ब्लॉग – व्यक्तीविशेष – नाना
मी अंबाजोगाईला गेलो की योगेश्वरी देवीचे दर्शन घेतो. मी बाईमावशीच्या घरी गेल्या नंतर एक व्यक्ती आवर्जून वाट बघायची आणि अगत्य करायची. लहान मुला पासून ते मोठे पर्यंत सगळेच त्यांना “नाना” या नावाने संबोधन करायचे. नाना मी किती तरी वर्षा पासून पाहतोय शांत, संयंत व्यक्तिमत्व, किडकिडत पण सशक्त अंगकाठी, सावळा अंगवर्ण, पिवळा किंवा क्रीम रंगाचा कुर्ता आणि पांढरे शुभ्र धोतर आणि बोलण्यात मृदुता. मी त्यांना कधी मोठ्या आवाजात किंवा जोरात बोलताना बघितले नाही. रागात तर येणे लांबच राहिले. किंचित सुद्धा चीडचिड नाही… अतिशय शांत, संयमित आणि सरळ व्यक्तिमत्व…. बोलणे सुद्धा अतिशय कमी…
नानांचा जन्म बीड जिल्ह्यातील मोरफळी गावात झाला. सगळं मोरफळी गाव त्यांना नाना आणि बाईमावशीला नानी म्हणत. मोरफळीला नाना किराणा दुकान आणि शेती करत असत. फक्त आणि फक्त कष्ट आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी मोरफळी ते अंबाजोगाई हा पल्ला गाठला. बाईमावशी वारल्या नंतर सुद्धा त्यांची प्रतिक्रिया संयमितच होती. कोणतीही परिस्थिती चटकन स्वीकारणे त्यांना जमायचे. काटक असल्याने कधीही हॉस्पिटलचे जायचा प्रसंग त्यांच्या साठी आला नाही. सगळ्या सोबत त्यांनी देवधर्म यात्रा सुद्धा केल्या आहेत. आई बाबांनी, बाईमावशी, नाना, अक्का, मामा आणि मामी सोबत यात्रा केल्या. आई सांगते त्या आठवणी आणखी ताज्याच आहेत.
बाईमावशी कडे गेल्या नंतर भोजनाला नेहमी सोबत बसणार. मुला साठी काका नेहमी अंबाजोगाईला राहत. त्यांचे अंबाजोगाईला किराणा दुकान होते. अंबाजोगाईला शनिवारी आणि मंगळवारी बाजार असतो. मी सुद्धा दोन-तीनदा बाजारात गेलो होतो. बाजारात पाय ठेवायला जागा नसायची. त्या वेळेस मुले बाजार असताना नाना किराणा दुकानात बसायचे आणि पूर्ण दुकान आरामात सांभाळायचे. पहिले पासून दुकानात बसून असल्याने सगळा व्यवहार व्यवस्थित करायचे. पुढे वार्धक्या मुळे दुकानात बसणे कमी झाले. नातवंडाचे अतिशय लाड करत असत. ठराविक वेळे पेक्षा कोणाला(नातवंडाला) यायला वेळ लागत असेल तर ते लगेच मोठ्या सुने कडे विचारपूस करत असत. नाक्या पर्यंत जाऊन-येऊन लक्ष ठेवत असत. माझे मावस भाऊ बांधत असलेले नवीन घराचे त्यांना अतिशय अप्रूप होते. एप्रिल महिन्यात मी अंबाजोगाईला गेलो होतो तर सगळे घर त्यांनी मला फिरवून दाखवले होते. त्यांना तीन मजले चढल्यावर सुद्धा त्यांचा उत्साह कमी झाला नव्हता. त्यांच्या दोन्ही मुलांनी प्रचंड मेहनत करून नवीन घर बांधत असल्याचा सार्थ अभिमान त्यांच्या डोळ्यात झळकत होता.
आई वडीलांची मायेची नजर आपल्याला कळत नाही ते नसताना सगळ्यांना त्यांची उणीव भासते. काटक असल्याने नियमित दररोज चालणे हाच त्यांचा आरोग्याचा गुरुमंत्र होता. मी त्यांना कधीही जाड झाल्याचे बघितलेच नाही. घरी छोटी-छोटी काम करणे. मुलांना दुकानात मदत करणे आणि नातवंडांना वेळ देणे याच दोन गोष्टी त्यांनी उतारवयात केल्या. तसे माणसाचे आयुष्य एका रेषेत कधीच नसते पण नाना उतारवयात अनेक वर्ष एकाच सरळ रेषेत आयुष्य जगले.
मागच्या रविवारी परत अंबाजोगाईला बाईमावशीच्या घरी गेलो. वाटले त्या वेळेस आवाज येईल “भागवत कधी आलास. बरा आहेस का?” पण ते शब्द काही कानी पडले नाहीत. कैलासवासी गेलेली माणसे थोडेच बोलणार पण त्यांचे शब्द कायमच लक्षात राहतात.
नाना (कै. शेषाद्री रामभाऊ तारे, अंबाजोगाई मृत्यु – 08/12/2022 )
नानांना शब्दरूपी भावपूर्ण श्रध्दांजली|||
ब्लॉग – व्यक्तीविशेष – नाना Read More »