ब्लॉग – चित्रपट परीक्षण – नाळ

naal poster

मी नाळ या चित्रपटाचा ट्रेलर बघितला आणि “जाऊ दे न व” हे गाणं पाहीलं आणि हा चित्रपट आपण बघायचाच असे ठरवले. हा चित्रपट “सुधाकर रेड्डी येक्कांटी” यांनी दिग्दर्शित केला आहे. “सुधाकर” हा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर, लेखक आहे. नागराज मंजुळे आणि सुधारक यांचे चित्रपटाचे संवाद कागदावर नाही तर प्रेक्षकांच्या हृदयात कोरले जातात. चित्रपटाला दमदार पार्श्वसंगीत “अद्वैत निमलेकर” यांनी दिले आहे. अ.व. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. चित्रपटात एकच गाणे आहे पण तेच गाणे चित्रपटाचे कथा सार ३.४४ मिनिटात दाखवते. प्रमुख भूमिका “नागराज मंजुळे”, “देविका दफ्तरदार” आणि “श्रीनिवास पोकळे” यांची आहे.

खरे तर पूर्ण चित्रपट चैत्या या पात्रा भोवती फिरतो. “श्रीनिवास पोकळे” याने अतिशय सुंदर असा चैत्या साकारला आहे. चैत्या सहज सुंदर अभिनय आणि वावर छान रंगवलेला आहे. चैत्या बागडतो, हसवतो, रडावतो, धमाल करतो आणि अंतर्मुख करायला लावतो. जेव्हा-जेव्हा चैत्या कॅमेरा समोर येतो त्याच वेळेस आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी आऊट फोकस होतात. विनोदाची उत्तम पेरणी आणि लहान मुलांचे भाव विश्व सुंदर रित्या उलगडले आहे. चैत्याचे आणि त्यांच्या आईतील नात्याचे पदर अलगद उलगडत जातात. चैत्याचा आई सोबत “आई मला खेळायला जायचंय” हा संवाद तर चित्रपटाचा उत्कृष्ट सीन आहे. त्याचे आणि त्यांच्या आई वऱ्हाडी भाषेतील संवाद कानात गुंजारव करतात. “श्रीनिवास” या वर्षाचे सगळेच अवॉर्ड नक्कीच जिंकणार.

चैत्या आणि त्याची आई यांच्या कथानका सोबत म्हैस आणि तिच्या रेडकूची एक समांतर कथा चालू असते. चैत्याला त्याचा मामा भेटे पर्यंत चैत्याचा एक स्वप्नवत आणि सुंदर प्रवास सुरू असतो. मामाचे शब्द या छोट्या चैत्याच्या जीवनात वावटळ आणतात. जसे की त्याला कटू स्वप्न पडते आणि तो त्या अज्ञात गोष्टीचा पाठपुरावा करून त्यामागे धावतो. त्याला वाटते आपली आई आपल्या वर प्रेम करतच नाही. त्याच्या साठी रडत सुद्धा नाही.

“देविका दफ्तरदार” यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. आईच पात्र मस्त रंगवलयं. आईचे आणि मुलाचे नाते वर्णना पलीकडे असते. मुलाला आईच्या कुशीत अखंड प्रेमाची ऊब मिळते आणि आई आपल्या बछडा काहीही करते. दोघांच्या नात्यातील अंतर वाढले तर नातं तुटण्याची संभावना असते पण जर त्याच नात्यात दुसर्‍याला गृहीत न धरता संधी दिली तर ते नातं बहरते. आई चैत्याला रेडकूची फक्त स्पर्शातून ओळख करून देते. “चैत्या एक दिवस घरी आला नाही’ तर आईची होणारी तगमग स्पष्ट जाणवते.” चैत्या तिला आई न म्हणता सुमी म्हणतो. ते दृश्य उत्तम जमून आलेत. शेवटच्या १५ मिनिटात फक्त डोळ्यांनी काय सुंदर अभिनय केलाय. शेवटची १० मिनिटे कॅमेरा फक्त चैत्या, आई आणि दीप्ती देवी या तीन पात्रा भोवती फिरतो.

“नागराज मंजुळे” यांनी सावकाराची भूमिका उत्तम निभावली आहे. त्यांनी एका सशक्त वडीलांची भूमिका साकारली आहे आणि चित्रपटाचे संवाद सुद्धा लिहिले आहेत. तसे प्रमुख भूमिका सोडल्यास आज्जीच्या पात्राने जान आणली आणि दिली आहे. आज्जी आणि सुनेचे नाते विळा भोपळ्याचे दाखवले आहे. आजी चैत्याचे खूप लाड करते आणि गोष्टी सांगते. चैत्या आज्जी वर रेडकू सोडतो तो दृश्य जमून आले आहे. आज्जीला बैलगाडी मधून नदी पात्रातून प्रवास करतात तो भावनिक क्षण सुद्धा उत्कृष्ट झालाय. त्या अवघड प्रसंगी डोळ्यातून फक्त एक अश्रु निखळतो हे मात्र खटकते. पण पुढचाच क्षण सुंदर झालाय. बच्चन आणि मामा हे पात्र सुद्धा भाव खाऊन जाते. बाकी शेवटच्या १५ मिनिटा करिता दीप्ती देवी यांनी दमदार भूमिका केली आहे. शब्द कमी आहेत पण डोळ्याचा पुरे पूर उपयोग करून अभिनय साकारला आहे.

चित्रपटात काही दृश्याची पुनरावृत्ती होते ते थोडे खटकते. मध्यंतरी चित्रपट थोडा वेळ रेंगाळतो पण कंटाळवाणा होत नाही. एकच गाणे असून सुद्धा आणखी गाण्याची गरज वाटत नाही. गाव आणि नदी मुळे चित्रीकरणाला वैशिष्ट्य पूर्णता आली आहे. चित्रपटाची कथा चैत्या आणि त्याची आई यांच्या आजूबाजूला फिरते. चैत्याला अचानक एक दिवस कळते की, तो दत्तक असून त्याची जन्मदाती आई दुसर्‍या गावी राहते. मग त्याचा तिला भेटण्यासाठी तगमग सुरू असते. चित्रपटाची पहिली आणि शेवटची पंधरा मिनिटे अतिशय सुंदर रित्या दिग्दर्शित, अभिनय परिपूर्ण, परिणामकारक आणि अर्थपूर्ण आहेत. महाराष्ट्रात चार कोसा नंतर भाषा बदलते. चित्रपटातील नागपूरी वऱ्हाडी भाषा कानात गुंजारव करते आणि भाषा गुळावानी गॉड लागते.

दमदार कथा, नाविन्यपूर्ण गाणे, प्रभावी सुरुवात आणि परिणामकारक शेवट, चांगले पार्श्वसंगीत, विनोदाची उत्कृष्ट पेरणी, सह कलाकाराची उत्तम साथ, मानवी संवेदना, भावनांसंबंधीवर भाष्य, आई आणि मुलांचे भावपूर्ण नातं, उत्कृष्ट अभिनयाने परिपूर्ण चित्रपट पाहायचा असेल तर नाळ एकदा पहाच. प्रेक्षकांची कथे सोबत नाळ जोडणारा चित्रपट एकदा अनिवार्य बघितलाच पाहिजे. मला या चित्रपटाला ५ पैकी कमीत कमी ४ स्टार द्यायला आवडेल.

परीक्षण अभिवाचन https://youtu.be/-yhTOnTaomw

४ स्टार नाळ
Featured post on IndiBlogger, the biggest community of Indian Bloggers

Views: 91

Leave a Reply