बँनर बघताना सनी भाऊच्या डोळ्यात चमक होती. बँनर बघून तर सनी भाऊच्या कल्पना शक्तीला पंख फुटले. तालुक्याच्या गावा पासून आल्या नंतर सनी ला झोप येत नव्हती. त्याला दिवस रात्र फक्त बँनर दिसू लागले. त्याला आपलेही एक बँनर लावावे असे वाटू लागले. त्याने ही कल्पना आपल्या जिगरी मित्र पक्याला सांगीतली. पक्या सनीचा जानी दोस्त. सनी ने सांगीतले काम, पक्याने केले नाही असे होणारच नाही. पक्या म्हटला भाऊ तुझा वाढदिवस पुढच्या महिन्यात आहे तर आपण सुद्धा तुझे बँनर लावले पाहिजे. सनीचे किडकिडीत बाहु आत्ता फुरफुरत होते एकदा का बँनर लागले की राजकीय महत्वाकांक्षा ठेवून भरपूर प्रसिद्धी मिळवायची. पुढच्या ग्रामपंचायत निवडणूकीला ग्रामपंचायत सदस्य व्हायचे. सनीची ही खास आणि गुप्त योजना होती. या योजनेत त्याला पक्याची साथ आवश्यक होती.
सनीच्या घरी अठरा विश्वे दारिद्र त्यात बँनर साठी पैसे कोठून आणणार. मग त्यासाठी त्याने पक्या मार्फत गटा मध्ये प्रस्ताव ठेवावा असे ठरले. यूथ सम्राट हा त्यांच्या गल्लीतील सामाजिक कार्या साठी निर्माण केलेल्या गटाच नाव होत. पक्याने सनी भाऊच्या सगळ्या मित्रांना आणि यूथ सम्राटच्या सभासदांना पोस्टरची कल्पना दिली. सनी भाऊ सगळ्यांना मदत करायचा त्यामुळे इतरांनी या प्रस्तावाला काहीच हरकत घेतली नाही. बँनर छापण्याचा खर्च देखील गटा तर्फे केला जाणार होते. पण एकच अट होती सभासदाचे छायाचित्र त्यात आले पाहिजेत आणि त्यांच्या सगळ्याची प्रेरणा दादा साहेबांचे छायाचित्र सुद्धा टाकला पाहिजे. या अटीवर तर सनीच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आत्ता पर्यंत सर्व त्याचा मनासारखे झाले होते.
मग सनीने स्वत:च्या छायाचित्रा साठी खास तयारी सुरू केली. छायाचित्रात दमदार दिसावे यासाठी फेटा सुद्धा शिवून घेतला. एका मित्रांचा मस्त दिसणारा चश्मा सुद्धा आणला. दाढी वाढवली. किडकिडीत दंड दिसू नयेत यासाठी फूल बाह्यांचा सदरा घातला. कुठे माशी शिंकली काय माहीत छायाचित्र काही मना सारखा येईना. मना सारखी मुख-मुद्रा देऊन सुद्धा काही चांगले छायाचित्र येत नव्हते. याला त्याचे चेहर्यावरील आविर्भाव आणि मुद्रा कारणीभूत होते. सनी भाऊचा चेहरा वरील मुद्रा काहीही झाले तरी बदलत नसत. निर्विकार चेहरा घेऊन सनी फिरायचा. हसला किंवा रडला तरी त्याचा चेहर्यावरील माशी सुद्धा उठायची नाही. त्यामुळे त्याचे हसरे आणि छान छायाचित्र काही यायचे नाही. पक्याची अर्धी ऊर्जा संपली आणि दमछाक झाली. पण सनी हार मानेल कसा? कसे तरी ओढून ताणून हास्य चेहर्यावर आणावे लागले. छायाचित्रकाराची पूर्ण दमछाक झाल्यावर छायाचित्र चांगले आले. त्या सोबत ग्रुप सदस्याचे लांबलचक छायाचित्र प्रकरण सुद्धा संपले.
पण खरा प्रश्न बँनर बनणार्याचा होता. त्याला सनीची कल्पना सत्यात उतरवायची होती. एका बाजूला सनीची पूर्ण छायाचित्र आणि सनी ने सांगीतल्या प्रमाणे दादा साहेबाचे छायाचित्र सनीच्या बरोबर ह्रदयात आहे असे दिसायला पाहिजे होते. आणि खाली ग्रुप सदस्याचे फोटो टाकायचे होते. त्यावर “सनी म्हणजे यारोका यार दिलदार“ लिहायचे होते. त्यासाठी सनीच्या दुकानात २-३ चकरा सुद्धा झाल्या होत्या. पण बँनर बनवणारी व्यक्तिला बालाजीला काहीच कळले नाही. त्याने एका रात्री न थांबता काम पूर्ण केले. पण एक चुक नजर चुकीने झाली होती. त्याने दादा साहेबाचा फोटो समायोजित करण्यासाठी कुठे टाकला हेच व्यवस्थित तपासायला विसरला. त्यामुळे सगळा घोळ होण्याची शक्यता होती. दिवाळीतील फटाक्याची माळ जशी लावावी तशी यूथ सम्राटाचे सभासद आणि मित्रांची छायाचित्र खाली होती. मित्राची संख्या जास्त असल्यामुळे सनीचा बँनर वरील छायाचित्राचा आकार लहान मोठा होत होता. शेवटी काम संपवून बालाजीने पैसे घेऊन बँनर सनी कडे सुपूर्त केले.
आता मोठा प्रश्न पडला बँनर कुठे लावायचे? बँनर लावण्यासाठी सनीने छोटा कार्यक्रम ठेवला होता. त्यात गटाचे कार्यकर्ते हजर होते. सनीला भरपूर प्रसिद्धी हवी असल्या कारणाने, त्याने बँनरवर काहीही न तपासता गावातील भर चौकात बँनर लावले. बँनरवर फोटो संख्या जास्त झाल्यामुळे सनीच्या फोटो आकार लहान होऊन दादा साहेबाचा फोटो सनीच्या हाताखाली आला होता. बँनर लांबून बघणाऱ्याला असे दिसले की सनी दादा साहेबांना आशीर्वाद देत आहे. ही बालाजीची चूक सनीला खूप महागात पडली. दादा साहेब नाराज झाले आणि रागात सुद्धा आले. त्यात दादा साहेबाचे कार्यकर्ते सुद्धा भडकले. युथचे कार्यकर्त्यांनी हात झटकले. त्यात कार्यकर्ते मारायला उठले होते. सनीचे राजकीय भवितव्य अंधारले. मग पक्याने सनीला पळून जायला सांगीतले. त्या अगोदर तालुक्याला जाऊन बालाजीला जाब विचारायचा त्याचा प्रयत्न सुद्धा फसला होता. बालाजीने सरळ हात झटकले. त्याने सांगीतले की तुम्ही बँनर नीट तपासून बघायला पाहिजे होते. बरोबर झाले नसते तर त्याने दुसरे बदलून दिले असते. सनी आपल्या आत्या कडे पळून गेला. त्याची राजकीय महत्वाकांक्षा धुळीला मिळाली. खास आणि गुप्त योजनेचा पार बोऱ्या वाजला होता.
शेवटी दादा साहेबानी दुसरे मोठे बँनर छापायला लावले. नवीन बँनर बरोबर सनीच्या बँनरवर लावले. दुसर्या बाजूला एका मोठ्या आस्थापणाचे मोठे पोस्टर लागले. त्याखाली सनी भाऊची सगळी स्वप्ने धुळीला मिळाली. एका क्षणात सनी भाऊ पासून सनी असा एकेरी वर आला होता. १-२ महिन्यांनी गावात शांतता झाल्या नंतर सनी गावात परत आला. पहिले त्याने जाऊन दादा साहेबाची माफी मागीतली आणि या प्रकरणा वर पडदा टाकायची विनंती केली. बँनर लावून ग्राम पंचायत सदस्य बनण्याची गुप्त योजना फसली होती वरून सगळ्यांच्या रोषाला सामोरा जावे लागले होते. त्या दिवसापासून सनीचे यूथ सम्राट गटा मध्ये जाणे सुद्धा कमी झाले. त्याने बाकीच्या दिवसभर टाईम पास करण्याच्या कामाला लगाम लावले. कार्यकर्ता आणि मुलूखगिरीला रामराम ठोकून सामान्य व्यक्ति प्रमाणे पोटा पाण्या साठी दुकानात नोकरी शोधू लागला. त्याला एका कपड्याच्या दुकानात नोकरी लागली. त्याने पक्याला सुद्धा एक छानशी नोकरी शोधायला लावून गटा पासून दूर केले. आणि शेवटी दोघंही सुधारले.
Views: 56