लेख – “सोडून द्या”
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय । सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥
भावार्थ:- हे धनंजय अर्जुना, तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धी यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. समत्वालाच योग म्हटले जाते.
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः । जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥
भावार्थ:- कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात.
भगवान श्रीकृष्णाला पूर्ण अवतार म्हणतात. खरे तर भगवान श्रीकृष्णाचे देवत्व आणि पूर्ण अवतार हा विचार बाजूला ठेवून थोडा वेळ त्यांच्या मानवी आयुष्याचे अवलोकन केले तर खूप काही गोष्टी लक्षात येतील आणि त्यातून भरपूर आत्मसात करण्या सारखे आहे. भगवान श्रीकृष्णाचे जीवन अथांग समुद्रा सारखे आहे त्यातून आपल्या अल्पमतीला कळेल किंवा हातात जितके पाणी मावेल तितके घेऊन आपले जीवन कसे समृद्ध करता येईल हे पाहणे संयुक्तिक ठरेल.
भगवान श्रीकृष्णाच्या मानवी आयुष्यात खूप चढ उतार आहेत. भावनांचे खूपच सखोल कंगोरे, कठीण परिस्थिती, आणि बुद्धिमत्ता, चातुर्य, अभ्यास, लीला आणि त्यातून होणारे मानवी नात्याचे प्रगटीकरण, आणि मानवी मनाचे विविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात ठळक दिसतात. त्यांचे मानवी आयुष्य विविध रंगांनी आणि विविध अंगांनी परिपूर्ण भरलेले आहे. भगवान श्रीकृष्णाला मानवी रुपात अतिशय कठोर परिस्थितीचा सामना करावा लागला.
भगवान श्रीकृष्णानां बासरी वादन, पीतांबर (वस्त्र), लोणी अतिशय प्रिय आहे. जन्म घेतल्या बरोबर आई वडीलांना दूर राहावे लागले. जिथे ते लहानाचे मोठे झाले. खेळले, राक्षसाचा विनाश केला. रासलीला केली. लोणी खाल्ले. गुरांची देखभाल केली. काही वर्षा साठी त्यांना गोकुळ सोडून वृंदावनात जावे लागले. श्रीकृष्ण आणि राधेचे प्रेम तर सर्वश्रुत आहे. पण त्या राधेला आणि असंख्य प्रियजणांना वृंदावन सोडून त्यांना मथुरा नगरीत जावे लागले होते. यशोदा माता आणि नंदबाबा, सवंगडी, आणि गोपिका या सगळ्यांचा त्याग केला होता. यशोदा माताने ममतेने पालन पोषण केल्या नंतर सुद्धा सोडून जावे लागले. त्यांनी उद्धवाला वृंदावनात पाठवले पण ते स्वत: परत कधीच वृंदावनात गेले नाहीत. असे सांगतात की वृंदावन सोडल्यावर त्यांनी कधीच बासरी वादन केले नाही आणि त्यांनी बासरीचा सुद्धा त्याग करून राधेला देऊन टाकली. वृंदावन सोडल्यावर त्यांनी कधीच लोणी चोरली नाही की खाल्ली सुद्धा नाही.
मथुरेत कंसाचा वध केल्या नंतर आणि १६ वेळेस जरासंधाला हरवले. मात्र १७ व्या वेळेस मथुरा सोडून पलायन केले. त्याचा कालयवन त्यांचा पाठलाग करतो. राजा मुचकुंद तिथे गाढ झोपले असतात तिथे थोड्या वेळ करिता पितांबर त्यागून त्यांनी राजा मुचकुंद यांना पांघरतात आणि मागून कालयवन येवून त्यांना श्रीकृष्ण समजून राजा मुचकुंद यांना लाथ मारतो आणि राजा मुचकुंद डोळे उघडताच कालयवन भस्म होतो. श्रीकृष्ण द्वारकेत जातात पण परत कधीच मथुरेत जात नाहीत.
महाभारताच्या युद्धात शस्त्राचा त्याग केला. त्यांनी जन्म घेतल्या पासून ते महाभारत युद्धा पर्यंत अगणित राक्षसांना यमसदनी पाठवले. पण धर्म राखण्या साठी महाभारत युद्धात पांडवासाठी शस्त्राचा त्याग करून फक्त मार्गदर्शक ही भूमिका घेतली. परत स्वत:ची आवडती आणि प्रिय अशी विशेष नारायणी सेना कौरवांना देऊन सुद्धा देऊन टाकली. मानवी रूपात द्वारकेचे राजे होते पण महाभारत युद्धात देवपणं, राजेपणं सोडून मार्गदर्शक आणि सारथी झाले.
मानवी जीवनाच्या प्रत्येक मोठ्या घटनेत, प्रसंगात त्यांनी लोभाचा त्याग करून जवळची गोष्ट, व्यक्ती, परिसर, जागा, विचार, वस्तु आणि इतर गोष्टी सोडून दिल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपल्याला सोडायला जमणार नाहीत पण भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यातून एखादा प्रसंग जर आपल्या जीवनात घडत असेल तर आपण सुद्धा ती गोष्ट सगळे प्रयत्न करून जमत नसेल तर सोडून दिली पाहिजे. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील एक क्षण जरी आपण आपल्या जीवनात अमलात आणला तरी आपले जीवन सुकर होईल. एखाद्या नात्यात तुम्ही एकतर्फी प्रयत्न करत असाल पण सर्व प्रयत्ना नंतर करून साध्य होत नसेल तर त्या गोष्टीचा त्याग करा. जर तुम्हाला परीक्षेत ९५% हवे आहेत तुम्ही सगळे प्रयत्न केले असतील तर फळाची चिंता सोडून द्या. काही जण आपल्या प्रियजणां साठी गोड खायचे सोडून देतात. आपण एखादी गोष्ट मिळवण्या साठी दुसर्या गोष्टीचा त्याग करतो. तर आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धी यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य केले यालाच योग म्हणतात.
Views: 176