चित्रपट परीक्षण/रिव्यू: ‘Tanhaji: The Unsung Warrior’

श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य उभे केले ते चतुराई, कर्तबगारी, खंबीर नेतृत्व, विचाराची कल्पकता, लढाऊपणा, गनिमी कावा, पराकोटीचा पराक्रम, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाख मोलाची  स्वराज्या साठी घाम गाळणारी, पराक्रम आणि बलिदान देणारी माणसं त्यांनी जमा केली. त्यापैकी एक होते “नरवीर तानाजी मालुसरे”. हे नाव उच्चारताच फक्त एक नाव आठवते ते म्हणजे सिंहगड. त्यासोबत महाराजांचे प्रसिद्ध विधान आठवते “गड आला पण सिंह गेला”.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कित्येक मावळे, सरदार, गनिमीकावा तंत्र, विविध आरपारच्या लढाई, किंवा त्यांच्या मोहिमे वर चित्रपट निघू शकतो. महाराजांनी आणि स्वराज्याच्या शिलेदारांनी असे कर्तृत्व आणि शौर्य त्यावेळेस गाजवले होते. अफाट कर्तृत्व, धैर्य, शौर्य, पराक्रमा मुळे “नरवीर तानाजी मालुसरे” यांचे नाव इतिहासात कोरले आहे. या चित्रपटात अजय देवगण यांनी तान्हाजी यांची भूमिका साकारली आहे. आपल्या दमदार अभिनयाने या ऐतिहासिक पात्राला योग्य न्याय दिला आहे. या भूमिकेसाठी अजय अतिशय योग्य असा अभिनेता आहे. अजयने आपल्या डोळ्यांचा, संवाद फेकीचा, अभिनयाचा उपयोग करून व्यक्तिरेखा साकारण्याचा आलेख उंचावत नेला आहे. एकदम कडकडीत, चुरचुरीत संवाद अजयने लीलया, सहजरीत्या आणि प्रभावीपणे उच्चारले आहेत. पूर्ण चित्रपट ‘तान्हाजी’ या व्यक्तिरेखे भोवती फिरतो. एक प्रेमळ पती, पिता, मित्र, सहकारी, लढवय्या सेनांनी, निष्ठावान, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात चांगल्या पद्धतीने उभारला आहे. “तान्हाजी” च्या विविध छटा टिपण्यात अजय अभिनेता म्हणून यशस्वी झाला आहे.

तान्हाजीच्या बरोबर उलट “उदयभान राठोड” आहे. निर्दयी, सूडबुद्धी, खुनशी, घातकी, दगाबाज, अक्षरश: अति दुष्ट आहे. ही व्यक्तिरेखा सैफ अली खानच्या अंगात भिनली आहे. तुम्ही या व्यक्तिरेखेचा द्वेष कराल इतका नैसर्गिक अभिनय सैफ ने साकारला आहे. मगरीचे मास खाणारा, शत्रूला चकित करणारा, पहारेकरी चुकला तर मृत्यूदंड देणारा, विधवेला पळवून आणणारा खुनशी खलनायक उत्कृष्ट उभारलेला आहे. “उदयभान” आणि “तान्हाजी” यांच्यातील संवादाची जुगलबंदी चित्रपटाला वेगळ्या उंची वर नेतात. “सैफ” ने खलनायकाची भूमिका अतिशय ताकदीने उभारलेली आहे. त्याची संवादफेक, अभिनय, वेषभूषा आणि डॉयलॉगबाजी मुळे या भूमिकेला वेगळीच उंची लाभली आहे. “दख्खन की हवा चली तो उठा देना” या वाक्यात तो भाव खाऊन जातो. भविष्यात सैफच्या या भुमिकेला विविध पुरस्कार नक्कीच मिळतील.

उत्तम सहकलाकाराची फौज या चित्रपटात आहे. शरद केळकर, पद्मावती राव, लुकॅ केनी, अजिंक्य देव, नेहा शर्मा, शशांक शेंडे आणि देवदत्त नागे. सगळ्यांनी आपले काम चोख बजावले आहे. पद्मावती रावचा “यशस्वी भव”, “जब तक कोढाणा पर फिर से भगवा नहीं लहराता, हम जूते नहीं पहनेंगे।” हा संवाद जबरदस्त आहे. त्यांनी डोळ्याचा, नजरेचा, अभिनयाचा उपयोग करून करारी जिजाऊ उभारली आहे. औरंगजेब बुद्धिबळ खेळतानाचा संवाद आणि दृश्य एकदम चपखल आहे. अतिशय संयत अभिनयाने शरद केळकर यांनी “छत्रपती शिवाजी महाराज” ही भूमिका पडद्यावर जिवंत केली आहे. शरद यांचे कास्टिंग अतिशय योग्य आहे. मित्र, छत्रपती, राजा अशी उत्तम भूमिका शरदने साकारली आहे. शशांक शेंडे यांनी शेलार मामा आणि देवदत्त नागे यांनी सूर्याजी मालुसरे उत्तम भूमिका साकारल्या आहेत. काजोल यांनी “सावित्रीबाई मालुसरे” ही व्यक्तिरेखा साकारली आहे. काजोल ची चित्रपटातील व्यक्तिरेखेची लांबी जरी कमी असली तरी काजोल चा वावर सुखकारक आहे. “कुत्ते की तरह जीने से बेहतर हैं… शेर की तरह मरना।” हे वाक्य परिणाम कारक उतरले आहे. अजय-काजोल ची पती- पत्नीची जोडी शोभून दिसते. त्यामुळे जोडी प्रभावी होऊन दोन्ही व्यक्तिरेखेला न्याय देते.

ओम राऊत यांनी अगोदर “लोकमान्य टिळक” हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. चांगला चित्रपट होता. “तान्हाजी” या चित्रपटाची धुरा सुद्धा ओम राऊत यांनी आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळली आहे. चित्रपटाचा पहिला भाग थोडा रेंगाळला आहे आणि संथ आहे. पण खरी कमाल दुसऱ्या भागात आहे. मध्यंतरा नंतर दुसर्‍या भागात दिग्दर्शकाने अतिशय उत्कंठा वर्धक, उत्तम मांडणी आणि VFX ईफेक्टची उधळण केली आहे. काही-काही ३डी ईफेक्ट अंगावर काटा आणतात. शेवटच्या लढाईचा प्रसंग जोमदार आणि एकदम करकरीत झाला आहे. लढाईचे एक्शन Sequences अतिशय उत्तम आहेत. चित्रपटात ४ श्रवणीय गाणी आहेत. ३ गाणी चित्रपटाच्या व्यवस्थित आणि उचित जागी आहेत. पण पार्श्वसंगीतात उणिवा आहेत. ऐतिहासिक कथांना दमदार पार्श्व संगीत हवेच. अश्या भव्य श्रेणीच्या चित्रपटातील प्रत्येक पात्राला, दृश्याला परिणाम कारक होण्यासाठी उत्तम पार्श्वसंगीत हवेच. पहिल्या भागाची व्यवस्थित मांडणी करून लांबी कमी केली असती तर चित्रपट आणखी धमाकेदार झाला असता. 

काही गोष्टी खटकतात. त्यातील एक साधू लाकडी कुबडी फेकून मारतो ते दृश्य काही पटले नाही. तान्हाजी उदयभान पुढे जाऊन गाणे गाऊन नृत्य करतात. ही दुसरी गोष्ट काही पटत नाही. प्रत्येक भूमिकेला स्थापित करण्या अगोदर थोडा वेळ दिला पाहिजे होता. ऐतेहासिक कथा असल्याने थोडी सिनेमॉटीक लिबर्टी घेतली आहे पण जास्त उत्कंठावर्धक दाखवण्याच्या नादात कथेत जास्त तोड मोड केली नाही हे विशेष. जशी कथा आहे तशी दाखवण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे त्याबद्दल दिग्दर्शकाचे अभिनंदन.

पण अजय-सैफ चा उत्तम अभिनय, ऐतिहासिक कथेची तोडमोड न करता चांगले दिग्दर्शन, अंगावर शहारे आणणारे लढाईचे उत्कृष्ट चित्रण, पटकथेला दिलेला योग्य न्याय आणि चांगले छायाचित्रण, सिनेमॅटोग्राफी, वेषभूषा, दमदार सादरीकरण, चांगली एडिटींग, उत्तम कास्टिंग, एका स्वदेशाभिमानी लढवय्याचे दमदार चित्रीकरण, एक उत्तम कलाकृती यामुळे तुम्ही चित्रपट कमीत कमी एकदा बघाच. चित्रपट बघितल्या नंतर देश प्रेम उफाळून आल्याशिवाय राहणार नाही. मी या चित्रपटाला ३.५ स्टार देतो. १.५ स्टार कमी केले आहेत. कारण म्हणजे पहिल्या भागाच्या संथ गतीला, पार्श्वसंगीत आणखी चांगले होऊ शकले असते, इतर कलाकारांना थोडा वाव देता येऊ शकला असता आणि VFX ईफेक्ट आणखी चांगले होऊ शकले असते.

Views: 40

Leave a Reply