ब्लॉग : चित्रपट परिक्षण – ‘सरदार उधम’ – उत्कृष्ट कलाकृती

२०१४ साली मी अमृतसर ला अमरनाथ यात्रे निमित्त गेलो होतो. तिथे मी सुवर्ण मंदीरा सोबत जालियनवाला बाग स्मारका ला भेट दिली होती. तिथे मला इतिहासा मधील “जालियनवाला बाग” हत्याकांड आठवले. भिंतीत घुसलेल्या गोळ्या आणि त्या पाहून लोकांवर इंग्रजांनी काय, किती आणि कसे भयानक अत्याचार केले असतील त्याची पुसट शी कल्पना येते. या हत्याकांडाच्या जखमेची खूण इतिहासाच्या पानात बाजूला पडली आहे. या जखमेला भारतीयांनी कधीही पुरेसा न्याय दिलाच नाही. आणि स्मारक बघून आपण त्यातील शहीदांना आदरांजली न वाहता निघून जातो. पण “सरदार उधम” या चित्रपटाने या घटनेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

मला आधी वाटले की बॉलीवुडचा चित्रपट आहे. मग त्यात मारधाड, त्वेषाने बोललेले संवाद, अपूर्ण माहिती, वाद विवाद, अति भडक मसाला, व्यक्तिरेखेला सुपर हीरो दाखवायचा अट्टाहास, असे काहीसे किंवा कमी जास्त प्रमाणात या सगळ्यांचे मिश्रण असा चित्रपट असेल. एखादी गोळी घ्यावी तसे चित्रपट पहिल्यावर हात आपटून केलेला जयजयकार. असे या चित्रपटात काही नाही. इतर देशभक्ती पर चित्रपटात जशी दाखवली तशी ट्रीटमेंट कथेला नाही.

“सरदार उधम” एक वेगळ्याच धाटणीचा देशभक्ती पर चित्रपट आहे. “विक्की कौशल” या गुणी कलाकाराने या चित्रपटाचा पूर्ण आलेख आपल्या मजबूत खांद्या वर लीलया पेलला आहे. आधी वाटले या अभिनेत्याने “उरी: सर्जिकल स्ट्राइक” या चित्रपटा प्रमाणे स्वत:ला टाइपकास्ट करून घेतले असेल. पण या चित्रपटात त्याचा अभिनय बघून तुमचे डोळे दिपतील. या साठी “विक्की” ला हजार वेळा सलाम. मानले ब्बा “विक्की” च्या अभिनयाला. व्यक्तिरेखेला “विक्की” ने असे काही साकारले आहे की हा चित्रपट बघताना डोळ्यासमोर “विक्की” न दिसता फक्त “सरदार उधम सिंग” च दिसतात. अतिशय तंतोतंत, डोळ्यात अंगार, चेहर्‍यावर शांतता, जबरदस्त देह बोली, हत्याकांडाची विवशता, दु:ख बघून करपून गेलेले हास्य, भडक संवाद न देता, फक्त डोळ्यानीच केलेला उत्कृष्ट अभिनय, समोर मरण असताना साकारलेले क्षण, अशी सगळी चित्रपटातील दृश्य कमालीच्या ताकदीने साकारली आहेत. या वर्षीची सगळी अवॉर्ड विक्कीलाच मिळणार म्हणजे मिळणार.     

कथा, पटकथा अतिशय ओळखीची म्हणजे दिसायला साधी सोपी पण आतून अतिशय अवघड आहे. “जालियनवाला बाग” हत्याकांड आणि त्या नंतर २० वर्षानी “सरदार उधम” यांनी घेतलेला बदला या वर कथा आधारित आहे. पण कथे मागे लपलेला इतिहास दिग्दर्शक आपल्या विशिष्ट खुबीने उकलत जातो. दिग्दर्शका ने या चित्रपटा ला टिपिकल बॉलीवुड टच न देता एक वेगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट दिली आहे. त्यामुळे हा वेगळ्याच धाटणीचा आणि वरच्या स्तराचा चित्रपट झाला आहे. इंग्लीश अभिनेत्याच्या तोंडी उगाच हिंदीची वाट लावणारे संवाद नसून पूर्ण इंग्रजी संवाद आहेत. त्यामुळे चित्रपट एक प्रकारचा खरा, अस्सल वाटतो. कथा शेवटचा अर्धा तास म्हणजे दिग्दर्शकाचा कस न लागता प्रेक्षकांचा कस लागतो.  शेवटच्या ३०-३५ मिनिटा साठी या चित्रपटाला masterpiece म्हणावेच लागेल. उत्कृष्ट, जबरदस्त, आणि जेवढी विशेषणे असतील तेवढी विशेषणे लावली तरी कमीच आहेत. ‘उधम सिंग’ यांना ‘ओ’ड्वायर’ यांचा खून करायला भरपूर संधी मिळतात. पण ‘उधम सिंग’ यांना ‘ओ’ड्वायर’ यांची हत्या करायची होती का? इंग्रजा विरुद्ध विद्रोह हे चित्रपटात बघणे श्रेयस्कर ठरेल.    

एकही भडक संवाद नाही की गळा फोडून बोलणे नाही. १९४० सालातील लंडन, भारत आणि इतर लोकेशन अतिशय सुंदर रित्या चित्रित केले आहेत. कुठेही हा सेट आहे जाणवत नाही. महत्त्वाचे म्हणजे सिनेमॅटोग्राफीचा कस लागला आहे. पण या कामात कुठेही ते उणे पडले नाहीत. जबरदस्त काम म्हणावे लागेल. सपोर्टिंग कास्ट म्हणजे चांगल्या सह कलाकाराची फौजच यात आहे. इंग्लीश कलाकारांनी “डायर”, ‘गुप्तहेर डेइटन’, आणि ‘ओ’ड्वायर’ यांनी सुद्धा दमदार अभिनय करून छाप टाकली आहे. ‘बनिता संधू’ हिने मुक्या “रेशमा” आणि ‘अमोल पराशर’ याने “भगत सिंग” यांची व्यक्तिरेखा साकारून त्यात जीव ओतला आहे. या व्यक्तिरेखेची चित्रपटातील लांबी कमी असली तरी प्रभाव पूर्ण चित्रपटात जाणवतो. देशभक्ती वर एक सुद्धा जोरदार गाणे नसताना पण पार्श्वसंगीत छान झाले आहे. पार्श्वसंगीत साजेसे आहे.             

चित्रपट पहिले ३० मिनिटे लवकर लक्षात येत नाही पण तुम्ही क्षणभर लक्ष विचलित न होत्या बघितल्यास पुढे कळत जातो. तुम्हाला पहिले ३० मिनिटे बोर झाल्यास शेवटची ३० मिनिटे सुद्धा कंटाळवाणीच जातील. चित्रपट शेवटच्या ३० मिनिटात मात्र करुणामयी संगीत, हत्याकांडाची दाहकता आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना मनातून हेलावून टाकतो. शेवटची ३० मिनिटे बघून किती भारतीयांनी स्वातंत्र्य मिळवण्या साठी बलिदान दिले आहे आणि त्यांनी काय यातना भोगल्या असतील याची जाणीव होते. “सरदार उधम” यांचे न्यायालयातील संवाद सुद्धा जबरदस्त आहेत. एक प्रकारे वेगळाच सिनेमा बघितल्याचा आनंद आणि “सरदार उधम” यांचे कष्ट, जिद्द, देशाप्रती तळमळ, भगत सिंग यांचा प्रभाव     बघून गहिवरून येते. फाशी दिल्या नंतर सुद्धा ‘सरदार उधम’ यांच्या हातात ‘भगत सिंग’ यांचा फोटो असणे बरेच काही सांगून जाते. त्यांचा विचार, विचारसरणी, प्रवास प्रेरणादायी आहे.   

चित्रपटाची गती पहिल्या भागात फारच कमी आहे. संवाद सुद्धा कमीच आहेत. कधी-कधी चित्रपट माहितीपट वाटतो. चित्रपटात गाणे नाही. पण कथा त्यात अडकून पडत नाही. मुठी आवळून म्हंटलेले संवाद नाहीत. पण उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, छान पार्श्वसंगीत, सह कलाकारांचा दमदार अभिनय, हुबेहूब जुन्या काळातील लोकेशन, आणि ‘सरदार उधम’ यांचा उत्तरोत्तर होत जाणारा जीवन प्रवास, वेगळ्या धाटणीची मांडणी आणि वेगळ्या पठडीचा चित्रपट आहे. पण भडक संवाद न लिहिता ‘विक्की’ चा जबरदस्त अभिनय, “जालियनवाला बाग” हत्याकांड वर चित्रित शेवटची ३० मिनिटे यावर चित्रपट आपली नौका पार करतो. मी या चित्रपटाला देतो ४.५ स्टार.

Rating: 4.5 out of 5.
Amazon Original Movie – Sardar Udham

Views: 229

2 thoughts on “ब्लॉग : चित्रपट परिक्षण – ‘सरदार उधम’ – उत्कृष्ट कलाकृती”

Leave a Reply