लहान वयात आलेली जबाबदारी त्यांच्या चेहर्यावर आत्ताही स्पष्ट दिसते. सरळ मार्गी जीवन, शांत सोज्वळ चेहरा, मृदू बोलणे, डोक्यावर टोपी, अंगात सदरा आणि पांढरी पॅट हा त्यांच्या ठरलेला पेहराव. त्यांचे रागवणे सुद्धा हळुवार आहे. मोठे अण्णा स्वत:च्या कुटुंबामागे ठाम उभे असतात. किंबहुना त्यांना जबाबदारीतून कधी मुक्तच व्हायचे नाही. कुटुंबातील लग्न, बाळंतपण, आणि इतर कार्यक्रमांना त्यांचा संपूर्ण पाठिंबा लाभला आहे. कुटुंब, नातेवाईक, पाहुणे मंडळी यांचा प्रेमाने अगत्य करणे. प्रत्येक माणसाची काही ना काही खुबी असते. आमच्या मोठे अण्णाचे सामाजिक जाण खुप जबरदस्त आहे. कोणता पाहुणा कुठे राहतो आणि त्यांचा कुटुंबातील सदस्य कोण आहेत यांची बारीकसारीक माहिती त्यांना असते. या माहितीचा उपयोग सोयरिक जमवताना होत असावा बहुतेक.
मागच्या ५० वर्षा पासून त्यांचा दररोज एकच दिनक्रम आहे. घरातून निघून दुकानात जायचे. परत घरी वापस जेवण करण्यासाठी. परत दुकान, घर असा क्रम आणि दिवसाच्या शेवटी आराम. मोठे अण्णा आधी किराणा दुकान चालवायचे. सुरुवातीला त्या एकाच दुकानावर सगळा कारभार चालायचा. सोन्याला चकाचक दिसण्यासाठी परत-परत अग्निदिव्यातून जावे लागते. त्याप्रमाणे निवृत्ति ऐवजी वयाच्या साठाव्या वर्षाच्या जवळपास ‘अण्णा’ मेडीकल दुकानात सुद्धा बसायला लागले. त्यांना अगोदर मेडीकल क्षेत्राची काहीही माहिती नव्हती. पण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ते मुलाच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. वयाच्या ७५च्या वर्षी सुद्धा घरी आराम न करता मेहनत करतात. मी तर त्यांना कधीही वेळ व्यर्थ वाया घालवताना बघितलेले नाही. मोठे अण्णाला कोणतेही व्यसन नाही. दुकाना शिवाय त्यांना करमत सुद्धा नाही. देव दर्शन सोडून कधी कुठे फारशे राहत नाहीत. माणसा हाताळण्याची एक विशिष्ट पद्धत त्यांना अवगत आहे. त्यांचे दुकानात डोळ्यात तेल घालून लक्ष असते. उधारी-नगदी, जुने-नवे, नवीन माल, विक्री, काम करणारी माणसे यावर व्यवस्थित लक्ष असते. प्रत्येक माणूस स्थित्यंतरातून जात असतो. अण्णांनी त्यांच्या स्थित्यंतरातून शिस्तबद्ध मार्ग काढला आहे. मुलांच्या हाती सूत्र देताना त्यांना काही त्रास झाला नाही. त्यांनी नवीन वातावरण छान रित्या जुळवून घेतले आहे.
मोठे अण्णा कडून बऱ्याच गोष्टी शिकण्या सारख्या आहेत. जसे की चिकाटी, माणसा हाताळण्याची कला, योग्य वेळी स्थित्यंतर, तटस्थता, आपुलकी, इत्यादी. फार काही कोणाकडून अपेक्षा नाहीत. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवून मार्गक्रमण करणे. जीवनाची घोडदौड करताना मागेपुढे राहिले असतील पण कुटुंब प्रमुखाचे शिवधनुष्य त्यांनी प्रचंड ताकदीने पेलले आहे. किराणा दुकानात बसताना एखादे वेळेस कुठे तरी किंचित कमी जास्त माप पडलेही असेल पण ते अजाणतेपणे. जीवनात बरीच ठोके खाऊन सुद्धा आज मोठे अण्णा सुखी आणि समाधानी आहेत.
Views: 88