ब्लॉग – व्यक्तिविशेष – जागतिक महिला दिन
8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा झाला. आपल्या आजूबाजूला स्त्री विविध रुपात आपल्याला भेटत असते. प्रत्येकात माणसाला चांगुलपणाचा सुवास येत असतो. प्रत्येकात घेण्या सारखा एक तरी चांगला गुण असतो. त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या नंतर आपल्याला त्या व्यक्तीची माहिती कळते. तर अश्या अनेक माणसाच्या गराड्यात आपण आपल्याला लागणारे गुण दुसर्याकडून घ्यायचे असतात. स्त्री एकाच वेळेस असंख्य पात्र साकारत असते. कधी ती बहीण, वहिनी, मैत्रिण, डॉक्टर, मार्गदर्शक, गुरू, कधी आई तर कधी शिक्षिका असते. प्रत्येक महिलांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. मी माझ्या परिवारातील स्त्रियांना जागतिक महिला दिना निमित्त शब्दरूपी अभिवादन करणार आहे.
प्रथम पुष्प – विठाई
विठाई माझ्या पेक्षा २ वर्षांनी आहे. पण लहानपणी तिचा प्रेमळ दरारा होता. (आत्ता सुद्धा आहे). शिरूरच्या घरातील सगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि विविध वस्तू फक्त विठाईच्या पसंतीच्या आणि आवडीच्या आहेत. घरातील प्रत्येक वस्तूवर विठाईची विशिष्ट छाप आणि गोष्टी वर तिचा जिव्हाळा होता. लहानपणी आम्ही टीव्ही अन्टेना सेट करायचो. त्यासाठी मी अन्टेना आणि विठाई टीव्ही सेट करायला (co-ordination)समन्वय साधायचो. तोच समन्वय आजही आयुष्याची कोडी सोडवायला कामी येतो. घरा सोबत तिचे वेगळेच ऋणानुबंध आहेत. लहान असून सुद्धा माझ्या सुखा दुःखा मध्ये पाठीच्या कण्या प्रमाणे भक्कम आधार आहे. प्रत्येक माणसातील चांगल्या गोष्टी वेचण्याचा हा गुण तिने लहानपणा पासून जोपासलाय. विठाई बहीण, मुलगी, पत्नी, सून, आई, आणि आयुष्यातील विविध नाती लीलया पेलून, आणि सुंदर रित्या निभावते. गोष्टीचे योग्य नियोजन कसे करावे हे तिच्या कडून मी शिकतोय.
माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसा निमित्त आभाळभर शुभेच्छा!!!
द्वितीय पुष्प – गीता ताई
ताई या शब्दातच आई हा शब्द उच्चारला जातो. आणि माझी ताई म्हणजे प्रेम आणि माया यांचे मूर्तिमंत रूप. तिच्या बोलण्यात जिव्हाळा तर ओथंबून वाहत राहतो. मी ताईशी कोणत्याही विषयावर बोलू शकतो. लहानपणी मी आणि ताई नवीन घराच्या बांधकामा वर पाणी टाकण्यासाठी जात असू. त्या सोबत कामगारांना चहा सुद्धा नेत असू त्या वेळे पासून मी ताईचे अनुकरण करतो. भिंतींना पाणी कसे टाकावे इथून सर्व ताईचे बघून शिकलो. पण तिने कधी शिकवणीची फी घेतली नाही हा! लहानपणी शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ताईचे सर्व पुस्तके मला भेटत. आमचे काका प्रत्येक पुस्तकाला पुठ्ठा लावायचा हे शिकवायचे. पुस्तके एक वर्ष जुनी असली तरी ही व्यवस्थित वापरल्या मुळे नवीन असल्या सारखी वाटायची. ताईने टापटीप हा गुण लहानपणा पासूनच जोपासलाय. बोलक्या स्वभावामुळे ताईचे शाळेत आणि पुढे कॉलेज मध्ये मित्र-मैत्रिणी खूप होत्या. आम्ही एकदा चाकूरला यूथ फेस्टिव्हल सुद्धा गेलो होतो. तिला वाचनाची खूपच गोडी असल्याने मी सुद्धा वाचनालयात जाऊन पुस्तके वाचायला लागलो. माझ्यातील अनेक चांगल्या सवयी आणि पुस्तका बद्दल रूची ताई मुळे निर्माण झाली. तिने माझ्या चांगल्या वाईट काळात, कडू गोड प्रसंगात कणखर राहून साथ दिली आहे आणि मार्गदर्शक केले आहे. लिखाणात सतत प्रोत्साहन दिले. ताई पत्नी, आई, बहीण, सून, मैत्रिण, आणि वहिनी अश्या सर्व जबाबदार्या मन:पूर्वक पार पडत असते. ती स्वत:हून कधी फोन करणार नाही पण योग्य वेळी तिचा पहिला फोन येतो. सगळ्यांच्या अडचणी सोडवण्यात अतिशय पटाईत आहे. कुशाग्र बुद्धी आणि परिस्थिती मुळे निर्माण झालेला संयम याचा उपयोग करून जीवनात पुढे मार्गक्रमण करते आहे. जगावेगळे निर्णय घ्यायला ताई मागे पुढे पाहत नाही. तिरुपती बालाजी इथे पूर्ण केस दान करण्याचा निर्णय सुद्धा असाच जगावेगळा होता. पूर्ण केस काढल्यावर एक वेगळंच तेज दिसत होतं चेहर्यावर. मुलं महत्त्वाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला असताना उगाच वर्षभर टेन्शन न घेता, अति अपेक्षा न ठेवता सर्व प्रयत्न करणारी आई ही वेगळीच भासली. लहानपणा पासून एकत्र असल्याने ताई वर आणखी लिहिता येईल पण सध्या तरी संक्षिप्त लिहिले आहे. एकच तक्रार आहे ताई लेखन, चारोळी चांगली करत असताना सुद्धा जास्त काही लिहित नाही.
अश्या माझ्या कणखर, संयमी, आणि मार्गदर्शक बहिणीला 8 मार्च जागतिक महिला दिन निमित्ताने द्वितीय पुष्प देऊन अभिवादन करतो!!!
तृतीय पुष्प – सौ. मनीषा उत्तरवार – बलशेटवार
एखाद्या व्यक्तीला जर गुणावरून टोपण नाव द्यायचे झाले तर माझ्या या ताईला मी मेहनती हे टोपण नाव देईन. मनीषा ताईचा जन्म २ एप्रिलला झाला. लग्न झाल्या नंतर काही वर्षा नंतर तिला खूप त्रास झाला. धार्मिक अधिष्ठान असेल तर कोणत्याही संकटात मार्ग सापडतो. तर ताईला नांदेड येथील गुरुचे मार्गदर्शन घेतल्या नंतर तिने शिवणकाम कलेत प्राविण्य मिळवले. कोणतीही कला माणसाला दु:ख विसरायला भाग पाडते. मग ताई ने मागे वळून बघितले नाही. त्यात तिला खूप डबल फायदा झाला. कारण बोलकी आणि मन कवडी असल्याने भेटणारी प्रत्येक महिला ग्राहक म्हणून यायची आणि जाताना मात्र मैत्रीण होऊन जायची.
त्यामुळे सगळ्या ओळखीच्या माणसांच्या अडचणी ओळखणे आणि त्यांना बोलते करणे. जमेल तशी मदत करणे. हे तिला आवडते. तिची दुसरी आवड म्हणजे घरातील कुंड्यांची निगा राखणे. घरी आलेल्या प्रत्येकाला नवीन-नवीन स्वयंपाकातील नवीन डिश बनवून खाऊ घालणे ही तिची दुसरी ओळख आहे. प्रत्येक गोष्टीत ताईचा नंबर पुढचा आहे. तुम्ही नांदेडला गेलात आणि तुम्हाला शॉपिंग करायची आहे. ताईला एक फोन केला तरी दुकानांच्या नावाची जंत्रीच सांगते. धार्मिक कार्यक्रमात सुद्धा एकदम पुढे राहते. नांदेड येथील मूक्तेश्वर आश्रम स्थित श्री संत पाचलेगावकर महाराज यांच्या वर तिची खूप श्रद्धा आहे. तिथल्या सगळ्या गोष्टी ती आनंदाने करते. तेथील आताचे महाराज कधीतरी खास ताईच्या हातचे जेवणासाठी घरी येतात. पूजा, अर्चना आणि इतर धार्मिक कार्यक्रमात तिचा कायमच पुढाकार असतो. नांदेड मध्ये कोणतेही काम सांगीतले तर मनीषा ताई लगेच हो म्हणते आणि मागे पुढे न पाहता काम करून टाकते. कामात हयगय कधीच करत नाही. मागच्या वर्षीच ताईला सून आली. सुनेचे सुद्धा अतिशय लाड करते. तिचे आणि सुनेचे नाते अतिशय परिपक्व असून वेगळेच भासते. एक वेगळ्याच प्रकारची सासू आपल्या नजरेला पडते.
ताईचा संपर्क खूप दांडगा आहे. मैत्रिणीची तर अतिशय लाडकी आहे. त्यामुळे तिला भेटायला तिच्या घरी जायची गरज नाही नातेवाईकांच्या समारंभात, लग्नात, कार्यक्रमात हमखास भेट होते. भेटल्यावर प्रसन्न मनाने तुमचे स्वागत करणार आणि हसतमुख होऊन बोलणार. हीच तिची खरी ओळख आहे. बहिणींची आणि भावाचे लग्न जमावण्या साठी ताईने खूप मेहनत घेतली आहे. बहीण भावा मध्ये सगळ्यांना अतिशय प्रिय आहे. माहेरी काही कार्यक्रम असेल तर लगेच बहिणीची गॅंग घेऊन गाडी करून गावी येणार. दंगा मस्ती करून वापास जाणार. आम्ही लहानपणी येळवस, भवानवाडीला जाताना खूप धिंगाणा घालायचो.
बालपण अतिशय सुंदर गेले पण वडीलांचे निधन झाल्यावर भरपूर संघर्ष करावा लागला. तिच्या चेहर्याकडे पहिल्यावर कष्टाची जाणीव होत नाही पण विचारातून मेहनत स्पष्ट जाणवते. आज ही आमच्या भाऊजी च्या खांद्याला खांदा लावून मेहनत करते. मनीषा ताईला सुद्धा अतिशय भाऊजीची सुंदर साथ लाभली आहे. सुंदर भांडे तयार झाल्यावर फक्त कुंभारालाच माहिती असते किती संघर्ष केला. लहानपणा पासून ते आत्ता पर्यंत परिस्थिती सोबत संघर्ष करत आली आहे. जो संघर्ष करत असतो त्याचे जीवन फुलत जाते. शिवणकाम करत, घरचे व्याप सांभाळत, संपर्कात राहत मनीषा ताईचे जीवन भाऊजी, दोन मुले, सून यामध्ये फुलत आहे. ताई एकटी कधी राहत नाही. सतत कुटुंबा सोबत किंवा बहिणी किंवा मैत्रिणी किंवा नातेवाईक यांच्या घोळक्यात राहते.
अश्या माझ्या सतत हसतमुख असणाऱ्या, मदतीसाठी तत्पर असणाऱ्या\, आणि कष्ट करणाऱ्या बहिणीला जागतिक महिला दिन आणि आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तृतीय पुष्प देऊन अभिवादन करतो!!!
Views: 369