ब्लॉग : चित्रपट परिक्षण – ’96 – तरल भावनेचा उत्कृष्ट आविष्कार

मी मागच्याच वर्षी मूळ तमिळ भाषेतील “’96” हिंदीत डब केलेला चित्रपट यूट्यूब वर बघितला होता. चित्रपट अप्रतिम असल्याने परिक्षण लिहायची माझी हिम्मत झाली नाही. सहजच मित्रा सोबत साऊथ च्या चित्रपटा बद्दल चर्चा करत असताना “’96” चा विषय निघाला. मित्रा ने मला सांगीतले की या चित्रपटा बद्दल तू नक्कीच लिहायला पाहिजे. त्याने या चित्रपटा बद्दल लिहायला प्रोत्साहित केल्या मुळे हा लेख प्रपंच करतो आहे.

एखाद्या चित्रपटात अतिरंजित मार धाड, आयटम नंबर्स, शिव्या शाप, वंशवाद, भडक पेहराव, पांचट विनोद, अति गंभीर अभिनय, भावना प्रधान अत्याचार, उगाच रडारड, असे काहीही नसल्यास तुम्ही चित्रपट बघाल का? जर उत्तर हो असेल तर वरील पैकी काहीही नसलेला आणि उच्च प्रतिचा अभिनय त्या सोबत अतिशय हळुवार नी तरल उलगडत जाणारी, आणि अंतर्मनाला भावणारी, विचाराला उद्युक्त करणारी प्रेम कथा तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल.

हा चित्रपट खरे तर तुमच्या हृदयाला आर-पार खोल वर भिडतो. खरे तर कथा सगळ्यांच्या आवडीच्या विषयावर निगडीत व सार्वत्रिक आहे. कधी तरी, कुठे तरी कित्येकांनी किशोर वयात शाळेत असताना निरागस प्रेम केले असेल. त्या वयात ही खास भावना नेमकी काय असते हे सुद्धा माहीत नसते. उगाचच या अल्लड वयात एखादी व्यक्ति मनापासून आवडते. या गोष्टी च्या त्या व्यक्तीवर, समाजावर,  आपल्यावर, अभ्यासावर, आयुष्यावर काय परिणाम होईल माहीत नसते. शाळेतील आणि कॉलेज मधील प्रेम यावर तर अनेक चित्रपट आले आहेत. मग या चित्रपटात असे काय खास आहे? तर सगळेच विभाग जसे की कथा, पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, पार्श्वसंगीत, सादरीकरण, छायांकन (Cinematography), निर्मिती मूल्य, कास्टिंग, आणि वेषभूषा खास आहे.

खरे तर या चित्रपटात फक्त मुख्य दोनच व्यक्तिरेखा आहेत. तो आणि ती. तो अबोल, शांत, संयमी, समंजस, अंतर्मुख, विचारी, आणि (Travel Photographer) प्रवासी छायाचित्रकार आहे. “विजय सेतुपती” या अष्टपैलू अभिनेत्याने या चित्रपटात “तो” ची म्हणजेच “राम” ची भूमिका साकारली आहे. “आदित्य भास्कर” याने किशोरवयीन “राम” साकारला आहे. “आदित्यने अनेक शॉर्ट फिल्म मध्ये काम केले आहे. “त्रिशा कृष्णन” या गुणी अभिनेत्रीने चित्रपटातील “ती” ची म्हणजेच “जानकी देवी” म्हणजेच “जानु” चे पात्र साकारले आहे. “गौरी किसन” या नवोदित अभिनेत्रीने किशोरवयीन जानुची भूमिका साकारली आहे.  

“विजय सेतुपती” या अभिनेत्याचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. कोणत्याही प्रकारची व्यक्तिरेखा हा अभिनेता सहज निभावून नेतो. त्याच्या वावर, अतिशय आश्वासक अभिनय, संयत, सहज, परिणामकारक, हृदयाला भिडेल असा आहे. एक प्रवासी छायाचित्रकार, अबोल प्रियकर, मित्र, आणि फोटोग्राफी शिक्षक या सगळ्याच छटा अलगद पडद्यावर उलगडल्या आहेत. जानु समोर येताच त्याची होणारी चल बिचल, जानु शी बोलताना खाली मान घालून बोलणे, जानुला बोलताना होणारी थरथर, काहीच न बोलता सगळेच डोळ्या द्वारे सांगणे, हृदयातील भावना लपवणे. या सगळ्या गोष्टी लीलया पेलल्या आहेत. कुठेही ओवर अॅक्टिंग नाही. हा अभिनेता तुमच्या हृदयात कुठे तरी लपलेला “क. रामचंद्रन” बाहेर काढतो. त्यामुळे प्रेक्षकांच्या भावनांवर अधिराज गाजवतो. 96, आणि विक्रम वेधा या चित्रपटा मुळे या अभिनेता मी अक्षरश: चाहता झालो आहे. किशोरवयीन रामने सुद्धा पहिल्याच चित्रपटात मैदान गाजवले आहे. पहिल्याच चित्रपटा “आदित्य भास्कर” याने जबरदस्त अभिनय केला आहे. आदित्य पुढे जाऊन अनेक चित्रपट गाजवणार हे नक्की.

अतिशय संयत, समतोल, मनाला भिडेल असा अभिनय “त्रिशा कृष्णन” ने जानु च्या पात्रा साठी केला आहे. अंतर्मुख होणारी, 20 वर्ष झुरणारी, रामला न विसरणारी, हक्क गाजवणारी, रडणारी, आत्मक्लेश करणारी, गाणे गाणारी जानु जबरदस्त ताकदीने त्रिशाने उभारली आहे. त्रिशाने डोळ्यातून काय सुंदर अभिनय केला आहे. अक्षरश: त्रिशाने जानु पात्र कोरून ठेवले आहे. तिच्या जागी दुसरे कोणी असते तर संयतपणा ओलांडून वरवरचा किंवा आगाऊ अभिनय ठरला असता. किशोरवयीन जानु आपले 100% योगदान दिले आहे. किशोरवयीन आणि तरुण जानु या दोघी वेगवेगळ्या न वाटता एकच वाटतात. चित्रपटात जानुचे नाव सुप्रसिद्ध गायिका “स. जानकी” यांच्या वरून पडलेले असते. त्यामुळे जानु फक्त प्रसिद्ध गायिका “स. जानकी” यांनी गायलेली गाणीच गाते. प्रेम कथा जर या चित्रपटाचा आत्मा असेल तर राम आणि जानु या दोन व्यक्तिरेखा शरीर आहे. त्यांच्या शिवाय हा चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही.

“क. प्रेमकुमार” यांचा दिग्दर्शक पदार्पण चित्रपट असला तरी त्यांनी दिग्दर्शकीय कसब उत्तम रित्या दर्शवली  आहे. किंबहुना चित्रपटात “समांतर रेषा” या संकल्पनेचा अतिशय उत्कृष्ट वापर केला आहे. तुम्ही चित्रपटाचे पोस्टर बघा. प्रत्येक पोस्टर मध्ये दोन्ही व्यक्ति मध्ये अंतर आहे. दोघं थांबले असतील तर दोघात खांब आहे. चालत असतील तर दुभाजक आहे. या समांतर रेषा जणू काही रेल्वे लाइन प्रमाणे कधीही एकत्र येणार नाहीत असे दर्शवतात. दोन्ही किशोरवयीन प्रेमी युगुल कधीच एकत्र येणार नाहीत असे दर्शवते. शेवटच्या 40 मिनिटात तर चित्रपटाचे सार दडले आहे. शेवटच्या 40 मिनिटात आलेला ट्विस्ट सगळे समीकरणच बदलून टाकतो. “क. प्रेमकुमार” यांचा पहिला चित्रपट वाटतच नाही. नवीन जादूगाराने अफलातून जादू दाखवून मन जिंकावीत असे काहीसे झाले आहे. चित्रपटाचा शेवट सुद्धा मनाला स्पर्शून जाणारा आहे.    

दोन किशोरवयीन प्रेमी काही कारणांनी शाळेत एकत्र येऊ शकत नाहीत. दोघ शाळा झाल्या नंतर 20 वर्षानी एक दिवस कॉलेज रीयूनियन मध्ये भेटतात. एकमेका बद्दल असणारी ओढ, प्रेम आणि काही अनुत्तरीत प्रश्न यांचा मेळ होऊन चित्रपट आकाराला येतो. ही इतकी साधी चित्रपटाची कथा आहे. पण दोन जीवाचा संवेदन शील प्रवास एका दिवसा पुरता नसून जन्म भराचा आहे. समाजाच्या चौकटीत न बसणारे पण भावनेच्या उत्तुंग टोकावर असलेली दोघ, अंतर्मनाला भिडणारा प्रवास, उत्कट भाव चित्रपटातून मांडला आहे. प्रेक्षकांना माहीत असून सुद्धा प्रेक्षक शेवट पर्यंत दोघ एकत्र राहावेत अशी इच्छा होते हेच चित्रपटाचे यश आहे. ही दोन्ही पात्र थेट आपल्या हृदयात उतरतात. आपल्या मनात घर करून रूंजी घालतात. कथा, पात्र, प्रसंग आपल्याला विचार करायला भाग पाडते. आजच्या जमा‍न्यात राम आणि जानु सारखी पात्र सापडणे कठीण किंवा अशक्य आहेत. दोन व्यक्तीचे बिनशर्त, चिरंतन प्रेम आणि सुंदर नाते या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

या चित्रपटाला “गोविंद वसंता” यांनी उत्तम असे संगीत दिले आहे. “Kadhale Kadhale” हे मुख्य गीत चित्रपटाला शोभेल आणि मनाला भिडेल असेच आहे. हे गीत मधून चित्रपटाच्या मुख्य संवादात पार्श्वसंगीत सारखे काम करते. पार्श्वसंगीत सुद्धा चित्रपटाला साजेसे आहेत. निर्मिती मूल्य, कास्टिंग उत्कृष्ट आहे. इतर सह-कलाकारांनी अतिशय उत्तम साथ दिली आहे. त्यात “ब. पेरुमल”, “देवदर्शिनी” आणि “आडुकलं मुरुगादोस” यांनी तर दर्जेदार संगत दिली आहे. त्यात देवदर्शिनी यांचे विशेष कौतुक. वेषभूषा अतिशय संयत आणि व्यक्तिमत्वाला साजेशी आहे. छायांकन करणार्‍यांचे विशेष उल्लेख करावा लागेल. त्यांनी सर्वोतम काम केले आहे. राम आणि जानु यांच्यातील प्रसंग, जागा, प्रतीक, आणि संवाद यासाठी छायांकनाचा सूयोग्य वापर केला आहे.

अतिशय उमदे आणि जबरदस्त कास्टिंग, गोड अभिनयाने फुलत जाणारी प्रेम कथा, उत्कृष्ट रित्या फुललेली पटकथा, विजय आणि त्रिशा यांच्या अभिनयाने नटलेला, सुरेख, हळुवार संगीत व धबधब्याच्या पाण्यासारखे पार्श्वसंगीत, दमदार छायांकन, नितांत सुंदर निर्मिती मूल्य, खास वेषभूषा आणि तरल प्रेम भावनांची चौकट न मोडता हळुवार, संयत आणि अति उत्कृष्ट सादरीकरण यामुळे या चित्रपटाला मी देतो 5 पैकी 5 स्टार. मी तर म्हणतो हा चित्रपट एकदा नाही तर परत-परत नक्की बघा.

नोट १ – तुम्ही भावना प्रधान असाल तर माझी हमी आहे की, या चित्रपटाच्या ( हिंदी डब) 2 तास 8 मिनिटाच्या वेळेत तुमच्या डोळ्यातून एक तरी अश्रु नक्कीच ओघळेल. आणि परत-परत चित्रपट बघाल आणि तोंडी प्रसिद्धी नक्कीच कराल. तुम्ही या चित्रपटाचा तमिळ भाषेत subtitle सह JIO Cinema / SUN NXT/ MX Player या प्लॅटफॉर्म वर आनंद घेवू शकता.

नोट २ – या चित्रपटावर काही पेपर सुद्धा प्रकाशित झाले आहेत. या चित्रपटाचे रीमेक तेलुगु, कन्नड या भाषेत प्रदर्शित झाले आहेत.

’96 film – Young Ram and Janu
’96 Film Poster
96 Movie Review | Written By – Bhagwat Balshetwar | Voice Over By – Sheetal Pote
Youtube Channel – KUBER

Views: 501

Leave a Reply