लघुकथा: मावशी चहा!
आत्त्याबाई मला चहा पाहिजे होता. करते की मग “गरोदर असलेल्या सूने साठी चहा सुद्धा करू शकत नाही का?” तसे नाही हो आत्त्याबाई, तुम्ही ज्यांची सारखी आठवण करतात त्या मालती ताईच्या हातचा चहा पाहिजे. तसे सासू म्हणजे यशोदा बाईना आठवले की चहा घेताना आपसूकपणे मालती ताई आणि चहा सोबत गप्पा या आठवायच्या. त्यामुळे सूने सोबत चहा घेते वेळेस हा विषय सारखा निघायचा. चहाचा विषय निघाला की आपसूकच मालती ताईचे नाव यायचे. मालती ताईचा चहा किती चांगला असायचा हे आवर्जून सांगायच्या. अगं मालती ताई आत्ता राहिल्या दुसर्या गावात. आत्ता कुठून आणून देऊ तुला चहा. त्या गोष्टीला आत्ता बरीच वर्ष झाली. तसे यशोदा बाई आठवणीत हरवल्या.
यशोदा बाई आधी वडगाव या गावी राहत असत. आणि एका ठिकाणी घरकाम मागण्यासाठी गेल्या. छोटेशे पण स्वच्छ आणि टापटीप घर होत. घराच्या मालकीणबाई मालती बाहेर आल्या. बघतात तर सहावारी साडी नेसलेल्या ५० वर्षीय महिला चेहर्यावर गोड भाव आणत उभ्या होत्या. जुजबी बोलल्या नंतर घरकामाच ठरले. मग दररोज सकाळी घरकाम करण्यासाठी यशोदा बाई जायच्या. मालती ताई यशोदा बाईना मावशी म्हणूनच हाक मारायच्या. आणि यशोदा बाई मालती ला ताई म्हणूनच बोलवायच्या. दुसरीकडे सुद्धा काम असल्याने घरकाम करून जास्त न बोलता यशोदा बाई वापस जायच्या. एकदा मालती ताईची नंदन घरी आली होती. आणि नणंदेने साडीला गाठ मारून ठेवलेले दागिने यशोदा बाईला कपडे धुताना सापडले. यशोदा बाईनी दागिने प्रामाणिकपणे परत आणून दिले. या गोष्टीने मालतीचे मन जिंकले. गप्पा व्हायच्या. पण यशोदा बाईना घरकामा साठी इतर ही घरी जावे लागत असे. त्यामुळे जास्त वेळ मिळायचा नाही. यशोदा बाई आणि मालतीचा स्वभाव जुळायचा. दररोज मालती यशोदा बाई आल्यावर चहा करायच्या. मग स्वयंपाक घरातून “मावशी चहा” म्हणून हाक मारायच्या. मग दोघी चहा घेत-घेत गप्पा मारायच्या. बरीच वर्ष घरकामाला असल्याने हा दररोजचा शिरस्ता कधीच मोडला नाही. मालतीच्या हातच्या चहाला सुद्धा अतिशय चांगली चव होती आणि गपिष्ट स्वभाव असल्याने चहा वरचे संभाषण मस्त व्हायचे. गावाकडील, इकड-तिकडच्या गप्पा ५-१० मिनिटे रंगायच्या. त्यानंतर दोघी कामाला लागायच्या. घरकाम उरकून बाई घरी जायच्या. चहा संभाषणा मुळे नकळत दोघींची छान गट्टी जमली होती.
यशोदा बाई आठवणीतून बाहेर आल्या. पण त्यांचे मनातुन “चहा सोबत संभाषण” काही जात नव्हता. मध्यातंरी यशोदा बाई मुलांच्या नौकरी मुळे मालती ताई च्या गावातून दुसरीकडे स्थलांतरित झाल्या होत्या. त्यामुळे मालती ताई सोबत त्यांचा संबंध विरळ झाला होता. दर सोमवारी वडगाव इथे बाजार भरत असे. सोमवारी वडगावला जाऊन मालती ताई च्या घरी भेटून यावे अशी इच्छा झाली. मग एका सोमवारी मालती ताईच्या घरी गेल्या पण त्या नसल्याने भेट झाली नाही. त्यांच्या घराची ओळख असल्याने सगळ्यांना भेटून झाली. बोलता-बोलता त्यांनी सगळ्यांची चौकशी केली. त्यांना सगळ्यांची आठवण येते. घरी सगळे खुषाल आहेत आणि सुनबाईची चहाची इच्छा सुद्धा सांगितली आणि त्यांच्या घराचा नंबर आणि पत्ता सांगीतला. आणि एक दिवस ध्यानी-मनी नसताना मालती ताई यशोदा बाई च्या घरी आल्या. यशोदा बाईला मालती ताई साठी काय करू आणि काय नको असे झाले. यशोदा बाई म्हणाला सुद्धा गरीबा घरी तुम्ही आलात. आम्ही धन्य झालो. मालती ताई म्हणाल्या तुम्ही आठवण काढली. मी तर आधी सुद्धा येणार होते पण पत्ता माहिती नसल्याने जमले नाही. मला सुद्धा चहा सोबत गप्पा दिवस आठवले. म्हटले आठवण आली तर भेटूनच यावे. कुठे आहेत तुमची सून? मालती ताईची सूनबाई सोबत भेट झाली. खास म्हणजे यशोदा बाईच्या स्वयंपाकघरात जाऊन त्यांच्या सूनबाई साठी चहा केला. आणि त्यांचे डोहाळे पुरवले. प्रसन्न आणि मनमोकळ्या गप्पा झाल्या. त्यांनी एकमेकांना हालहवाल सांगीतले. आठवणीची शिदोरी सोडून आणि भावनांचे बंध जोडून दोन्ही मैत्रिणी बोलण्यात गुंग होत्या. दोघींना बोलताना बघून दोन जिवलग मैत्रिणी बऱ्याच वर्षानी भेटून बोलत आहेत असा भास सूनेला झाला. यशोदा बाई आणि त्यांच्या सुनेला आग्रहाच आमंत्रण देऊनच मालती ताई आठवणीने समृद्ध होऊन वापस घरी गेल्या.
Views: 107