लेख – देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥
वरील ओवीचा अर्थ अतिशय सखोल आहे. आपण जितका वरवर समजतो, तसा सोपा नाही. अभंगाचा सोपा भावार्थ असा आहे “देवाच्या दारात एक क्षण उभा राहिल्यास तुम्हाला चार ही मुक्ती साध्य होतील.”
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतवाणी ने पावन झालेल्या हरिपाठा मधील हा पहिलाच अभंग आहे. माऊलीचे गुणगान करताना शब्द आणि भावना कमी पडतील. माऊली म्हटले की अंत:करणातील उत्तुंग चांगले भाव उचंबळून येतात. माऊली आपले अंत:करण व्यापून टाकतात. हरिपाठाचा हा अभंग मला अतिशय आवडतो पण पहिल्यांदा मला कोडे पडले होते की मंदिराच्या फक्त दारात उभे राहिले तरी तुम्हाला मुक्ती भेटते. आपण मंदिरात दर्शन करून आल्यावर मंदिरात बसतो. पण त्यामुळे प्रत्येकाचे कल्याण होईलच असे नाही. पण आपण मंदिरात इतक्यांदा जाऊन आपल्या किंवा कोणालाही मुक्ती मिळत नाही हा प्रश्न मला कित्येकदा पडला होता. कारण आपण वरवर विचार करतो. या अभंगाचा काय किंवा कोणत्याही अभंगाचा ऊहापोह करण्याचा आपल्याला अधिकार आणि प्रयोजन नाही. पण आपल्या परीने अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करू शकतो.
“देवाचिये द्वारीं” यावर थोडी चर्चा करायला हरकत नसावी. यात “देव” या शब्दावर विशेष भर आहे. इष्ट देव का मंदिरातील मूर्ती का देवाचे सुंदर रूप, का गुरु, का देवाचे प्राकृतिक रूप का निसर्ग, का देवाचे मानवीय रूप, का मानव रूपातील देव का आई-वडील रुपी देव का गोर गरीबाला मदत करणारा माणसातील दूत का कठीण परिस्थितीतून मार्ग काढणारा माणूस यातील कोणता देव आपल्याला लागू होतो यावर प्रकाश टाकण्यासाठी स्वत:लाच प्रश्न विचारायला हवा. “द्वारीं” म्हणजे कोणते द्वार ह्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. आपल्या शरीरात पाच इंद्रिये असतात. ते सुद्धा एक प्रकारचे द्वार असू शकतात.
देवाला प्राप्त करण्या साठी बरेच मार्ग आहेत. जप, तप, वैराग्य, योग आणि साधना. पण सगळ्यात जवळचा मार्ग आहे भक्ती मार्ग. पण चार मुक्ती म्हणजे काय? आणि त्या कोणत्या? सलोकता, समिपता, सरुपता, सायुज्यता या चार मुक्ती आहेत. पहिली मुक्ती म्हणजे सलोकता. जिच्या द्वारे आपल्याला देवाचा लोक प्राप्त होतो. दुसरी मुक्ती समीपता जिच्या द्वारे आपल्याला देवाचे सानिध्य प्राप्त होते. तिसरी मुक्ती स्वरूपता, जिच्या द्वारे आपल्याला देवाचे रूप प्राप्त होते . तिसरी मुक्ती ध्यानामुळे प्राप्त होते. चवथी मुक्ती सायुज्यता जिच्या द्वारे आपल्याला ब्रम्हरूपता प्राप्त होते. मोक्ष मिळतो. चवथी मुक्ती ज्ञानाने प्राप्त होते. या चार मुक्ती मनुष्यास मिळाल्या ईश्वराची प्राप्ती होईल. पण मुक्ती मार्गात यास किती वेळ लागेल हाच मोठा प्रश्न आहे.
काळ हा अनंत आणि सापेक्ष आहे. पुराणात ब्रह्म देवाच्या (दिवस आणि रात्र)अहोरात्र मध्ये ८,६४,००,००,००० इतकी सौरवर्षे होतात. ब्रह्मदेवाचे एकूण आयुष्य १०० वर्षे इतके कल्पिलेले आहे. त्याला महाकल्प म्हणतात. यात अनेक चार युगे येतात. मी एका क्षणात जाऊन येतो असे आपण म्हणतो. पण एक क्षण म्हणजे किती वेळ? तो कसा मोजायचा. निसर्गात सूर्योदय – सूर्यास्त किंवा अमावास्या – पौर्णिमा किंवा विविध ऋतु हे काळ मापक आहेत तसे वेळेसाठी क्षण हा काळमापक आहे. ब्रह्मदेवाच्या वेळेच्या तुलनेत एक क्षण किती शुल्लक आहे. देवाच्या आणि निसर्गाच्या तुलनेत क्षण अतिशय नगण्य आहे. काळ हा सापेक्ष आहे. कोणाला एक दिवस एक महिन्या सारखा वाटतो तर कोणाला एक मिनिटा सारखा. काही लोक पूर्ण आयुष्य एका क्षण जगतात. काही लोक क्षण साठी पूर्ण आयुष्य पणाला लावतात.
प्रत्येक माणसाला षड्रिपु ग्रासलेले असते. ते म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, आणि अहंकार. हे सर्व ज्यावेळी निघतात. त्यावेळी भक्तीला सुरुवात होते. म्हणजे भक्तीच्या पहिल्या पायरीवर मनुष्य जातो. ज्याला की मी कोण कळाले म्हणजे आत्मा कळतो. त्या मनुष्यास परमात्मा कळतो. जर आपण जीवनातल्या प्रत्येक क्षणी देवाची भक्ती केली आणि भक्ती मार्गात राहून प्रत्येक क्षण पूर्णपणे जगलो आणि ज्या क्षणी माणसाला षड्रिपु पासून मुक्तता मिळेल. त्याच क्षणी मानवाला मुक्ती मिळणारच आहे. या अभंगातून आपआपल्या परीने अर्थ निघतो. जेव्हा व्यक्तीला स्वतःचा देव कळाला. मग त्याचे स्वरूप कोणत्याही प्रकारचे असो. देवापाशी सन्मुख जायचा मार्ग सुद्धा सापडतो. त्या मार्गावर चालत असताना त्या व्यक्तिला देवा जवळ जायचे द्वार सुद्धा मिळेल. जसे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यास सोने होते तसेच देवाच्या त्या द्वारात उभे राहताच नक्कीच मुक्तीचे क्षण अनुभवायला मिळतील.
Views: 164
उत्तम खूप छान लिखाण,मला पंढरपूर ची आठवण आली
खूप छान लिखाण मला पंढरपूर ची आठवण आली
गजानन, तुमच्या प्रतिसादा साठी खूप खूप धन्यवाद!!!