महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खाद्य संस्कृती सुंदररित्या जपली जाते. मराठवाड्यात तर खाद्य संस्कृतीला विशेष महत्व आहे. एखाद्या विशिष्ट कार्य, सणा प्रसंगी एखादा विशिष्ठ पदार्थ बनवून आपण त्याचा आस्वाद घेतो. जसे की वेळा अमावस्येला भज्जी, आणि त्रिपुरारी पौर्णिमेला वदबल. कुठे ही परंपरा काटेकोरपणे पाळली जाते आणि कुठे ही प्रक्रिया ऐच्छिक आहे. पण एखाद्या सणा प्रसंगी विशिष्ठ पदार्थ सणाची गोडी वाढवतो आणि ओढ लावतो. असे पदार्थ मला तरी खूप आवडतात कारण ते कधीतरीच बनत असतात. तर अश्याच एका पदार्थाची आज उजळणी करून घेवू या.माणसं आपल्या गोष्टी, जागा, शहर, पदार्थ, चव यांची सोबत एक आठवण म्हणून जपत असतो. गाव म्हंटले की माझा गाव “शिरूर ताजबंद” डोळ्या समोरून तरळून जाते. पुरणपोळी म्हटले की आईची आठवण आपोआप येते. नागपूर म्हटले की संत्री, लातूर म्हटले की बहीण, सण म्हटले की दिवाळी, “बंगालचा बाजार” म्हटले की मावशी आणि त्रिपुरारी/नवमीची पौर्णिमा म्हटले की आपोआप वदबलची चव स्मरते. खरे तर वदबल अनारसे सारखे दिसत असल्यामुळे कोणीही दोन्ही मध्ये गोंधळू जाऊ शकतात. पण वदबल आणि अनारसे मध्ये फरक आहे.
तर वदबल मध्ये असे काय खास आहे? त्याची खास चव तुम्हाला वर्ष भर लक्षात राहील अशीच असते. एक तर ते फक्त वर्षा तून एकदाच खास त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त बनवतात. त्रिपुरारी पौर्णिमेची पूजा माझ्या आजोळी मोठ्या प्रमाणात साजरी होते. मग काय लहानपणी दिवाळी नंतर आजोळी गेलो की पदार्था वर भरपूर ताव मारायचो. नंतर वर्ष भर हा पदार्थ बनवतील असे काही अनिवार्य नाही. वदबल मध्ये गूळ रुपी सणाचा गोडवा आणि गव्हू रुपी नात्यातील ओलावा उतरतो. खाताना एका अवीट आणि गोड पदार्थाची चव वर्षभर लक्षात राहते.
काही दिवसांपूर्वी मामी नी आमच्या साठी गावावरून वदबल करून आणले. आणि मामाच्या मुलाच्या रूम वरून डब्बा घेऊन जायला सांगितले. मी मामाच्या मुलाच्या एरियात होतो पण ऐनवेळी आमची मोबाईल बॅटरीने धोका दिला आणि संवाद होऊ शकला नाही. वदबल घरी घेऊन जायची इच्छा काही कमी होत नव्हती. पण १ तासाने मोबाईल रिचार्जचा जुगाड करून मामाच्या मुलाला सांगितले तर तो माझ्या साठी 5 किलोमीटर लांब वदबल देण्यासाठी आला. मी जर वदबल घरी घेऊन गेलो नसतो तर वदबलचा अपमान झाला असता. आणि मामीची मेहनत वाया गेली असती. वदबलला सुद्धा राग आला असता. त्यामुळे आपल्या आवडत्या पदार्थाला नाही म्हणू नये कारण जर वदबल नाराज झाले असते तर वदबल २-३ वर्ष भेटलेच नसते. आणि ती अवीट चव चाखायला भेटली नसती.
रेसिपी
१ किलो पीठ घ्यावे. १ किलो गूळ घ्यावा. ७५० मिली पाणी घ्यावे.
गव्हाचे पीठ जाडं किंवा भरडा दळून आणावे. काळा गूळ बारीक किसून घ्यावा. पाणी कोमट करून घ्यावे. खिसलेला गूळ पाण्यात भिजून ठेवावा. गहू आणि गुळाचे मिश्रण करून घ्यावे. त्यात चवी पुरते मीठ टाकावे आणि त्यावर थोडी खसखस पेरायची. मिश्रण गोल आकारात ओला कपड्यावर थापायचे आणि तेलात तळून घ्यायचे. झाले तुमचे वदबल तयार.
रेसिपी सौजन्य – मातोश्री
वदबल |
त्रिपुरारी/नवमीची पौर्णिमा – पूजा |
त्रिपुरारी/नवमीची पौर्णिमा – पूजा |
Views: 108
छान वर्णन. कालच्या त्रिपुररी पौर्णिमेला वदबल आईने बनवले होते. खाऊन आठवणी ताज्या जाहल्या.
धन्यवाद!!!
वाचून मनात तीव्र संवेदना निर्माण झाल्या…..आणि भूक लागली😋
😊😊