त्यामधीलच एक “येळवस” हा सण आहे. हा “दर्शवेळा अमावास्या” सण मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्ये दिवशी साजरा केला जातो. साधारण हा सण डिसेंबराच्या दुसर्या पंधरवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात येतो. “दर्शवेळा अमावास्या” या सणाला ग्रामीण भागात “वेळा/वेळ अमावस्या”, “येळ अमावस्या” असे म्हटले जाते. प्रामुख्याने हा सण मराठवाडा भागातील लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा आणि आजूबाजूचा कर्नाटक लगत सीमावर्ती भागात फार पूर्वी पासून उत्साहात साजरा केला जातो. माझ्या मते हा सण अन्नदाती भूमातेची (काळ्या आईची) पूजा करण्यासाठी केला जातो.
शेतात सणाची पूजा साजरी करून झाल्यावर भोजनाची वेळ होते. भोजनासाठी काही विशेष मेनू नसणे हा तर अन्याय आहे. या सणाची खासियत तर विशेष पक्वान्नात आहे. या सणासाठी विशेष पदार्थ “भज्जी” आणि “आंबील” तयार करतात. काय म्हणता काय विशेष असते या भज्जीत? सगळेच अतिशय विशेष असते या भज्जीत. भज्जी मध्ये हरभरे, वाटाणे, तूर, शेंगदाणे, वरण्याच्या शेंगा, गाजर, मेथी, हिरवी चिंच, हरभरा डाळ, गूळ, कोथिंबीर, लसणाची फोडणी(चवी नुसार) एवढा जिन्नस असतो. जर “पुरणाची पोळी” ही साध्या पोळीची महाराणी असेल तर मी “भज्जी” ला पिठल्याचा महाराजा म्हणेन. त्या सोबत आंबील म्हणजे झोपेची हमखास हमी. आंबील मध्ये ज्वारीचे पीठ दह्यामध्ये(ताका मध्ये) घट्ट शिजवायचे. त्यात जिरे, मोहरी, अद्रक, कोथिंबीर, तिखट, मीठ घालून तयार झाली आंबील. आंबील म्हणजे ताकाची राणी. आंबील जास्त प्रमाणात घेतली तर गुंगी आलीच समजा. मोकळे आकाश, जमिनीचा ऊबदारपणा आणि बसण्यासाठी चटई, जेवणा मध्ये भाकर, पोळी, आंबील, भज्जी, भज्जी वर कढवलेले तेल, खीर, गोड भात, गूळ पोळी, धपाठ्या सोबत कांदा, मुळा, गाजर, बोर, मिरचीचा ठेचा, लोणचं, दही, आणि बरेच काही असा बेत असतो. ताटाला नजर लागेल असे भरगच्च पदार्थ आणि एकत्र कुटुंब आणखी काय पाहिजे सर्वांग सुंदर भोजनासाठी.
अलीकडे गाव तळे नंतर आमचे मुख्य शेत, बाजूला आंब्याचे वावर. मुख्य शेत आणि आंब्याच्या वावरा मधून वाहणारी लहान नदी. मग काय आम्ही खेळण्यासाठी शेत भर भटकत असू आणि त्यात कोणी तरी झोका बांधून धम्माल आणत असे. मग कोणी बोर, घाटे देत असे. मोठी माणसे दुपारची वामकूक्षी घेतात, आई, काकू मंडळी नवीन आलेली तूर निवडण्यासाठी घेतात. हा सण प्रत्येकाला काही ना काही देतो. मला आठवण, मोठ्यांना आनंद, लहानांना मज्जा मस्ती, कोणाला निसर्गाशी हितगुज करण्याची संधी आणि शेतकर्याला भूमातेची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी. प्रत्येकाला भरपूर प्रमाणात आनंद देऊन हा सण संध्याकाळी घरी पोहचल्यावर संपतो.
Views: 222
वाह भागवत! वर्णन वाचले तरी प्रत्यक्ष शेतात येळवस साजरी करत असल्याचा अद्वितीय अनुभव आणि आनंद होतो!
Keep it up!
अद्वितीय
प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद!!!
धन्यवाद!!!