ब्लॉग : ‘वेब सिरिज’ परिक्षण – पंचायत सीजन २ – इरसाल नमुने आणि निखळ दोस्ताची दुनियादारी

असे म्हणतात जेवढी गोष्ट लहान असते तेवढीच वैश्विक असते. ग्रामीण जीवनातील इरसाल नमुने, त्यांचा भानगडी, सोपी पण अवघड होऊन बसलेली प्रश्न आणि त्यांची उत्तरे, आंब्याच्या लोणच्या सारखे मुरलेले राजकारण, तेथील जगण्यातून उत्पन्न होणारा संघर्ष आणि विनोद. लोकांचा दृष्टिकोन आणि बाहेरच्या लोकांना वाटणारे अप्रूप किंवा दिसणार्‍या उणिवा. जगण्यातला साधेपणा आणि सहजपणा, आणि सगळ्या प्रश्नावरील उपाय आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष आणि निखळ विनोद. या सगळ्या गोष्टी पंचायत सिरिज मध्ये उत्तमरित्या परावर्तित झाल्या आहेत.

४ जिवलग मित्र, त्यांची फॅमिली, तिथली माणसे, त्यांचा भन्नाट गोष्टी, त्यात प्रत्येक पात्राची स्वतंत्र कथा आणि त्या सगळ्या मिळून बनलेली एक अजब रसायन म्हणजे पंचायत सिरीज. पहिला भाग अतिशय छान होता. दुसर्‍या सीजनची अतिशय उत्सुकता होती आणि नुकताच या वेब सिरीजचा दूसरा भाग प्रकाशित झाला आहे. पहिल्या भागात तशी कथेची सुरुवात होते शहरी भागात शिकलेला मुलगा ग्रामीण भागात ग्राम पंचायत मध्ये सचिव म्हणून रूजू होतो. त्याला तिथे एमबीए च अभ्यास करून लवकरात लवकर जायचे असते. तेथून ज्या रंजक गोष्टी घडायला सुरुवात होते. दुसऱ्या भागात कथा पहिल्या भागात शेवटापासून सुरू होते. जरी सीजन मध्ये ८ एपिसोड असले तरी प्रत्येक एपिसोड मध्ये सुरुवात वरून एपिसोड कसा संपेल त्याचा अंदाज बांधणे कठीण आहे. ग्रामीण किस्से, इरसाल माणसे, त्यांचे इरसाल बेत आणि मनसुबे, त्यातून घडणाऱ्या गमती-जमती, चार मित्रांची घट्ट मैत्री, एकमेकांना साथ देत त्यातून बाहेर मार्ग काढण्याचे प्रयत्न आणि त्यातून घडणारे खुसखुसीत किस्से यांची मेजवानीच या सीरिज मध्ये आहे .

जितेंद्र कुमार याने सचिव ‘अभिषेक त्रिपाठी’ साकारला आहे. रघुबीर यादव यांनी प्रधान-पती, चंदन रॉय ने असिस्टेंट ‘विकास’ आणि फैसल मालिक यांनी प्रल्हाद(उप-प्रधान), निना गुप्ता यांनी प्रधान ‘मंजू देवी’, सान्विका हिने ‘रिंक्की’ ची भूमिका वठवली आहे. रघुबीर आणि निना यांची जोडीची भट्टी जमून आली आहे. शिक्षण न झालेल्या प्रधानाची भूमिका छान साकारली आहे. चपल चोरीचा खुशखुशीत असा एपिसोड जमून आला आहे. हीच खरी त्यांचा अभिनयाची ताकद आहे. रघुबीर यादव यांनी प्रधान पती साकारताना जीव ओतला आहे. उप-प्रधान आणि विकास यांची मित्रांची जोडी सुद्धा छान जमली आहे. जितेंद्र कुमार बद्दल काहीच बोलणे नाही. दोन्ही सीरिज मध्ये हाच खरा हीरो आहे. पहिल्या सीजन मध्ये बावरलेला, बावचळलेला दाखवलेला आहे. या सीजन मध्ये ग्रामीण बाज ओळखलेला आणि कोळून प्यालेला, आत्मविश्वास युक्त सचिवाचे पात्र अतिशय उत्कृष्ट रित्या वठवले आहे. गडबडलेला, आत्मविश्वास युक्त, मित्रा साठी जीव देणारा, रागावलेला, अतिशय छान साकारला आहे. प्रत्येक फ्रेम मध्ये अभिनयात जीव ओतला आहे. एकदम नैसर्गिक अभिनय. कुठेही जाणवत नाही की हा अभिनयात धडपडतोय. सान्विकाचा अभिनय आणि वावर आश्वासक आहे. दोघांचे सचिव आणि सान्विका यांचे नातं त्यांच्या नकळत हळूहळू फुलत जाते. मात्र ३ माणसाचा तुम्हाला अतिशय राग येईल. त्यांचा राग येणे त्यांच्या अभिनयाची खास पोचपावती आहे. पहिला दुर्गश कुमार यांनी ‘भूषण’, सुनीता राजवर यांनी ‘क्रांति देवी’ आणि पंकज झा यांनी साकारलेला MLA सिंग. ‘भूषण’ खरंच बनराकस, कुटाणेखोर, मतलबी, काडी करणारा खडूस जगला आहे. त्यांच्या मुळे सीजनला अतिशय रंगत येते. ‘क्रांति’ चे भांडणखोर व्यक्तिमत्व सहजपणे निभावले आहे. त्यांची भांडणखोर जोडीच सीजनला वेगळ्या उंचीवर नेतात. सतत शिव्या देणारा MLA सिंगला खलनायक पद आपोआप चालत येते.

ग्रामीण कथा, पटकथेवर पकड कधीच ढिली होत नाही. हीच खरी दिग्दर्शिकीय पकड आणि कसब आहे. काही-काही वाक्य मनात घर करून जातात. “सचिवजी हर कोई नाच रहा है” हे दृश्य जबरदस्त आहे. दारू नशेत ड्राईवर ने सांगितलेले तत्त्वज्ञान अजब आहे. त्या नंतर सचिवाची झालेले तगमग आणि विनोद जबरदस्त आहे. MLA सिंगचा “नेता को क्या चाहिये होता है” सचिवला तंबी देताना वाक्य समर्पक आहे. “साला रोड ही बावाशिर है”, ‘जाहीर निवेदन’ आणि इतर बरेच डायलॉग जबरदस्त आहेत. सीरिज ending तर दिग्दर्शकाला सलाम करावा लागेल. शेवट अतिशय वेगळा आहे. शेवट एक वेगळाच परिणाम साधतो. विचार करायला प्रेक्षकांना भाग पडतो आणि डोळ्यात अश्रूंना जागा देतो. मी तर सीजन क्रिएटर TVF चा पंखा झालो आहे.

कसलेली कथा, खुमारदार पटकथा, अतिशय नैसर्गिक अभिनय, साजेसे पार्श्वसंगीत, चांगल्या सह कलाकाराची फौज, दमदार छायांकन (सिनेमॅटोग्राफी), उत्तम वेशभूषा, उत्कृष्ट ग्रामीण कथेचे बीज, जबरदस्त सादरीकरण, नितांत सुंदर निर्मिती मूल्य अशी सगळ्यां गोष्टीनी सीरिज सजलेली आहे. त्यामुळे या वेब सीरीज मी देतो ५ पैकी ४ स्टार. मी तर म्हणतो ही वेब सीरीज एकदा पहाच. माझी हमी आहे तुम्ही दुसर्‍यांदा नक्की बघाल आणि सीजन ३ ची आतुरतेने वाट बघाल.

Views: 3330

Leave a Reply