चित्रपट परीक्षण/रिव्यू : “सुपर ३०” : एक हुकलेला षटकार – स्पॉईलर अलर्ट

चित्रपट परीक्षण/रिव्यू – “सुपर ३०” – एक हुकलेला षटकार


Top post on IndiBlogger, the biggest community of Indian Bloggers

हा चित्रपट बघताना मला ३ इडियट, चक दे इंडिया आणि इंग्लीश चित्रपट “मिॅरकल” या प्रेरणादायी चित्रपटाची आठवण होते. “मिॅरकल” हा अमेरिकन आईस हॉकी वर आधारित एक सुंदर चित्रपट आहे. एकंदर कथा चांगली आहे. “सुपर ३०” चित्रपटाची कथा सरळ साधी आणि सोपी आहे “शिक्षण सम्राट आणि जाती व्यवस्था विरुद्ध लढाई”. पहिला भाग उत्तम झाला आहे. शिक्षणाचा बाजार हा आत्ता पर्यंत बऱ्याच चित्रपटा मध्ये दाखवण्यात आला आहे. भारतातील शिक्षणाचे तीन तेरा कसे वाजले आहेत हे छान रित्या चित्रण करण्यात आले आहे. एक गरीब विद्वान गणितज्ञाला शिक्षणा साठी पैसे न मिळाल्यामुळे जीवनाच्या संघर्षा साठी सायकल वर फिरून ५ रुपयाचे पापड विकावे लागते हे बघून हृदय पिळवटते. चित्रपटाचा पहिला भाग उत्तम रित्या साकारण्यात आला आहे.

कास्टिंग दिग्दर्शकची कमाल आहे. हृतिक रोशनला मुख्य भूमिकेत घेण्यात आले आहे. कुठे धूम, आणि bang bang चा निळ्या डोळ्याचा स्टाईलिश हिरो आणि कुठे शिक्षणासाठी संघर्ष करणारा, आणि परिस्थिती ने गांजलेला नायक… हृतिकने ही व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारली आहे. त्याच्या अभिनयातून, देह बोलीतून, डोळ्यातून, आणि बोलण्यातून “आनंद कुमार” सुंदर रित्या उलगडला आहे. चित्रपटाचा पहिल्या फ्रेम पासून हृतिक आपल्याला हृतिक न वाटता गणितज्ञ “आनंद कुमार”च वाटतो. उत्तम संवाद आणि संयमित अभिनय यामुळे हृतिक उठून दिसतो. गणितज्ञ “आनंद कुमार” यांना केंब्रीज इथे शिक्षणा साठी संधी मिळते ते ३० गरीब विद्यार्थीना घेऊन IIT च्या तयारीसाठी “सूपर ३०” चा संघर्ष मय स्थापना करणारा आनंद उत्तम रंगवला आहे. आनंदला आनंद साजरा करतानाचे दृष्य पाहण्या लायक झाले आहे. जेव्हा आनंद कुमारच्या स्वप्नांना परिस्थितीने विराम लागतो त्यानंतर आनंद कुमार दुप्पट मेहनतीच्या जोरावर दुसर्‍यांच्या स्वप्नांना बळ देतो. हाच महत्वाचा संदेश चित्रपटात देण्याचा प्रयत्न करतो.

आनंदच्या वडीलांची “ईश्वर” यांची भूमिका करणारे जेष्ठ कलाकार “विरेंद्र सक्सेना” यांनी उत्कृष्ट रित्या उभारली आहे. त्यांनी भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे आणि त्यांच्या पात्राचा उत्तम आलेख उंचावण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. हे पात्र पहिल्या भागात हास्याचे कण शिंपडतो. “मृणाल ठाकुर” ची मोठी भूमिका नसली तरी पण तिने उत्तम काम केले आहे. आनंद कुमार वर मनापासून प्रेम करणारी प्रेयसी छान रंगवलेली आहे. कथेत तिला जास्त वाव नाही. पण ऐन मोक्याच्या क्षणी आनंद कुमार ला वाचवणारी पूर्व प्रेयसी भाव खाऊन जाते. या चित्रपटातील मृणालचा प्रवेशाचा पहिला संवाद जमून आला आहे. “पंकज त्रिपाठी” या कलाकाराला कोणतेही काम दया आणि पात्र कितीही वेळाचे घ्या. “त्रिपाठी” तिथे आपली छाप सोडतोच. इथे सुद्धा विनोदाला व्यंग्यात्मक फोडणी देत भ्रष्ट मंत्र्याची भूमिका अत्यंत कडक केली आहे. “आदित्य श्रीवास्तवा” यांनी सुद्धा “लल्लन सिंग” यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. हा खलनायक साम-दाम- दंड- भेद या नीतिचा वापर करून तो “आनंद कुमार” यांना नमवण्याचा प्रयत्न करतो. आनंद कुमारच्या भाऊ, आई आणि इतर ३० विद्यार्थी यांनी आप-आपल्या भूमिका मस्त साकारल्या आहेत. अमित सदने एक छोटीशी पण चांगली भूमिका निभावली आहे.

चित्रपटाला संगीतकार अजय-अतुल याचं संगीत लाभलेले आहे. पार्श्वसंगीतावर सैराटचा प्रभाव टळक जाणवतो. पाच गीत आहेत पण विशेष असे एकही गीत लक्षात राहत नाही. त्यातल्या त्यात “जुगर्फिया” हे गाणे चांगले झाले आहेत. छायाचित्रण, चित्रपट संपादन, कॉस्टयूम डिझाइन, इतर विभागाने आपले काम चोख रित्या पार पाडले आहे.

एका क्षणात तुमचे संपूर्ण जग बदलण्याची क्षमता असते. तो क्षण फक्त तुम्हाला ओळखायचा आणि अमलात आणायचा असतो. हा प्रसंग दुसर्‍या भागात अधोरेखित केला आहे. संघर्ष जेवढा मोठा तेवढा तुमच्या स्मरणशक्ती, विचार, नेतृत्व आणि सहनशक्ती यांचा कस लागून तुमचे धैर्य आणि संयम वाढण्यास मदत होते. यांचे सुंदर चित्रण दुसर्‍या भागात आहे. पण त्यासोबत काही अतार्किक गोष्टी सुद्धा आहेत. त्या गोष्टी सोडल्या असत्या तर चित्रपट आणखी बहरला असता. जसे “बसंती नो डान्स” हे गाणे टाकले नसते तरी चालले असते. पटकथेवर आणखी काम करायला हवे होते. काही चुका झाला आहेत त्या कमी करता आल्या असत्या. दिग्दर्शकाचा बायोपिक ड्रामाचा प्रयत्न चांगला आहे. चित्रपट एक हुकलेला षटकार आहे कारण पटकथा आणखी प्रवाही होऊ शकली असती.. दुसरा भागातील उणिवा कमी शकल्या असत्या. जसे की “बसंती नो डान्स” ऐवजी दुसरे काही प्रतिमात्मक दर्शवले असते किंवा चित्रपट रीळ लांबी सुद्धा कमी करता आली असती. चित्रपटात काही-काही क्षण खुप सुंदर आहेत पण त्यांचा एकसंध प्रभाव तयार होत नाही. एकसंध प्रभाव तयार झाला असता तर चित्रपटाने षटकार लगावला असता.

हृतिकचा चांगला अभिनय, चांगली कथा, सर्वसाधारण पटकथा, सहायक अभिनेते आणि अभिनेत्रीने केलेले उत्तम काम, एका खऱ्या घटनेला एका प्रेरणादायी चित्रपटात रुपांतरीत करायचा चांगला प्रयत्न… काही वेळा अचंबित करणारा आणि काही वेळा साधारण वाटणारा… एक हुकलेला षटकार… पण तुम्हाला संघर्ष करण्यासाठी प्रेरणा देणारा चित्रपट एकदा आवर्जून पाहण्या सारखा नक्कीच आहे. हा चित्रपटाला कमीत कमी अडीच स्टार द्यायलाच हवेत…

 

Views: 34

0 thoughts on “चित्रपट परीक्षण/रिव्यू : “सुपर ३०” : एक हुकलेला षटकार – स्पॉईलर अलर्ट”

  1. एकसंध प्रभाव तयार होत नाही हे अगदी खर आहे त्यामुळे काहितरी राहील आहे असा वाटत.

Leave a Reply