रंगो बापूजी गुप्ते
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या सर्वस्वाची आहूती दिली पण काळ ओघात त्यांची स्मृती इतिहासाच्या पटलावरून काहीशी पुसून गेली. अनेकांचे कार्य हे चमकत्या हिऱ्या प्रमाणे होते पण इतिहासाच्या पुस्तका मध्ये त्यांच्या स्मृती हरवून गेल्या आहेत. मी खूप दिवसापूर्वी एक पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकातील प्रमुख ऐतिहासिक व्यक्तिरेखेचे नाव होते “रंगो बापूजी गुप्ते”. पुस्तक वाचल्या नंतर त्यांच्या पासून मी खूपच प्रभावित झालो. स्वातंत्र्याच्या यज्ञात असंख्य व्यक्तींनी तण, मन आणि धनाने स्वत:ची आहूती दिली. “रंगो बापूजी गुप्ते” मोठे मुसद्दी राजकारणी, स्वतंत्रता सेनांनी, आणि “भारतीय स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी चळवळीचे” खंद्दे कार्यकर्ते होते. त्यांनी कधी एखादा रस्ता आपल्या नावावर करण्यात यावा म्हणून आहूती दिली नाही. देशासाठी संपूर्ण समर्पण आणि बलिदान दिले ते फक्त देशावरच्या प्रेमा पोटी दिले.
तर अश्या प्रखर देशभक्ताचा जन्म रोहिडखोऱ्यात झाला(जन्मतारखे बद्दल माहिती नाही).दादाजी नरसप्रभू गुप्ते हे त्यांचे पूर्वज. दादाजी नरसप्रभू गुप्ते यांची शिवाजी महाराजाच्या काळात राजांना स्वराज्य साकारण्यात मदत केली होती. “रंगो बापूजी” यांच्या जीवनाचे ३ प्रमुख टप्पे “बालपण, वकिली आणि क्रांतिकारी” आहेत. त्याची जन्मतिथी, स्थळ आणि बालपण याविषयी अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. “रंगो बापूजी” यांची वकिली आणि क्रांतिकारी कार्या बद्दल खालील प्रमाणे माहिती देत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे अखेरचे वारस सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह १८०८ साली गादीवर आले. त्यांना गादीवरून घालवण्या साठी इंग्रजांनी त्यांच्या विरुद्ध अल्प संतुष्ट लोकांसह कट-कारस्थान करायला सुरुवात केली. त्याचं वेळेस “रंगो बापूजी” यांना वडिलोपार्जित वतन वापस मिळवायची धडपड चालू होती. पण धन्याचे हाल बघून रंगो बापूजी राजांसाठी साहसी कामे करू लागले. राजाकडे गोपनीय पत्रव्यवहार पोहोचवणे आणि त्यांच्या कडून कामाची कागदपत्रे विश्वासू माणसांना सोपवणे. अशा कामापासून त्यांनी सुरुवात केली. ब्रिटिशांनी सातारा संस्थान १८३९ मध्ये बरखास्त केले. राजांनी ब्रिटिश संसदे समोर त्यांची बाजू मांडण्यासाठी इंग्लंड मध्ये दोन वकिलांची नियुक्ती केली होती. पण वकिलांच्या शिष्टाईचे दोन्ही प्रयत्न फसले. त्यामुळे राजांनी “रंगो बापूजी” यांना इंग्लंडला पाठवले. “रंगो बापूजी” इंग्लंड पर्यंत पोहोचण्याचा प्रवास सुद्धा फारच रंजक आहे.
“रंगो बापूजी” तिथे त्यांना राहण्यासाठी जागा, खाण्यासाठी पैसे आणि जगण्यासाठी काहीही साधन नव्हते. तरी आंग्ल भाषा त्यांनी इंग्रज मित्रा कडून शिकून घेतली. इंग्लंड च्या रस्त्या रस्त्यावर त्यांनी मराठी राजाच्या अन्याया विरुद्ध रणशिंग फुंकले. रस्त्यावर तेथील लोकांना गोळा करून भाषण देऊन आवाज उठवत असत. रंगो बापूजी यांचा धडाडीपणा, चतुरस्त्र पणा बघून तेथील काही ब्रिटिश खासदार आणि अधिकारी मित्र बनले. तिथे इंग्लंडच्या रस्त्या – रस्त्यावर राजाच्या अन्याया विरुद्ध वाचा फोडली. सतत १४ वर्ष तिथे राहून छत्रपतीची वकिली करत असताना त्यांनी अनेक भाषणे दिली, पुस्तके छापली आणि पत्रव्यवहार केला. त्यांनी संभाषण चातुर्य, लेखन, वक्तृत्व कौशल्य, हुशारीच्या जोरावर इंग्रज अधिकार्याचे अनेक डावपेच उधळले. ब्रिटिश संसदे मध्ये त्यांनी भाषण सुद्धा दिले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ब्रिटिश संसद आणि ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी एकच असल्यामुळे त्यांना काहीही न्याय मिळाला नाही. शेवटी १४ वर्ष वकिली केल्यानंतर ते भारतात परत आले. त्यांनी घरी वापस येऊन घोषणा केली की “इंग्रजांशी कायद्याची भाषा करणारा रंगोबा आता मेला”.
त्यापुढील त्यांचा जीवनाचा टप्पा आहे “क्रांतिकारी कार्य”. भारतीय क्रांतिकारकांनी रंगो बापूजी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी इंग्रज राजवट उलथवून टाकण्याचा पण केला. तिकडून इंग्रजाची नजर चुकवून रंगो बापूजी धूर्तपणे उत्तर भारतात गेले. तिथे त्यांनी तात्या टोपे आणि नानासाहेब पेशवे यांची भेट घेतली. त्यानंतर सातारा भागात १८५७ च्या उठावाची गुप्त तयारी सुरू केली. सैनिकांच्या सशस्त्र तुकड्या तयार केल्या. छत्रपतींविषयी आदर असणार्या अठरापगड जातींमधील शेकडो लोकांना त्यांनी इंग्रजांविरूद्ध लढण्यासाठी संघटित केले. भोरचे पंतसचिव चिमणाजी रघुनाथ ह्यांच्या मदतीने त्यांनी सैन्यभरती सुरू केली. त्यात मंगल पांडे यांना फाशी झाली. तसेच इंग्रजांच्या हेरांनी पलटणींमध्ये बेदिली माजवण्यास सुरुवात केली. रंगो बापुजी यांच्या लढ्याला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यात फंदफितुरीने त्यांचे अनेक सैनिक मारले गेल्यानंतर रंगोबा भूमिगत झाले. त्यानंतर रंगोबा ठाणे येथे नातेवाईकाकडे पुतण्याच्या लग्नकार्यासाठी गेले असताना त्यांना ब्रिटिश पोलीस अटक करण्यासाठी पोहोचले. त्यांना समजताच एका वृद्ध बाईचे वेशांतर करून रंगो बापूजी तेथून पसार झाले. त्यानंतर रंगो बापुजी गुप्त रूपाने बैरागी बनून वास्तव्य करून राहिले असे मानले जाते. १८७० मध्ये दारव्हा येथे कुपरी नदीच्या काठावर ‘बैरागी बाबा‘ या नावाने ते प्रकट झाले. १८८५ मध्ये दारव्हा येथे आपल्या मठात त्यांनी देह ठेवला. रंगो बापूजी यांच्या कार्याचे स्मरण म्हणून सातारा येथे “चार भिंती” हे स्मारक निर्माण करण्यात आले आहे.
माझ्या साठी रंगो बापूजी म्हणजे आदर्शवत, क्रांतिकारी, आणि प्रभावी व्यक्तिमत्व आहे. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढून देशा साठी सर्वोच्च बलिदान देणे, ब्रिटीश संसदेत धडक देणारा वकील ते क्रांतिकारी संघटना उभी करणे, सैन्यभरती आणि लढा देणारे व्यक्तिमत्व माझ्या साठी सदैव नक्कीच प्रेरणादायी राहील.
संदर्भ: विकिपीडिया, विकासपीडिया, sataradiary, विविध पुस्तक स्तोत्र
फोटो – रंगो बापूजी गुप्ते |
Views: 599
तुम्ही ज्या पुस्तकाचा उल्लेख केलात, ज्यामधे प्रमुख व्यक्तिरेखा रंगो बापूजी यांची आहे, त्या पुस्तकाचे नाव कृपया कळवू शकाल का ?
खूप वर्षा खाली वाचले होते पुस्तक त्यामुळे नाव लक्षात नाही.