ब्लॉग – व्यक्तिविशेष – डॉ श्रीनिवास मधुकरराव बलशेटवार – भाग १
मी १९९८ साली दहावी पास झालो. एखाद्या ठिकाणचे, स्थळाचे आणि तुमचे ऋणानुबंध वेळे सोबत अतिशय घट्ट होत जातात. मी अकरावीला शिवाजी महाविद्यालय उदगीर इथे प्रवेश घेण्यासाठी गेलो. माझ्या सोबत भैय्या (श्रीनिवास मधुकरराव बलशेटवार) आला होता. वडील मंडळी त्याला प्रेमाने शिवा, त्याच्या पेक्षा लहान त्याला भैय्या किंवा भाऊ म्हणून संबोधन करतात. भैय्याच्या मदतीने मी तिथे महाविद्यालय प्रवेश घेतला आणि भैय्या त्याच्या मित्राला “प्रशांत” ला भेटायला गेला. त्याच वेळेस माझे आणि भैय्याचे उदगीर शहराशी ऋणानुबंध कायमचे दृढ झाले. मी काही वर्षांनी पुण्यात स्थायिक झालो. पण माझी उदगीर शहराशी नाळ काही तुटली नाही. वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर काही वर्षानी भैय्या उदगीर शहरात प्रॅक्टिस साठी दाखल झाला. उदगीर शहराने त्याला मुक्त हस्ताने स्वीकारले. कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी लागणारी सचोटी, कठोर मेहनत, आणि प्रामाणिक प्रयत्न हे भैय्याच्या स्वभावात आहेच. पण इतरांच्या चांगल्या गुणांची कदर करणारी दृष्टी आणि त्यातून साध्य होणारे ज्ञानार्जन आणि प्रभावी ताळमेळ. हे सुद्धा यशाचे गमक भैय्याकडे आहे.
भैय्याचे महाविद्यालयीन शिक्षण “महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर” इथे 1992-93 साली संपन्न झाले आहे. त्या अगोदर नवोदय विद्यालयात माध्यमिक शिक्षण झाले. श्रीनिवास भैय्याने बृहन्मुंबई कॉर्पोरेशन रुग्णालय मध्ये २ वर्ष सेवा दिली. वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर 1 वर्ष ब्रीच कॅन्डी रुग्णालय मुंबई आणि नंतर उदगीर शहरात प्रॅक्टिस करून, सन्मानित डॉक्टरा सोबत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय स्थापना करणे असा संपन्न प्रवास झाला आहे. रुग्णालयाचे बांधकाम २००६ पासून सुरु झाले आणि 2009 साली “उदयगिरी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय” स्थापना झाली. पण शिक्षणासाठी भैय्याला खूप मेहनत घ्यावी लागली. मला चांगलच आठवतंय की भैय्यांने चित्रपट बघण्यापाई काकाच्या हातचा मार ही खाल्ला होता. सुरुवातीला भैय्याचा कल Mechanical (यांत्रिकी) अभियंता होण्या कडे होता. शिक्षणात काकांच्या मर्जीने अभ्यासक्रम स्वीकारला. त्यामुळे भैय्याने ऑर्थोपेडिक (हाडांचा) डॉक्टर होणे पसंत केले. आणि शिक्षणाच्या संधीचे सोने केले. परिस्थितीशी जुळवून घेणे आणि आपल्या निर्णय क्षमते वर विश्वास ठेवणे हा भैय्याचा स्वभाव गुण आहेत. महत्त्वाचे म्हणजे “श्री महादेव मंदिर शिरूर ताजबंद” येथील विश्वस्त मंडळाचा सदस्य आहे.
मनुष्याच्या जीवनात प्रत्येक टप्प्यात गुरु, मार्गदर्शक आणि श्रद्धास्थान लाभले तर जीवन सुकर आणि संपन्न होते. भैय्या वैद्यकीय शिक्षण शिकताना “श्री संदीप गव्हाळ” सरांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केले. त्यामुळे शिक्षणाची गोडी वाढली. सरांची शिकवणी मनापासून असायची. त्यामुळे शिक्षण समृद्ध व सुकर झाले. दुर्बिणी द्वारे हाडांची शस्त्रक्रिया या विभागात “श्री आनंद जोशी” भैय्याचे श्रद्धास्थान आहेत. भैय्याची प्रॅक्टिस चालू असताना Endoscopic spine surgery या विभागात “श्री सतीशचंद्र गोरे” सरांचे शब्द त्याच्यासाठी मोलाचे असत. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या जवळच्या माणसाची साथ अति आवश्यक आहे. त्यामुळे सौ. शितल वाहिनी, २ मुले, आई, २ भाऊ, बहिण आणि परिवार यांची भरभक्कम साथ भैय्याला आहे.
एखाद्या माणसाची प्रसिद्धी, यशस्वी होणे किंवा महत्व त्यांनी किती माणसांच्या आयुष्यात चांगला बदल घडवलाय यावर अवलंबून असते. मी काही वर्षा पूर्वी खाजगी ट्रॅव्हल प्रवासासाठी उदगीर ते पुणे तिकीट काढण्यासाठी गेलो होतो. तिकीट आरक्षण करण्यासाठी मी त्याला माझे नाव सांगीतले. लगेच त्याचे उत्तर आले की “तुम्ही बलशेटवार डॉक्टराचे भाऊ का?” मी सुद्धा अभिमानाने उत्तरलो “हो” म्हणून. उदगीर परिसरात भैय्यांनी वैद्यकीय ज्ञानाचा अचूक वापर करून लोकांची मने जिंकली आहेत. शिरूर ताजबंद गावातील गरजू लोकांना तर भैय्या फी सुद्धा घेत नाही. शिरूर मधील भैय्या कडून वैद्यकीय सेवा घेतलेली मंडळी माझ्या वडीलांना सांगतात की तुमचा पुतण्या माणूस आणि डॉक्टर म्हणून फार चांगला आहे. त्यावेळेस आपल्याला कृत्यकृत्य झाल्या सारखे वाटते. आजच्या जगात एखादा व्यक्ति चांगला आहे म्हणण्या साठी सुद्धा खूप कष्ट पडतात. पण असंख्य लोक तारीफ करत असतील तर त्या व्यक्ति मध्ये काहीतरी खास नक्कीच असते.
प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक अनुभव किंवा घटना घडते. त्यामुळे तुमच्या जीवनाला वेगळाच आयाम लाभतो. त्या गोष्टीचा तुमच्या जीवनावर आयुष्य भर प्रभाव असतो. आमचे आजोबा श्री गंगाधरराव बलशेटवार हर्निया शस्त्रक्रिया नंतर काही दिवसातच मृत्यू पावले. त्यावेळेस आजच्या इतक्या वैद्यकीय सोई-सुविधा नव्हत्या. त्यामुळे या गोष्टीचा नातवावर म्हणजे भैय्यावर प्रभाव पडला. कुठे तरी ही घटना मनाला स्पर्शून गेली असेल की वैद्यकीय ज्ञान असते तर मी कमीत कमी प्रयत्न तरी केले असते. काकांची तब्येत सुद्धा एक प्रकारे निर्णायक टप्पा होता. आपल्या जवळच्या व्यक्तिचे पाहीलेले दुख विसरण्यासाठी माणूस आयुष्य भर दुसर्यांच्या समस्यांवर मार्ग शोधून निराकरण करत असतो. हाच खरा मानव धर्म आहे.
सुख म्हणजे नक्की काय असते. आपल्या जोडीदारा बद्दल ओळखीच्या व्यक्ति कडून झालेले कोडकौतुक. योगायोगाने ती व्यक्ति गुरुमाई असतील तर आणखी आनंद. पंढरपूर निवासी नंदू महाराज यांच्या पत्नी गुरुमाईनी सौ. शितल वाहिनी यांना भेटल्यानंतर भैय्याचे अतिशय मनापासून कौतुक केले. “महत्त्वाचे म्हणजे त्या आजारी असताना भैय्याने कसे चांगले उपचार केले आणि आत्ता उपचारामुळे गुरुमाई कश्या हिंडू आणि फिरू शकतात.” असे सांगीतले. वरून गुरुमाईनी वाहिनीना आहेर सुद्धा केला. आपल्या जोडीदाराच्या कोड कौतुका मुळे वहिनीनी स्वत:ला खूप आनंद झाला. असे बरेच समृद्ध करणारे अनुभव सुद्धा वाहिनीच्या वाट्याला आले आहेत.
ऑर्थोपेडिक प्रॅक्टिस करत असताना बऱ्याच वेळेस आपल्या गुणवत्तेचा, ज्ञानाचा आणि अनुभवाचा कस लागत असतो. एखाद्या कठीण मेडिकल केसचा अनुभव आपल्याला एक डॉक्टर म्हणून समृद्ध करत असतो. अशीच एक केस रुग्णालयात आली. त्या व्यक्तीला मोटार सायकलवरून पडून खांबाला धडकल्या मुळे घसाला जब्बर मार लागला होता. रुग्णालयात त्या व्यक्तीवर योग्य वेळी, योग्य निदान होऊन योग्य उपचार झाले. त्या व्यक्तीच्या श्वास नलिकेला दुसरे छिद्र पाडल्यामुळे तो दगावण्या पासून वाचला. या अश्या बऱ्याच कठीण केस मधून, अनुभवातून पैलू पडत भैय्या डॉक्टर म्हणून घडत गेला.
मी स्वत: काही दिवस रुग्णालयात होतो. भैय्या किती ही वेळ ऑपरेशन थिएटर मध्ये असला तरी बाहेर आल्यावर त्याच्या चेहर्यावर पूसटसा ताण किंवा थकवा जाणवत नाही. संभाषण करताना पुढील व्यक्तीचे ऐकून, परिस्थितीची जाण आणि मागोवा घेऊन, आणि चेहर्यावर स्मित हास्य आणत प्रश्नांची उत्तरे देतो किंवा चर्चा करतो. वडीलधार्या व्यक्तीला त्यांच्या कलाने घेऊन एखादी किंवा विशिष्ट गोष्ट पटवून देण्यात तर भैय्याचा हातखंडा आहे. उदगीर परिसरातील लोकांना वैद्यकीय सेवा देणे भैय्यासाठी कायम गौरवास्पद आहे.
क्रमश:
शब्द
Mechanical – यांत्रिकी
Engineer – अभियंता
Orthopedic – ऑर्थोपेडिक – हाडांवर उपचार करणारा डॉक्टर
Multi Specialist Hospital – मल्टीस्पेशालिस्ट रुग्णालय
Endoscopic spine surgery – एंडोस्कोपिक पाठीचा कणा शस्त्रक्रिया
Views: 169
Ho Doctor saheb kharach khup changle aahet saglyana adchanichya veles nehmi madat kartat.Mala tr khup veles madat keleli ahe.
@sharad patewar, खूप खूप धन्यवाद!!!!