीच आहेत. फक्त त्याचा योग्य वेळी योग्य वापर झाला की अर्धी लढाई तू जिंकशील. ज्या प्रमाणे तू तंदरुस्त होण्यासाठी जेवढी मेहनत करतोस त्याच प्रमाणे व्यवसायात सुद्धा तू नक्कीच मेहनत करशील याची खात्री आहे.
फक्त नोकरीचा चोखंदळ मार्ग स्वीकार न करता उद्योगाच्या क्षितिजावर तू सप्तरंगी इंद्रधनुष्यात पहिला रंग भरायला निघाला आहेस. मला माहीत आहे. हा मार्ग वाटेल तेवढा सोपा, सरळ, आणि धोपट मार्ग नाही. त्यासाठी तुला काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतील आणि काही गोष्टी नव्याने शिकाव्या लागतील. कुठे-कुठे तडजोड ही करावी लागेल. अभिजीत तू पहिल्या पायरी साठी योग्य नियोजन आणि कर्तव्य दक्ष राहून मार्गक्रमण करत आहेस. नोकरी आणि उद्योग या जरी दोन वेगळ्या गोष्टी असतील तरी दोन्ही तू त्याच ताकदीने पार पडशील हा आत्मविश्वास मला तुझ्यात दिसतो. त्यासाठी आवश्यक असणार्या गोष्टीची पूर्तता, पाठ पुरावा तू नक्की करतच असशील.
तू तुझे प्रयत्न, कष्ट, आणि ग्राहकांना उत्तम सेवा देणे चालू ठेव. संपत्ती, भरभराट, आणि हुशारी आपोआप तुझ्या दरवाज्या वर चालत येईल. जाणकार आणि ग्राहकांची मत तू जरूर विचारात घेत जा. या नवीन प्रवासात तुला उत्तमोतम लोकांची साथ व विविध परिस्थिती हाताळण्याचे सामर्थ्य मिळो. त्या सोबत तुझा प्रवास चांगला, आणि सुकर होवो. मराठी माणसाने व्यवसाय जरूर करावा आणि यशस्वी करून दाखवावा या मताचा मी आहे. पुढील पाच वर्षात व्यवसाया साठी काय करता येईल या गोष्टीचा नक्की विचार कर. तो तू नक्की करशीलच. मला तरी वाटत नाही की फक्त या उद्घाटनावर तुझ्या प्रगतीची गाडी थांबेल. व्यवसाय या क्षेत्रात तुझी उत्तम भरभराट व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो.
तुझा मित्र
भागवत बलशेटवार
हॉटेल लोकेशन – https://g.co/kgs/tLYUar
उद्घाटनसमारंभ क्षणचित्रे
Views: 159