हणमंतला आज खूपच आनंद झाला होता. कारण लहान हणमंतला त्याची आई उद्या आठवडे बाजाराला घेऊन जाणार होती. कारण आठवडे बाजार म्हणजे नुसती धमाल. खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ, खेळायला छोटे-मोठे आकाश पाळणे, रहाटपाळणे, आणि बरंच काही. हणमंतला मात्र आकाश पाळण्या मध्ये बसायला अतिशय आवडायचे. हवेवर स्वार होऊन पाळणा जसा-जसा वर जायचा तसे-तसे हणमंतला छान वाटायचे.
हणमंत दुसर्या दिवशी सकाळी लवकर उठून तयार होतो. सकाळ पासून हणमंत अतिशय खुष असतो. आई तयार होई पर्यंत त्याच्या गल्लीतील मित्राला सुद्धा सांगून येतो की तो आई सोबत आठवडे बाजाराला जाणार आहे. दुपारचे जेवण, पत्रावळी, आणि इतर सामानाची बांधाबांध झाल्यावर दोघंही निघतात. त्यांना आठवडे बाजारात पोहोचायला दुपार उलटते.
आठवडी बाजार मध्ये पत्रावळी विकून आई संसारासाठी थोडेफार पैसे जमवण्याचा मानस करते. लग्नाचा सीजन चालू असल्याने पत्रावळीचा खप वाढेल हा विचार करून आईने पत्रावळीचा जास्त माल आणलेला असतो. दोघंही बाजारात मोक्याच्या ठिकाणी जागा शोधून हणमंत आणि त्याची आई पत्रावळी विकण्यासाठी छोटेसे दुकान थाटतात. आणि हणमंत दुपारचे जेवण करून करतो.
पण पत्रावळीची जास्त काही विक्री होत नाही. माल तसाच पडून राहतो. त्यामुळे आई थोडी चिंतित होते पण ती चेहर्यावर काही दाखवत नाही. पण हणमंतला कधी एकदा दुकान आवरून आकाश पाळण्यात बसायला जातो असे वाटते. आई कमी विक्री झाल्या मुळे दुकान आवरायला घेते. त्यानंतर दोघंही आठवड्याचा किराणा सामानाची खरेदी करण्यासाठी जातात. त्यात बाजूला वडापावचा गाडा असतो. तिथे हणमंतचा वडापाव खातो. बाजारात ओळखीचे लोक भेटतात आणि नवीन गाठी-भेटी होतात. तिथे हणमंतला समोर आकाश पाळणा दिसतो. हा तर नेहमीच्या पाळण्या पेक्षा मोठा आकाश पाळणा असतो. हा तर बाजारात नवीन आलेला दिसतोय. त्यात बसण्याचा हणमंत हट्ट करतो.
हणमंत – दोघंही आकाश पाळण्यात बसू?
आई – आत्ता आकाश पाळणा नको. पुढच्या वेळेस आले की आकाश पाळण्यात बसू.
हणमंत – मला काही माहीत नाही मला आत्ताच बसायचे आहे.
आई लहान हणमंतच्या हट्टा समोर गुडघे टेकते आणि आकाश पाळण्याचे एकच तिकिट काढून देते. हणमंत एकटाच वर वर जात असतो. पण त्याच्या जवळ त्याची आई नसते. हणमंतची वेळ संपताच तो आकाश पाळण्यातून खाली उतरतो. आणि आधी जाऊन आईला बिलगतो. आईला विचारतो की तू का आली नाहीस? बाळा सांगते आज काहीच विक्री झाली नाही. दोघांना पाळण्यात बसण्या साठी माझ्याकडे पुरेशे पैसे नाहीत. कारण मोठ्या पाळण्याचे तिकिट जास्त आहे आणि भाजी खरेदी राहिली आहे. त्यासाठी पैसे कमी पडले असते. त्यामुळे मी येऊ शकले नाही. आपण परत येऊ ना, त्या वेळेस मात्र दोघंही नक्की बसू. त्यात आईच्या डोळ्यातून दोन अश्रु ओघळतात. आईला अतिशय वाईट वाटते कारण आपण आपल्या बाळाची साधी इच्छा ही पूर्ण करू शकत नाही. मग दोघं भाजी खरेदी करतात आणि परत पत्रावळी नीट गुंडाळून घरी जाण्यास निघतात.
रात्री आई हणमंतच्या आवडीची भाजी करते. हणमंतच्या लक्ष्यात येते की आज आईने काहीच खाल्ले नाही. वडापाव सुद्धा त्याने एकट्याने खाल्लेला असतो. तो आईला विचारतो की आज जेवत का करत नाहीसं? हणमंता आज माझा उपवास आहे आणि मी काहीच खाणार नाही. हणमंत म्हणतो बाजारातून मग काही फळ का नाही आणलेस? ते तर तुला चालले असते ना. पण आई काहीच बोलत नाही. किती ही विचारले तरी आई काहीच बोलत नाही. शेवटी म्हणते हणमंत आपण कष्टाळू लोक आहोत त्यामुळे आपल्याकडे जेव्हढे पैसे आहेत तेव्हढेच खर्च करावेत. बाळा भविष्यात परिस्थिती तुला समदं समजावेल. लहान हणमंतला समजत नाही की आपली परिस्थिती नेमकी कशी आहे. आईने फक्त आपल्या इच्छेखातर आपल्याला आकाश पाळण्यात बसवले होते आणि आपल्या आवडीसाठी वडापाव खाऊ घातला होते. स्वत: मात्र दिवसभर उपाशीच होती. बहुतेक त्यामुळेच फळ घेण्यासाठी पैसेच उरले नसतील. आपल्यामुळे आई दिवसभर उपाशीच आहे. वरून आई जास्त काही बोलत नाही. त्यामुळे ही गोष्ट त्याला अधिक बोचते. दोघांच एकमेकावर अतिशय प्रेम असल्याने दोघंही एकमेकाला दुखवू इच्छित नव्हते. नकळत हणमंत लहान वयातच परिस्थिती मुळे सुज्ञ बनतो.
Views: 239