सप्ताहाचा शेवटच्या दिवसाची प्रसन्न सुरुवात काकडा भजनं झाल्यानंतर “याती कुळ माझे गेले हरपुनी । श्रीरंगा वाचून अणू नेणे॥” या गवळणीने झाली.
११ वाजता काल्याचे किर्तन ह. भ. प मोहन महाराज खुर्दळीकर यांनी पुढील अभंगावर केले.
उपजोनिय पुढती येऊ । काला खाऊ दही भात!!१!!
वैकुंठी तो असे नाही । कवळ काही काल्याचे!!ध्रु!!
एकमेका देऊ मुखी । सुखी घालु हुंबरी!!२!!
तुका म्हणे वाळवंट । बरवें नीट उत्तम!!३!!
“काला म्हणजे जीव ब्रह्माचे ऐक्य. काला स्वर्गात सुद्धा भेटत नाही. आम्ही परत-परत काला खाण्यासाठी येऊ आणि पंढरपुरात वाळवंटात एकमेका सोबत काला खाऊन आनंदाने नाचू.” असा अभंगाचा अर्थ वडीलांनी सांगीतला आहे.
महादेव मंदिर यात्रा कधी पासून सुरू झाली याची कुठेही नोंद नाही. शिरूर ताजबंद येथे १९५४ या साली माधवराव गुरुजी, अहमदपूरकर यांनी यात्रेच्या काळात सप्ताह करायला सुरूवात केली. यात्रेचे वेध गुढीपाडव्या वेळेस लागतात. यात्रा सप्ताह दर वर्षी चैत्र महिन्याच्या षष्ठीला सुरू होतो. त्रयोदशीला सप्ताहाचा शेवट असतो. बहुतेक मार्च किंवा एप्रिल च्या दरम्यान वेळ असते. ५ वाड्या आणि सहावे शिरूर या गावातील मंडळी कार्य पार पाडतात. गावातील विविध प्रतिष्ठित मानकर्याकडे काट्या-कवड्यांचा मान असतो.
गुढीपाडव्याच्या दिवशी अठरा-पगड जातीच्या मानकर्याकडे काट्या-कवड्या त्यांच्या घरी बसतात. एकादशीच्या दिवशी काट्या-कवड्या आणि महादेवाच्या मूर्तीला सजवुन वाजत गाजत पालखीत मानकर्याच्या घरुन आणतात. मूर्तीला कुंडल, माळा, फुले आणि दागिन्याने सजवले जाते. पालखीत विविध ग्रंथ ठेवतात. काट्या-कवड्या महेश मंदिरात बसतात. चांदणीचा मान बलशेटवारच्या वारसा कडे असतो. हनुमान जयंतीला काट्या-कवड्या परत वापस मानकर्याच्या घरी घेऊन जातात. गावातील माननियाच्या घरी पालखी पावले खेळत व नाचत गात घेऊन जातात. विशेष म्हणजे यात्रेच्या काळात ७ दिवस वीज बिलकुल जात नाही. यातच बरेच जण खुष होतात.
पूर्ण पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण असते. कोणीही दाढि, केस कापणे सुद्धा करत नाहीत. बहुतेक जण गावाची शीव सुद्धा ओलांडत नाहीत. काटेकोरपणे नियम पाळले जातात. शिवलीलामृत ग्रंथ पारायण ७ दिवस असते. १९८२ पासून शिवलीलामृत ग्रंथ पारायणाची सुरुवात व्यंकटेश बलशेटवार, व्यंकटराव महाके, गोविंदराव गवळी यांनी केली. त्या वेळेस फक्त १०-२० लोक बसत. आत्ता संख्या १००-२०० जवळपास आहे आणि पारायण करतात. अन्नसत्रा तर्फे आता पर्यंत ग्रंथ वाटप करण्यात आले आहे. लहानपणी मी शिवलीलामृत पारायण करायचो. ग्रंथा सोबत छोटी ताट आणि त्यात आरतीचे सामान असे. दररोज पारायण झाल्यानंतर आरती असे. त्या वेळेस सगळे जण जमत असत आणि झकास आरती करत असत. महिला पारायण प्रसाद म्हणून गोळ्या, फळ किंवा गोड पदार्थ पारायण करणार्यांना देत. दररोज घरी प्रसादाने भरलेली ताट घेऊन जात असू. या काळात आप्त स्वकीयांना भेटण्याची नामी आणि उत्तम संधी म्हणजे यात्रा असते. बाई लेकी, पाहुणे, आत्या, मामा, काका किंबहुना एकाच कुटुंबातील ३ पिढ्याचे पाहुणे भेटतात. एव्हढे सगळ्यांना परत भेट एखादे वेळी दिवाळीलाच होऊ शकते. यात्रा म्हणजे जणु काही दुसरी दिवाळीच. महादेवाची प्रत्येक घरा तर्फे पूजा बांधली जाते. आमच्या गावची यात्रा म्हणजे भक्ती,खाद्य यात्रा, गाठी भेटी, मंगल कार्य आणि परंपरा यांचा अजोड संगम आहे.
मग एवढे असताना लहान मुलांसाठी खरेदी तर करावीच लागते. खरेदी करून झाल्यावर परत भूक शमविण्यासाठी गरम-गरम जिलेबी आणि विविध प्रकारचे पदार्थ तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तयार आहेत. लहानपणी आमच्या कडे जनरल स्टोर होते. यात्रेच्या काळात थोडी सुद्धा उसंत भेटायची नाही एवढी विक्री व्हायची. आत्ता सगळी कडे भरपूर दुकाने असल्यामुळे आत्ता खरेदीला जास्त गर्दी नसते. त्या वेळेस भांड्याची दुकाने सुद्धा असायची नवीन-नवीन भांडी याच काळात घरी येत असत.
आणि शेवटी महत्त्वाचा दिवस उजाडतो. विशेष म्हणजे रात्री १२ वाजता लग्नाचा मुहूर्त असतो. नवरदेव एकदम शांत चित्त आणि स्थिर आहे. तो आपल्याच धुंदीत आहे. जगात काय घडत आहे त्याला त्याची परवाच नाही. तो अगम्य, गूढ अन् निर्विकार आहे. पाण्याची शीतलता आणि भुजंगांचा गूढपणा त्याच्यात भिनलेला आहे. आवाजाचे प्रचंड स्वर सुद्धा त्याची शांतता भेदत नाही. पण त्याला मनातले आर्त स्वर लगेच कळतात. पाण्याचा सतत प्रवाह त्याच्यावर होत असतो. ज्याला ना अंत ना आरंभ आहे. असा तो एकमेव द्वितीय सुद्धा या क्षणाची वाट पाहत आहे. नवरी नटून थटून वाट पाहते आहे. सभामंडप पूर्ण भरलेला असतो. काहींना सभामंडपात जागा न मिळाल्यामुळे ती लोक रस्त्यावरच थांबतात. भर रात्री परिसर गजबजून जातो. आत मध्ये जाण्यासाठी मुंगीला सुद्धा वाव नसतो. आणि बाराच्या ठोक्याला मंगलाष्टक सुरू होतात. वर्हाडी मंडळीने स्वत:च्या घरातून अक्षता आणलेल्या असतात. प्रत्येक मंगलाष्टक झाल्यावर अक्षताचा वर्षाव होतो. ना रूसवी फुगवी, ना कशाचे अवडंबर ना वर्हाडीची तारांबळ. महादेव आणि पार्वतीच्या प्रतिकात्मात काट्या सभागृहात ठेवलेल्या असतात. मध्ये अंतरपाट धरलेला असतो. प्रत्येक जण महादेव आणि पार्वतीच्या अभूतपूर्व लग्नाचा साक्षीदार होतो आणि घरी परततो. मंदिरावर आकर्षक रोषणाई आणि लग्ना नंतर आतषबाजी मनमोहक असते. अक्षता रुपी हळदी युक्त दुख आणि कुंकू युक्त यातना जेव्हा महादेवावर पडतात आणि तांदूळ महादेवाच्या पिंडीत लुप्त होऊन फक्त फूल रुपी आशीर्वाद मागे राहतात. तेव्हा महादेवावर पडणार्या पाण्याच्या अखंड प्रवाहाने तुमचे दुख आणि यातना धुऊन निघतात.
लग्न झाल्या नंतर भोजन तर करायलाच पाहिजे. तर दुसर्या दिवशी पूर्ण शिरूर गाव आणि ५ वाड्यातील लोकांना महाप्रसाद असतो. खीर बनवण्यासाठी खास हौद मंदिरात बांधून घेतला आहे. गाव जेवण असल्यामुळे एक दिवस अगोदरच स्वयंपाकाची सुरुवात होते. प्रसादात गव्हाची खीर आणि वरण भात असतो. गव्हाच्या खिरीचा स्वाद स्वर्गीय असतो. वरण आणि भात सुद्धा अप्रतिम लागतो आणि लोक प्रसाद म्हणून आदराने ग्रहण करतात. महाप्रसाद ग्रहण केला नाही तर तुम्ही यात्रेतील मोठ्या सुखाला आणि आनंदाला तुम्ही मुकलेले असाल...
लग्नाची तयारी |
गाव जेवणाची तयारी |
गव्हाची खीर – साठवण |
लग्नाची तयारी |
मंगलाष्टक |
मंगलाष्टक |
Pic Courtesy/ प्रकाशचित्र सौजन्य – राज बलशेटवार
Views: 273
Pingback: अद्वितीय अनुभव... - हे महादेवा...