कविता: वाईट भूतकाळ सोडून दे

मात्रा वृत्त – मध्यरजनी (गालगागा × ४)

जागलेल्या आठवांचे माप घेणे सोडुनी दे
भूतकाळाच्या चुकांची मोजदादच खोडुनी दे
मैफिलीची गोड गीते वाटती ना आळवावी
पाश प्रीतीचे चुकीचे जोडलेले तोडुनी दे

धाडलेली प्रेम पत्रे फोल गेली फाडुनी दे
गाळलेल्या आसवांचे व्याज आता फेडुनी दे
शोधलेले शिंपले मोती मला दावू नको तू
खर्चलेले नेटके क्षण आपले मज जोखुनी दे

सोसल्या कडवट क्षणांची याद आता टाकुनी दे
छेडलेले बासरीचे सूर आता मोजुनी दे
पोळल्या गेल्या जिवाला आस तू दावू नको रे
बरसलेले पावसाळी चांगले क्षण त्यागुनी दे

सांडलेल्या आठवांना फक्त आता वेचुनी दे
मोरपंखी भावनांचे निबर जाळे तोडुनी दे
भावनांशी खेळणारे फास तू फेकू नको ना
चाललेले खेळ सारे एकदाचे मोडुनी दे

नोट : ही कविता गोदातीर्थ उपक्रमात सरावासाठी लिहिली आहे.
#गोदातीर्थ_समूह
#गोदातीर्थ

Views: 53

Leave a Reply