ब्लॉग – व्यक्तीविशेष – माझी आई
*आई वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा.* आज आईच्या वाढदिवसा निमित्त लेखनाचा प्रयत्न केला आहे. काही चुकल्यास माफी असावी.
देव, निसर्ग तुम्ही जन्मल्यानंतर पालन पोषणासाठी सोय करत असतो. देवाने तुम्हाला पाठवण्या अगोदर एक विशेष देवदूताची नेमणूक केलेली असते. तुम्ही जन्माला आल्यापासून तो देवदूत तुमचे पालन पोषण करत असतो. देवाने खास नेमणूक केलेल्या देवदूताचे नाव आहे “आई”. माणसाचा जीवनपट खुप मोठा असतो. माणसाच्या भावभावना, आचार, विचार, अनुभव, आनंद, दु:ख तुम्ही शब्दबद्ध करू शकता पण त्या हुबेहूब कागदावर उमटतील याची काही शाश्वती नाही. तरी मी माझ्या आईच्या जीवनातील काही क्षणांचे प्रगटीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
माझ्या आईच शिक्षण नववी पास आहे. आणि पुढे दहावीच्या परीक्षेत १ विषय राहिल्या मुळे पुढे शिक्षण राहिले. पण जीवनाच्या परीक्षेत आई चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाली नाही तर सगळ्या विषयात प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाली. आई लहानपणी तिच्या आजोळी सोलापूरला जात असे. मामाच्या मुली आईच्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या. आज सुद्धा त्यांची छान मैत्री आहे. लहानपणी सोलापूरला आईने खूप चित्रपट पाहीले आहेत. तसेच पुण्याला सुद्धा खूप चित्रपट पाहीले आहेत. आईची मावशी आणि काका आईचे लाड करत. आईने त्या वेळेस पाहीलेले चित्रपट आणि त्यांची गाणी तिला आजही तोंडपाठ आहेत. आईचे बालपण अतिशय लाडा-गोडात झालं. माहेरी आईला लाडाने “सुरा” म्हणतात. आईला ५ भाऊ आणि, २ बहिणी मिळून ७ भावंड. भावंडा मध्ये ६ क्रमांक असल्याने खुप लाडात वाढली. उदगीर मध्ये चंडेगावे परिवार मोठा असल्याने नातेवाईकांचा गोतावळा भरपूर. त्यात मावशी, मामा आणि त्यांच्या मुली असा भला मोठा परिवार. त्यामुळे आई सगळ्यांची लाडकी होती आणि आहे. मोठे अण्णा (मोठे मामा) यांना वडीला समानच मानते. सगळ्या भावांचा आदर आई नेहमीच करत आली आहे.
प्रत्येक मनुष्य स्वत:च्या आईशी जन्माला आल्या पासून ऋणानुबंधानी जोडलेली असतात. आपण कितीही लपवले तरी आपल्या माणसावरील आपलं प्रेम कृतीतून, विचारातून, प्रभावातून आणि प्रतिक्रिये द्वारे व्यक्त होतच असते. मुलं या शब्दातच माझ्या आईच विश्व सामावलेलं आहे. मला आठवते आमच्या शाळेला बरोबर १ वाजता दुपारच्या जेवणाची सुटी व्हायची. त्यावेळेस आम्ही १०-१५ मिनिटात रमत गमत घरी जायचो. प्रत्येक वेळी आई आमची वाट बघत स्मित करत दारात उभी असायची. याबाबतीत आईला कधीच उशीर झाला नाही. कारण तिचे विश्वच आम्ही लेकुरे होतो.
मला आठवते लग्न झाल्यावर आईला चुलीवर जेवण बनवावं लागायचे. त्या नंतर पेंडीचा स्टोव्ह, कोळसाचा स्टोव्ह, रॉकेल स्टोव्ह नंतर गॅस आला. संसारात स्थित्यंतर येतात आणि तुम्हाला त्यातून जावंच लागते. पण तोच यशस्वी ठरतो ज्याला परिस्थितीतून मार्ग काढता येतो. आईला चुली वर स्वयंपाक करता येत नव्हता. पण हार न मानता आईने सगळे शिकून घेतले. नवीन लोक नवीन जागा आणि लहान गाव पण आईने सर्व जमवून घेतले. मला आठवते दुपारी आमचे जेवण झाले की आई गावातील तलावा वर धुणे धुण्यासाठी जायची. संसारात राहून कष्ट करायला आईने कधी ही मागे पुढे पाहीले नाही.
मी कितीही संकटात किंवा अडचणीत असलो तरी मी आईचा आवाज फोन वर जरी ऐकला तरी मला संकटावर मात करायची शक्ती येते. तसेच आईची तिरूपती बालाजीवरती खूप विश्वास आहे. विश्वास काय प्रचंड अशी श्रद्धा आहे. त्या श्रद्धेला काहीच तोड नाही. मला आठवते की माझ्या लहानपणी बाबांना LTC (Leave Travel Concession) भेटायचा. आम्ही फिरायला जात असू व त्यातल्या त्यात नेहमी तिरूपती बालाजीला पण जात असू. तिरूपती बालाजीला जातानाचा प्रवासाचा आनंद अगणित असे. पण आईला खूप काम पडत असे. फराळाचे बरेच सामान जसे की दशम्या, गूळ पोळी, चिवडा आणि इतर असे बरेच काही बनवावे लागत. पण आईने यासाठी कधीच तक्रार केली नाही. कारण तिच्या आवडत्या आणि परम श्रद्धेय अश्या बालाजीच्या दर्शनासाठी तिला वर्षभरा नंतर संधी मिळत असते. त्यामुळे आई स्वत:च आनंदात असे त्यामुळे आम्ही सुद्धा आनंदातच असू.
Views: 274
खरेच खूप छान. तूझी आई जीला आम्ही सगळे ताई मावशी म्हणतो. खरे तर माझी आत्या. खूपच प्रेमळ आहे. जेंव्हा जेंव्हा ती भेटते तेंव्हा खूप जिव्हाळ्याने ती चौकशी करते. काही तरी खूप प्रेमाने खाऊ घालते. तुझा लेख वाचत असताना ती माझ्या डोळ्या समोर आली आणि मी पण भाऊक झालो. ताई मावशी तुला वाढदिसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद शर्मा ताई!!!
खुपच सुंदर. हुबेहुब छवी उभी केलीस!!! Keep writing
खूप खूप धन्यवाद राजू दादा!!!