रूपाने वैभवी दिसायला चारचौघी सारखी. रंगामुळे सामान्य दिसणारी, शिक्षण बेताचे, पण परिस्थिती ने बरेच काही शिकलेली. माणसाच्या गर्दीत डाव्या रूपा मुळे उठून न दिसणारी. शारीरिक व्यंगामुळे कधी-कधी विचित्र वाटणारी. पण देव एका हाताने घेतो आणी दुसर्या हाताने देतो. रूपाने जरी डावी असली तरी ती बोलण्यात चतुर आणि कामात हुशार. तिला कामाचा उरक भरपूर. मुख्य म्हणजे आहे त्या परिस्थितीशी जुळवून राहणारी. टापटिप राहून घर सावरणारी.
सुरेश बऱ्याच नवसा-सायासाने झाल्यामुळे खुप लाडाकोडात वाढला होता. सुनंदाबाई ने सुरेशला अति लाडावून ठेवल्यामुळे तो बिघडला होता. यामुळे तो आत्मकेंद्रित झाला होता. सुरेशला स्वत: शिवाय काही दिसत नसे. शिक्षण कमी आणि पुढे काही करायची इच्छा नसल्यामुळे आळशी झाला होता. सुरेश छोटाश्या हॉटेल मध्ये नोकरी करून महिना पुढे ढकलत असे. त्याने कधी स्वत:चा व्यवसाय टाकायचा प्रयत्न केला नाही की कधी पैसे वाचवून बचत केली नाही. तिरकस स्वभाव असल्यामुळे सतत त्याचे सगळ्या सोबत भांडण व्हायची.
सुरेश आणि वैभवी यांचे लग्न झाले. दोघांचा स्वभाव जुळत नसत. नव्याची नवलाई संपल्या नंतर त्यांची सतत भांडणे व्हायची. सुरेशला वैभवीच्या डाव्या रूपामुळे तिरस्कार वाटायचा. त्यामुळे पती-पत्नीचे विचार कधीच जुळले नाहीत. वैभवीने मिळून मिसळून राहण्याचे बरेच प्रयत्न केले. पण सुरेशच्या मनातील अडी ती काही काढु शकली नाही. दिवसा मागून दिवस जात होते. त्यांना मुलगा झाला. पण त्या दोघा मधे प्रेम काही फुलले नाही.
वैभवी स्पष्टवक्ती असल्यामुळे सासरची लोक दुखावली गेली. मन नाही जुळली तर मनस्ताप हा होणारच. मग सासराच्या लोकांनी वेळ आणि जागा मिळेल तेव्हा दोघांच्या संसारात तेल टाकून आग धगधगत ठेवली. त्यामुळे दुरावा आणखीच वाढला. मनस्तापाची जागा आता शिव्याशापाने घेतली.
सुरेशला त्यांच्या जवळच्या माणसांनी वैभवी विरुद्ध भडकावल्यामुळे दोघांच्या नात्यात आगच भडकली. परंतु प्रत्येक गोष्टीला कमाल मर्यादा असतात. वैभवीने सुरेश पासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. वैभवी त्याच घरात एका खोली मधे मुलगा नरेश सोबत वेगळे राहू लागली. सुरेशला तिच्या आणि नरेशबद्दल कधी प्रेम वाटत नसल्यामुळे त्याने काही विरोध नाही केला. सुरेशने जबाबदारी सुद्धा झटकून दिली. सुरेश स्वत: कमवता असल्यामुळे त्याची आई देखभाल करायची. त्यामुळे सुरेशला खाण्यापिण्याची काही चिंता नव्हती. आई नंतर भावाने खाण्यापिण्याची व्यवस्था केली. त्यामुळे सुरेशने वैभवीला कधी जवळ करण्याचा प्रयत्न केला नाही.
वैभवीच्या माहेराला कोणीच नसल्यामुळे तिकडून काही मदतीची आशा नव्हती. वैभवी तिथेच छोटी-मोठी कामे करून उपजीविका करत असे. भरपूर हालअपेष्टा सोसून तिने नरेशला वाढवले. तिच्या समोर आता फक्त मुलगा नरेशच आशेचा किरण होता. जसा नरेश मोठा होत गेला तशी त्याला परिस्थितीची जाणीव झाली. नरेशने आईचा संघर्ष फार जवळून बघितल्यामुळे त्याने आईची उतारवयात देखभाल केली. नरेशच्या नोकरी साठी ते दुसर्या शहरात स्थायिक झाले.
आयुष्याच्या संध्याकाळी सुरेशला वैभवीची खुप आठवण आली. 30 वर्षानी भेट झाली. वैभवी ने सुरेश आणि मुलांना भेटण्या पासून अडवले नाही. सुरेश वैभवी ला भेटायला तिच्या घरी अधुन मधून जायचा. उलट नरेश च्या लग्नात वैभवीने सुरेशला पुजेचा मान दिला. वैभवी ने जास्त जवळीक किंवा दुरावा दाखवला नाही. सुरेश 1-2 दिवस राहून परत जायचा. तिने कधी रहायचा आग्रह केला नाही. सुरेशला तिथे 2 दिवसापेक्षा जास्त दिवस काही राहिला नाही. आयुष्यात मोठ्या प्रमाणात मीठ पडले होते की 2 दिवसाच्या सहवासाने खारटपणा कमी होणार नव्हता. आता वैभवी ने सुरेशचे दूर राहणे पचवले होते. एकदा संतूरची तार तुटून जुळवल्या नंतर प्रीतीचे जुने सुर उमटत नाहीत. सुरेश आणि वैभवीचे सुर काही जुळले नाहीत. नरेशला वडिलांचा स्वभाव माहित होता. अधुन-मधून भेटून सुद्धा सुरेशचा एकाकीपणा कायम राहिला.
असेच एक दिवस वैभवीच्या घरून परतताना उदास वाणे सुरेश गाडीची वाट पाहत बसला होता. त्याला मग मागील काही वर्षाचा प्रवास आठवला. वैभवी प्रेग्नेंट होती त्या वेळेस सुद्धा सुरेश ने काहीच जबाबदारी घेतली नाही. आठव्या महिन्या पर्यंत ती काम करत राहिली. वैभवीच्या मैत्रिणीच तिची काळजी घेत. सासरच्या लोकांनी तिच्या कडे ढुंकून सुद्धा पाहीले नाही. तिचा नवराच तिची देखभाल घेत नसेल तर कोण लक्ष्य देणार. वैभवीच्या चांगल्या वागणुकी मुळे एक-दोन जणांनी थोडी मदत केली. मुलगा जन्माला आला त्या वेळेस सुरेश आणि त्यांच्या घरच्यांनी कोड कौतुक तर सोडा चेहरा सुद्धा बघितला नाही. त्यामुळे वैभवी खुपच दुखावली. तिने याच वेळी निर्णय घेतला वेगळे राहण्याचा. या वेळेस मात्र सुरेश साफ चुकला. तो आपल्याच धुंदीत होता. आपल्या स्थितीला कोण जबाबदार आहे याची उजळणी मनात करत होता. विचित्र स्वभाव, जबाबदारी टाळणे, नाकरतेपणा, पत्नी बद्दल असणारा द्वेषपूर्ण राग आणि मुलाबद्दल नसलेले प्रेम यामुळे सुरेशची अशी परिस्थिती झाली. सुरेशच जीवनात काय मिळवायचे होते आणि काय केले याचा काही जमाखर्चात मेळ बसत नव्हता. बऱ्याच लोकांनी सुरेशला उदास, विचार मग्न आणि शून्य दृष्टीत हरवलेला बघितला. सुरेशच्या विचित्र स्वभावामुळे सहसा त्यांचे कोणा सोबत पटत नसे. त्यांचे साध्या कामगारा पासून ते गावाच्या प्रधान पर्यंत सगळ्या सोबत भांडण व्हायचे. चिडखोर वृत्ती आणि एकाकीपणा यांचे मिश्रण होऊन विचित्र स्वभाव आकाराला आला होता. सुख दु:ख वाटण्यासाठी कुणी मित्र नव्हते. सुरेशने कधी मित्र बनवण्याचा प्रयत्न केला नाही.
सुरेशला उतारवयात कोणीच उरले नाही. जो पर्यंत पैसा आणि ताकद होती तो पर्यंत आईने आणि भावाने साथ दिली. पण मनाची साथ करायला कोणीच उरले नाही. त्यामुळे चिडचिडही वाढली आणि एकटेपणा छळू लागला. उतार वयात कोणाचीच मैत्री, साथ नसल्यामुळे एकाकीपणा खाऊ लागला. आयुष्याच्या जमाखर्चातून फक्त एकटेपणाची वजाबाकी शिल्लक राहिली.
Views: 73