ब्लॉग : चित्रपट परिक्षण – Leo (लिओ) – LCUचा जॉन विक – स्पॉइलर अलर्ट 

मी मागच्या वर्षी कैथी, मास्टर, आणि काही महिन्या पूर्वी विक्रम चित्रपट बघितला होता. हे सगळे चित्रपट लोकेश कन्नगराज यांनी दिग्दर्शित केले आहेत. मास्टर मध्ये माझा आवडता हिरो विजय सेथुपथी आहे आणि त्यात त्याचा अभिनय जबरदस्त होता. पण कैथी आणि विक्रम हे चित्रपट दिग्दर्शकाच्या लोकेश सिनेमॅटिक युनिवर्स (LCU) चे भाग आहेत. त्यामुळे Leo(लिओ) सुद्धा LCUचा भाग आहे का नाही याची प्रचंड उत्सुकता होती. लोकेशचे चित्रपट म्हणजे वैविध्यपूर्ण कथानक, उत्तम पटकथा, मास अॅक्शन, तपशीलवार सादरीकरण आणि उत्तम पार्श्वसंगीत यांचा सुदंर मिलाफ.

लिओ लोकेश दिग्दर्शित असल्याने मी चित्रपट बघायला गेलो. थलपति विजय ने पार्थिबन/ पार्थि हे पात्र उत्कृष्ट साकारले आहे. अॅनिमल रेस्क्युअर… हिमाचल प्रदेशच्या छोट्याशा गावात कॅफे चालवणारा… बायकोला भिणारा… मुलांवर आत्यंतिक प्रेम करणारा.. त्यांच्यात रमणारा बाप उत्कृष्ट साकारला आहे. पण त्याच्या शांत असणाऱ्या आयुष्यात विविध घटना घडत जातात. एका नाजुक प्रसंगी मुलीला वाचवण्यासाठी त्याच्या हातून एक प्रसंग घडतो आणि त्यानंतर डोमिनो इफेक्ट प्रमाणे एक नंतर एक अशा प्रसंगाची साखळी घडत जाते. त्यामुळे पार्थि, त्यांची पत्नी “सत्या”(तृषा कृष्णन), मुलगा सिद्धू, आणि लहान मुलगी चिंटू त्यात गुंतत आणि अडकत जातात. कुटुंबाच्या जिवावर सुद्धा बेततं. यांचा पूर्ण घटनाक्रम म्हणजे लियो चित्रपट.

लियोचे पार्श्वसंगीत जबरदस्त आहे. मास्टर पासून मी अनिरुद्धचे संगीत ऐकत आहे. पार्श्वसंगीतात अनिरुद्ध पहिल्या तीन संगीतकारात येतो. लियोच्या प्रत्येक अॅक्शन sequence मध्ये अनिरुद्ध पार्श्वसंगीता द्वारे जीव ओततो. मी चित्रपट हिंदीत डब केलेल्या बघितला असल्याने गाणी काही लक्षात राहत नाहीत पण कर्णमधुर पार्श्वसंगीत मात्र लक्षात राहते. चित्रपट विजयचा अभिनय, अनिरुद्धचे पार्श्वसंगीत, अॅक्शन दृश्ये, LCUचे संदर्भ यांनी सजलेला आहे. चित्रपटाची सुरवात ते मध्यांतर कथा प्रेक्षकांची जबरदस्त पकड घेते.

हिमाचल प्रदेश असल्याने लोकेशन अतिशय सुंदर आहे. हायना वर वीफक्स द्वारे चित्रित केलेले प्रसंग अतिशय सुरेख झाले आहेत. हायनाचा प्रतिमात्मक उपयोग चांगला आहे. कॅफे मधील अॅक्शन दृश तर अतिशय उत्तम रित्या चित्रित झाले आहेत. कार पाठलाग दृश्ये अतिशय छान आहेत. पण कैथीची मज्जा यात येत नाही. लियो चित्रपटात फक्त लढ-लढ लढतो. कुटुंबाला वाचवतो. सगळे त्यावर संशय घेतात. पण ज्यावेळेस “सत्या” त्याच्या बद्दल माहिती काढतो. तो क्षण विजयच्या अभिनयाने नटलेला आहे. विजयची देहबोली सुद्धा पार्थिला साजेशी आहे.  

संजय दत्त, अर्जुन सर्जा यांचा सुद्धा अभिनय चांगला आहे. पण पूर्ण वेळ फोकस विजय वर असल्याने त्यांना जास्त काही वाव नाही. लोकेशच्या चित्रपट खलनायक अतिशय दमदार असतात. संजूबाबाची देहबोली काही खलनायकाची वाटत नाही. त्यामुळे संजय दत्तचा अचूक वापर केला नाही. त्यामुळे थोडा भ्रमनिरास होतो. म्हणजे तुमच्या समोर कोहिनूर तांदूळ असताना तुम्ही बिर्याणी करायची सोडून फक्त साधा भात करतात तसे झाले. पण या चित्रपटात खलनायकाला काहीच दमदार कथा नाहीये. त्यामुळे या चित्रपटात यत्र: तत्र: सर्वत्र: फक्त विजयच आहे. गुंड येतात मार खातात, जखमी होतात किंवा मरतात.  पण आपल्या LCU च्या जॉन विकला (लियो) काहीही होत नाही. त्यामुळेच चित्रपट मध्यंतरा नंतर मध्यंतरा पूर्वी सारखी प्रेक्षकांची पकड घेत नाही आणि मध्यंतरा नंतर रटाळ वाटते. कथेचा बिंदु मध्यंतरा पूर्वी समेवर जातो आणि मध्यंतरा नंतर मात्र ढेपाळत जाते. कैथी मधील नेपोलियनचे पात्र लियो मध्ये सुद्धा अवतरित होते. यात सुद्धा त्यांचे काम ठीक आहे. या चित्रपटात तृषाला सुद्धा जास्त काही वाव नाही. कुटुंबा मधील बंध मजबूत दाखवलेत. त्यामुळे थोडा विनोद सुद्धा होतो. कैथी, विक्रम प्रमाणे इथे बिर्याणी वर काहीच चित्रण झाले नाही पण चॉकलेट वर मात्र फोकस आहे.

चित्रपटातील चांगला गोष्टी : विजयचा अभिनय, VFX, जबरदस्त अॅक्शन दृश्ये आणि सादरीकरण, पार्श्वसंगीत
चित्रपट आणखी चांगला होऊ शकला असता: दमदार खलनायक, मध्यंतरा नंतर दमदार सादरीकरण, LCUचे पात्र आणखी चांगल्या पद्धतीने परिचय करता आली असती.        

मध्यंतरा पूर्वीचे सादरीकरण, विजयचा दमदार आणि कसदार अभिनय, अनिरुद्ध चे जबरदस्त पार्श्वसंगीत, चांगली अॅक्शन, LCUचे  संदर्भ त्यामुळे या चित्रपटाला ३.० स्टार देतो. कथेचे, खलनायक सादरीकरण चांगले होऊ शकले असते त्यासाठी २ स्टार कटतात. जर तुम्ही विजय थलपति, लोकेश कन्नगराज किंवा LCUचे जबरदस्त चाहते असाल तर तुम्ही नक्की बघाल. चाहता नसल्यास तरी एकदा LCUच्या जॉन विक बघायला काहीच हरकत नाही.             

Views: 411

Leave a Reply