ब्लॉग : चित्रपट परिक्षण – सीता रामम – युद्धस्य पत्र प्रेमकथा

“युद्धस्य कथा रम्य:” अशी म्हण आहे. युद्धाच्या गोष्टी ऐकावयास फार गोड वाटतात. आणि त्या सोबत एक प्रेम कथा दाखवलेली असेल तर या दोन्हीच्या खास संयोगातून एक प्रकारचे उत्तम समीकरण तयार होते. ऐतिहासिक युद्ध आणि प्रेम कथा या प्रकारातील चित्रपट आहे.

एखाद्या लग्न न झालेल्या व्यक्तीला एक मुलगी पत्नी म्हणून पत्र पाठवत असेल तर काय घडू शकते?. पत्र पाठवणे सुद्धा एक कला आहे. जुन्या काळी पत्र पाठवणे विचारपूस करण्याचे साधन होते.  त्यात भावनेने ओथंबलेले, परिस्थितीची जाणीव करून देणारे, मनस्थितीचे सुरेख वर्णन असल्यास काय बघायचे. आपल्या प्रिय आणि आप्त जणांना विचारपूस करता येत होती आणि ती पत्र जतन करून ठेवल्यास त्याच्या सुरेख आणि सुंदर आठवणी आयुष्य भरा साठी पुरतात. याच पत्राचा सुरेख वापर या चित्रपटात केला आहे.

चित्रपटात दुलकर सलमान, मृणाल ठाकुर, रशमिका मंदना अशी तगडी मुख्य कलाकाराची फळी आहे. दुलकर याच्या सहज सुंदर वावर आणि अभिनय उत्कृष्ट आहे. चित्रपटातील रामची भूमिका दुलकर साकारत नाही तर अक्षरश: जगतो. एक कर्तव्यनिष्ठ लेफ्टनंट, एक तरल भावनिक मनाचा प्रियकर, उत्कृष्ट व्यक्ती अशी सगळी व्यक्तिमत्वातील कंगोरे उत्तम दृष्ट्‍या साकारले आहे. त्याची भूमिका ओढून-ताणून सादर केली नाही तर ती अत्यंत शांत पाण्याप्रमाणे सहजपणा आणि हिवाळ्यात मंद अग्निच्या आचेवरील  सुरेखपणा जाणवतो. फक्त नजरेतून, अभिनयातून, हाव भावातून साकारलेला राम मनाला थेट भिडतो.

मृणाल ठाकुर सुद्धा चांगला अभिनय केला आहे. मृणाल आणि दुलकर ची chemistry अतिशय उत्तम आहे. सीता महालक्ष्मी आणि प्रिंसेस नूरजहाँ असे एकच पात्र तिने  छान साकारले आहे. ती प्रिंसेस असून एका सामान्य माणसाच्या प्रेमात पडते आणि प्रेम निभावते हे उत्कृष्ट रित्या सादर केले आहे. अज्ञात असून सुद्धा पत्नी म्हणून प्रेम पत्र पाठवते हे तर अतिशय बेमालुम पणे वापरले आहे. साडी परिधान केल्या मुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. आणि ती यात अतिशय संयत आणि सुंदर दिसली आहे. आपल्या प्रियकरा सोबत घालवलेले क्षण अतिशय सुंदररित्या चित्रित झाले आहेत. राम आणि सीतालक्ष्मी मधील संवाद आणि प्रेम उतरोत्तर रंगत जाते. या दोघांना स्क्रीन वर पाहणे डोळ्यांना सुखकारक आहे.  

एका आर्मी लेफ्टनंटला गुन्हेगारांना आरामात पकडता येत असते पण त्याच आर्मी लेफ्टनंटला एका प्रिंसेस ची ओळख पटू नये ही सोपी गोष्ट प्रेक्षकांना समजत नाही. प्रिंसेस भारतात राहून कुवेत मध्ये कोणता आणि कसा बिझनेस करत असते हे कळत नाही. या दोन आणि इतर काही गोष्ट सोडली तर या चित्रपटात काही चुका नाहीत. मध्यंतरी चित्रपट थोडा रेंगाळतो. एक पाकिस्तानी मुलगी एका प्रसिद्ध भारतीय व्यक्तीची लंडन मध्ये कार जाळते. तेथून ते क्लायमॅक्स पर्यंत चित्रपट बांधून ठेवतो. आफ्रीन ही व्यक्तीरेखा रश्मिकाने साकारली आहे आणि या पात्राला व्यवस्थित न्याय दिला आहे. तिचा नजरेतूनच चित्रपट पुढे सरकतो आणि एक-एक गोष्ट उलगडत जाते. आफ्रीन, बालाजी आणि दुरजोय मध्ये विनोदाची पेरणी छान केली आहे. अंसारी साकारणारा, सचिन खेडेकर ने तारीक अली, बालाजी, सुमंतू ने विष्णु शर्मा, वेनेला किशोर ने रंगवलेला दुरजोय शर्मा, विकास शर्मा, प्रकाश राज, मुरली शर्मा, आणि इतर ही सगळी पात्र चित्रपटात येतात आणि चोख काम करून जातात. सह-कलाकाराचे अतिशय सुंदर काम झाले आहे.   

या चित्रपटात दिग्दर्शकाने संहितेवर अतिशय संयत आणि छान काम केले आहे. पटकथा सविस्तरपणे खुलवून सांगण्यात दिग्दर्शक “हनु राघवपुडी” यशस्वी झाला आहे. कथेत जास्त काही चुका नाहीत. कथेत शेवटी एवढे बाकदार वळणे आणि कंगोरे आहेत की शेवटची ३० मिनिटे जबरदस्त आहेत आणि प्रेक्षक या सगळ्या अचंबित होतो. सामान्य व्यक्ती, राज घराणे, फुटीरवादी, गुन्हेगार, सेना, प्रेम, आतंकवाद या सगळ्यांची मिळून कथा तयार होते पण कुठेही एकला झुकते माप दिले नाही. अवांतर भाष्य टाळले आहे. या सगळ्यात प्रेम कथा मात्र अतिशय व्यवस्थित फुलत जाते आणि परिणाम कारक होते. या साठी दिग्दर्शकाला १०० पैकी १०० गुण आहेत.

“विशाल चंद्रशेखर” यांची गाणी अतिशय श्रवणीय आहेत. गाणी तेलुगुत असल्याने मला त्यांचा अर्थ कळला नाही पण आशय मात्र व्यवस्थित कळला. गाणी उगाच घुसडलेली नाहीत आणि कंठाळ्या आणणारे संगीत नाही. कथेनुसार गाणी झालेली आहेत. सिनेमॅटोग्राफी चित्रपटाला सुसंगत आणि परिपूर्ण आहे. निर्मिती मूल्य, संवाद, कॉस्च्युम, संगीत, पार्श्वसंगीत अतिशय जमून आले आहे. थीम song सुद्धा दोघांची मनस्थिती संगीतातून जाणवते. पार्श्वसंगीत चित्रपटात जीव ओततो. शेवटी चित्रपटात प्रत्येक पात्राला न्याय मिळतो. शेवटी-शेवटी चित्रपट रडवतो.  

सस्पेन्स, वळणदार आणि बाकदार कथा, आशय,  क्लास पटकथा, उत्तमोतम लोकेशन. कर्णमधुर गाणी, साजेशे पार्श्वसंगीत, मुख्य पात्राचा उत्कृष्ट अभिनय, आणि स्वभावातील आणि व्यक्तिरेखेतील विविध कंगोरे, श्वास रोखून धरणारी शेवटची ३० मिनिटे आणि सह कलाकारांची फौज या मुळे या चित्रपटाला मिळतात ५ पैकी ४ स्टार. चित्रपट लांबी आणि वर लिहिलेल्या काही चुका या मुळे चित्रपटाचा १ स्टार कमी होतो. चित्रपट एकदा तरी पहावा असाच आहे. प्रेम कथा आवडत असेल तर नक्की २-३ नक्की बघाल.       

Views: 351

Leave a Reply