ब्लॉग – लेख – ग्रामदेवी भवानीमाता 

प्रत्येक गावाला ग्राम दैवत आणि ग्राम देवी असतात. मा‍झ्या “शिरूर ताजबंद” या गावचं ग्राम दैवत जाज्वल्य स्वयंभू “महादेव” आहे. आणि ग्रामदेवी म्हणजे शिरूर परिसरातील भवानवाडी येथील “भवानी माता” आहे. या छोटेश्या वाडी वर आम्ही लहानपणी घरातील सर्व माणसे वर्षातून एक दोनदा तरी दर्शनासाठी जात असतो. आणि दसर्‍या वेळेस “निळकंठ” पक्षी बघून मातेचे दर्शन घेऊन सीमोल्लंघन करत असतो.

या वर्षी आम्ही स्वत:च्या गाडीतून दर्शनासाठी गेलो होतो. दर्शन घेतले आणि परतलो. पण लहानपणीची मज्जा त्यात नव्हती. लहानपणी आम्ही सगळे मिळून दर्शना साठी जात असू. जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक रस्ता नांदेड-लातूर रस्त्यावरून आणि एक रस्ता गाव पायवाटेने जातो. आम्ही लहानपणी पायवाटेनेच जायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्वानुमते शनिवार किंवा रविवार ठरायचा. लहानपणी सगळे गल्लीतील महिला मंडळ, मित्र मंडळ, आणि आजूबाजूचे नातेवाईक सुद्धा यायचे. आमची मित्रांची, सखे सोबत्यांची गट्टी तिथेच जमून यायची.

हिरवीगार पसरलेली वनराई, शांत वातावरण, थोड्या अंतरावरून येणारा गाड्याचा आवाज, छोटेखानी छान मंदिर, मंदिरा पुढे दोन मोठी झाडं, थोड्या अंतरावर पाण्याचा कल्लोळ आणि बाजूला लहान ओढा. त्यात पावसाळ्यात शेतातून वाहणारं पाणी, आजूबाजूला शेती आणि सोबत निसर्गाने पांघरलेला हिरवा शालू. मंदिरात अतिशय शांत वातावरण असते. आत्ता मंदिराच्या आवारात प्राथमिक शाळा आहे. गावातील मुख्य वस्ती थोड्या अंतरावर आहे. मंदिरात ग्राम देवीच्या पाच मुर्त्या आहेत. मंदिराचे दगडी बांधकाम आहे. भवानवाडीतील मुख्य वस्तीत भवानी मातेचे माहेर आहे. तिथे सुद्धा दोन देवी आहेत. बाजूला हनुमानाचे छान मंदिर बांधले आहे.

मग एकदा दर्शन झाले की आमची स्वारी वनभोजनाचा आस्वाद घेत असे. वनभोजन आणि विविध खेळ असा भरगच्च कार्यक्रम ठरलेला असे. वनभोजन असल्याने प्रत्येक घरातून काहीतरी विशेष आणलेले असे. लहान मोठ्यांची पंगत बसत असे. सगळ्या सोबत जेवण झाल्या नंतर आरामात उंडारत पाण्यात आणि आजूबाजूला भटकत असू. कुणी खोपा करत असे तर कोणी बोर, जांब आणि इतर फळ गोळा करत असू. कोणी कल्लोळात मनसोक्त पोहत असे. प्रत्येक जण काही तरी करण्यात गुंतलेला असे. त्यामुळे इथल्या छान आठवणी आहेत. शेवटी दिवस मावळायच्या आत घरी पोहोचायचे असल्याने ५ वाजता रमत गमत निघत असू. अश्या प्रकारे एक सुंदर दिवस मन प्रसन्न करून जात असे.

दसर्‍याच्या वेळेस शिरूर गावातील भजनी मंडळ, प्रतिष्ठित नागरिक, मंदिराचे सभासद, पाटील-पांडे, मान-पानाची मंडळी सीमोल्लंघन करण्यासाठी भवानवाडीला घोडा घेऊन जातात. बत्या, बाजेवाले, सोबत गावातील मंडळी असते. दसर्‍याच्या वेळेस शिरूर ताजबंद मधील प्रत्येक जण सीमोल्लंघन करण्यासाठी परत मातेच्या दर्शनासाठी जात असू. आणि दसर्‍याचे सोने म्हणून आपट्याची पाने लुटून घरी आणतात. आम्ही जाताना कुठे “निळकंठ” पक्षी ( साधू / तास पक्षी) दिसतो का याचा कानोसा घेत असू. दसर्‍या दिवशी हा पक्षी दिसणे शुभ असल्याने आम्ही शोधण्याचा प्रयत्न करायचो. या वाडीशी आमची नाळ लहानपणा पासून जोडली गेली आहे. आता कधी जातो त्यावेळेस या आठवणी अलवार मनात उतरतात आणि आठवणीचा सुगंध दरवळतात.

 
फोटो - भवानी माता मंदिर भवानवाडी
फोटो – भवानी माता मंदिर भवानवाडी
फोटो - भवानी माता मंदिर भवानवाडी
फोटो – भवानी माता मंदिर भवानवाडी
फोटो - भवानी माता मंदिर भवानवाडी
फोटो – भवानी माता मंदिर भवानवाडी
फोटो - भवानी माता मंदिर भवानवाडी
फोटो – भवानी माता मंदिर भवानवाडी
फोटो - मंदिर भवानवाडी
फोटो – मंदिर भवानवाडी
फोटो - भवानी माता मंदिर भवानवाडी
फोटो – मंदिर भवानवाडी
फोटो – हनुमान मंदिर भवानवाडी

Views: 118

Leave a Reply