आज सुमेधच्या घरी इडली आणि वडा हा नाष्टाचा बेत ठरला होता. सुमेध अप्पा सोबत घरी सकाळच्या नाष्टाची वाट बघत बसला होता. स्वयंपाक घरातील काम संपवून सुमेधची आई “सरिता” आणि पत्नी “मेघा” नाष्टा घेऊन आल्या. अप्पाचा दंडक होता की दररोज रात्री जेवण आणि सुट्टीच्या दिवशी सकाळचा नाष्टा एकत्रच केला पाहिजे. त्यामुळे कुटुंबाचे एकमेकांशी बोलणे आणि आठवड्या भरची चर्चा व्हायची. बोलता-बोलता सुमेधच्या ऑफिसचा विषय निघाला. सुमेध प्रख्यात अश्या Chartered Accountant फर्म मध्ये कामाला असतो. काल सुमेधने ऑफिस व्यवस्थापनाशी विविध मुद्द्यावर विरोध प्रगट करण्यासाठी ईमेल पाठवला असतो. त्यानंतर मॅनेजमेंटच्या लोकांनी त्याला सोमवारी भेटण्यासाठी बोलवले असते. सुमेधला त्याचे ऑफिस मधले मित्र सांगतात की उगाच नुसती उठाठेव आणि बंडखोरपणा करण्यात काही अर्थ नाही आणि सुमेधने मॅनेजमेंटच्या लोकांच्या विरोधात जाऊन काहीही साध्य होणार नाही. उलट त्याचा परिणाम तुलाच भोगावा लागेल असे मित्र सल्ला देतात.
मेघा – “सुमेध, तू जो मॅनेजमेंटला ईमेल पाठवला आहेस त्यातल्या सगळ्या फक्त तुझ्या समस्या आहेत का?”
सुमेध – “या सगळ्या समस्या माझ्या एकट्याच्या नसून माझ्या कंपनीतील बहुसंख्य कर्मचारी वर्गाच्या आहेत. सार्वजनिक वाहतूक आणि कामाच्या वेळा हा सगळ्यांचा प्रश्न आहे.”
मेघा – “मग तू एकटाच ईमेल पाठवून विरोध प्रगट केला आहेस? सगळे ईमेल लिहून तुझे अनुकरण करणार आहेत का?”
सुमेध – “नाही बहुतेक मॅनेजमेंटला ईमेल लिहिणारा मी एकटाच आहे.”
मेघा – “मग उगाच बंडखोरपणा करून मॅनेजमेंटला अंगावर का घेत आहेस?”
सरिता – “अगं मेघा बंडखोरपणा हा तर सुमेधच्या रक्तातच आहे. तुझ्या अप्पा नी महाविद्यालयात प्राध्यापक असताना काय-काय कारनामे केले आहेत हे तुला माहीत नाही.
मेघा – “अप्पा सांगा ना? काय-काय कारनामे केले आहेत. मला खरंच खूप उत्सुकता आहे.”
अप्पा – “अगं ती मोठी गोष्ट आहे नंतर कधी तरी वेळ मिळाला की सांगेन.”
मेघा – “नाही अप्पा आज रविवार आहे म्हणजे सुट्टीचा वार. मग पूर्ण दिवस लागला तरी हरकत नाही. पण कमीत कमी तुमच्या महाविद्यालयाच्या आठवणी तर सांगा.”
अप्पा – “ठीक आहे. नक्की सांगतो.”
मी खूप वर्षा खाली पुण्याच्या एका इलेक्ट्रिकल कंपनी मध्ये कामाला होतो. पगार सुद्धा ठीक-ठाक होता. पण माझे त्या नऊ ते पाच अश्या नोकरी मध्ये मन काही रमत नव्हते. त्यामुळे मी सोलापूरात गावी जाऊन स्वत:चे एखादे उत्पादन युनिट (manufacturing unit) सुरू करावे आणि त्या क्षेत्रात आपले बस्तान बांधावे असा मानस होता. सोलापूरात माझे आईवडील ही होते आणि तिथे माझे मन सुद्धा रमायचे. त्यामुळे मी गावाकडे गेलो. पण नियतीच्या मनात बहुतेक दुसरेच क्षेत्र होते. आम्ही चार जणात युनिट स्थापना केली. पण त्यात आम्ही नवीन असल्याने किंवा नियतीने किंवा अनुभव नसल्याने युनिट बंद पडले. पण त्यात हा अनुभव खूप काही शिकवून गेला. लोकांशी कसे बोलावे, कामगार आणि आपल्या व्यवसायाचा प्रमुख ग्राहक यांना कशी सेवा द्यावी. या सगळ्या कसबी युनिट चालवताना शिकलो. म्हणतात ना यशा पेक्षा अपयश माणसांना खूप काही शिकवून जाते. डोक्यावर झालेले कर्ज आणि नुकतेच लग्न झालेले त्यामुळे आलेली कुटुंबाची जबाबदारी. त्यामुळे सगळी कडूनच अडकलो होतो. अपयशा च्या जखमा अंगावर घेऊन जगण्या पेक्षा माणसाने प्रामाणिक प्रयत्न करत राहावेत. कुठे तरी, केव्हा तरी तुमचे यश तुमच्या कडे स्वत: मार्ग शोधत येईल. याच मानसिकतेवर मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि पुढचा मार्ग शोधत होतो.
माझे काही मित्र “मंगेश प्रसारक मंडळ” स्थापित “प्रज्ञावंत कॉलेज ऑफ इंजीनियरिंग” मध्ये प्राध्यापक होते. आणि विशेष म्हणजे मी शिक्षण घेत असताना माझे आवडते प्राध्यापक “पंडित सर” या कॉलेजचे प्रिन्सिपल होते. सरांना आणि मित्रांना भेटायला मी कॉलेज मध्ये गेलो. मला आधी पासून शिक्षण क्षेत्रात कारकीर्द करण्याची इच्छा होती. सरांना माझी सध्याची निकड सांगितली आणि त्यावर चर्चा केली. सर मला भविष्यात कॉलेज मध्ये काही जागा निघाल्या तर जरूर संधी द्या. मी त्या संधीचे नक्कीच सोने करीन.
मला परत पुण्याला जायची इच्छा नव्हती. काम शोधण्यात 6 महीने गेले. मला सोलापूरात काही काम न मिळाल्यास पुण्यात कोणत्या तरी कंपनीत नऊ ते पाच नोकरी करणे गरजेचे होते. त्या दृष्टीने मी माझ्या सहकाऱ्याशी संपर्कात होतो. पण मला माझी जन्मभूमि सोडायची नव्हती. 6 महिन्या नंतर माझ्या प्रयत्नांना यश आले आणि “पंडित सरांनी” मला कॉलेज मध्ये नेमणूक करून काम करायची संधी दिली. खरे तर कॉलेज मधील पगार आणि पुण्याचा नोकरी मधील पगार यात जास्त फरक होता. पण माझे प्राधान्य सोलापूर ठरल्या प्रमाणे मी कॉलेज नेमणूक स्वीकारली. भलेही पैसे कमी असतील. पण मी माझ्या आई वडीला जवळ आणि माझ्या माणसा सोबत आणि विशेष माझ्या आवडीच्या क्षेत्रात कारकीर्द घडवणार होतो हीच माझी जमेची बाजू होती.
पहिले पाच वर्ष “पंडित सर” च्या मार्गदर्शना खाली अतिशय उत्तम गेली. पंडित सर खूपच अनुभवी असल्याने ते प्रोफेसर मंडळी, विद्यार्थी, कॉलेज मॅनेजमेंट, आणि इतर कर्मचारी वृंद यांच्या तील ते दुवा होते आणि अतिशय छान प्रकारे सगळी समस्या हाताळायचे. त्यांचे काम आणि नाव मोठे होते त्यामुळे त्यांच्या समोर सगळे विनयाने रहायचे. पण जेव्हा ते सेवानिवृत्त झाले तेव्हा एक मोठी पोकळी तयार झाली. त्यात कॉलेज मॅनेजमेंटने कॉलेज वर आपले बस्तान पद्धतशीरपणे आणि अतिशय चलाखीने व्यवस्थित बसवले. त्यात बरेच वेगळे प्रकार सुरू झाले. प्रोफेसर मंडळी, आणि इतर कर्मचारी वृंद यांच्या पगारी अनियमित व्हायला लागल्या. त्यात कॉस्ट कटिंगचे भयानक प्रकार सुरू झाले.
मी आधी पासून माझ्या पद्धतीने विरोधाचा आवाज वाढवायचा प्रयत्न केला. पण माझा एकट्याचा आवाज दाबला जायचा. हा सगळा पद्धतशीर डाव लोकांना ओळखायला उशीर झाला. आधी लोक विचार करायचे की थोडक्या साठी मॅनेजमेंटचा रोष कशाला ओढवून घ्यायचा. आधी मी फक्त एकटा लढत होतो. त्यात जुन्या कर्मचार्यांचा विरोध वाढू लागला. आम्ही आमच्या 8-10 जणांचे प्रोफेसर मंडळी यांचा संघ स्थापित केला. आमचे 8-10 जणांचे प्रोफेसर मंडळ या पद्धतशीर अडवणुकीला विरोध करण्यासाठी अग्रस्थानी असल्याने, आम्हा लोकांवर मॅनेजमेंट खार खाऊन होती. त्यातल्या त्यात मी या विरोधी मंडळीचा पुढारी होतो. त्यामुळे मला त्रास देणे त्यांनी जाणीव पूर्वक सुरू केले. त्यांचा उद्देश नक्कीच कळत नव्हता. पण आमचा सुद्धा नाईलाज होता. आम्ही आत्ताच काही नाही बोललो तर आमचे भविष्य खराब झाले असते. मॅनेजमेंट मध्ये सगळेच लोक खराब होते असे नाही. पण त्यांना गप्प बसवले जायचे. आमच्या विरोधी संघाचा विचार होता की चर्चेतून मार्ग सोडवू. पण तिथे मुद्दलात चर्चेची तयारी नव्हती तर काय होणार. पण कॉलेजचे नाव खराब होणार नाही याची सुद्धा आम्ही जबाबदारी घेतली. त्यामुळे पेपर मध्ये छापणे. उगाच चुकीची माहिती पसरवणे आम्ही होऊ दिले नाही.
या विरोधाचे दुष्परिणाम सुद्धा आमच्या वर होणार होते. त्यात मला एका यांत्रिकी विभागाचा विभाग प्रमुख (डिपार्टमेंट हेड) करण्यात आले. जाणून बुजून काम जास्त आणि पगार कमी असे धोरण होते. पण न डगमगता मी जोरात कामाला लागलो. पण त्यांना माहीत नव्हते की माझा विरोध तत्वा साठी आहे. मी विभाग प्रमुख म्हणजे बिन पगारी फूल अधिकारी होतो. माझा उद्देश विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल असा असायचा. तुमची कष्ट करायची तयारी असेल तर त्याचे फळ भविष्यात कुठे तरी नक्कीच मिळते. आधी यांत्रिकी विभागात अंदाधुंद कारभार होता. छोटे-छोटे बदल घडवायला सुरुवात केली. जे की अतिशय परिणाम कारक होती. जशे की मी विद्यार्थी पूरक मार्गदर्शक तत्वे (compliance) विभागात घालून दिली. मला नियोजन करायची आवड असल्याने मी माझ्या विभागाचे पूर्ण वर्षाचे वेळा पत्रक आधीच जाहीर करायचो. त्यामुळे विद्यार्थी, पालक, आणि प्रोफेसर मंडळी यांना कधी, कुठे आणि काय करायचे सूचित व्हायचे. त्यामुळे येन वेळी चुका घडण्याचे प्रमाण कमी झाले. विद्यार्थी आणि प्रोफेसर मंडळी यांना वेळेचा अचूक अंदाज येऊ लागला.
आधी सगळ्यानी याला विरोध केला पण जेव्हा त्यांना या गोष्टीचे चांगले फायदे लक्ष्यात आले त्यामुळे विरोध कमी झाला. मी आधी उत्पादन युनिट (manufacturing unit) मध्ये काम करत असल्याने मी तेथे ISO 9000 मार्गदर्शक तत्वाचे पालन केले होते. त्यात मी आत्ता कॉलेज साठी कमीत कमी माझ्या विभागा साठी NBA ची मार्गदर्शक तत्त्वे लागू करावीत यावर काम सुरू केले. पूर्ण यांत्रिकी विभागात छोटे-छोटे बदल घडवून NBA ची मार्गदर्शक तत्त्वे रुजवत गेलो. त्यामुळे हा मोठा बदल करताना लोकांचा प्रतिकार झाला नाही. हळूहळू सगळी मार्गदर्शक तत्त्वे अमलात आणायला वेळ लागला नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि प्रोफेसर मंडळीचा उत्साह दुणावू लागला. इकडे मॅनेजमेंट सोबत संघर्ष चालूच होता. विरोधात राहून आणि चांगले काम केल्या मुळे त्या संघर्षाला एक प्रकारची प्रखरता लाभली. जेव्हा तुम्ही विरोधात जाऊन एखादी गोष्ट यशस्वी करता त्या वेळेस तुमच्या आवाजाला एक प्रकारची धार येते. मॅनेजमेंटच्या सुद्धा लक्ष्यात आले असेल की हा फक्त बोलणारा पोपट नसून अचूक काम करणारा अवलिया आहे. त्यामुळे माझ्या बंडखोर पणाला त्याचा विरोध कमी झाला पण पूर्ण संपला नाही. आमचे म्हणणे एवढेच होते की कर्मचार्याचे आर्थिक नुकसान करून पैसे कमावण्यापेक्षा कॉलेजची प्रगती करून नाव कमवून पैसे कमवा. पैसे तर सगळ्यांना कमवायचे असतात त्यासाठी आपल्याच लोकांचे पाकिट कुरतडायची गरज नसते. मी माझ्या इंडस्ट्रीतील ओळखीच्या आधारे इंडस्ट्री पूरक कार्यशाळा, करियर समुपदेशन (Career counselling) आणि मार्गदर्शन घेऊ लागलो. या गोष्टी ग्रामीण भागा साठी नव्या होत्या. फक्त शिकलेले इंजीनियर्स करण्या पेक्षा यांत्रिकी इंडस्ट्रीतील नोकरी पूरक इंजीनियर्स तयार करणे ही माझी पक्की धारणा होती. या कार्य शाळेच्या माध्यमातून नोकरी साठी मार्गदर्शन लाभत असेल तर दुधात साखरच!!! या सगळ्यांचा किती फरक पडला माहीत नाही पण विद्यार्थी, पालक आणि प्रोफेसर मंडळी यांच्या नजरेत माझ्यावरचा विश्वास वाढला.
लोकांचा विश्वास वाढल्यामुळे माझा सुद्धा आत्मविश्वास वाढीला लागला. उद्योजक होणे हे माझे स्वप्न होते त्यासाठी मी माझ्या आयुष्याची 3 वर्ष सुद्धा घालवली. पण काही अपरिहार्य कारणामुळे ते उदिष्ट पार पडले नाही. पण स्वस्थ बसलो नाही. मी उद्योजक झालो नाही पण दुसरे कोणी उद्योजक झाले असते तर मला आनंदच झाला असता. त्यामुळे विद्यार्थी आणि इतर लहान व्यापारी यांचा विकास व्हावा म्हणून मी कॉलेज बाह्य 6 महिन्याचा उपक्रम सुद्धा सुरू केला. सगळ्यांना याचा खूप उपयोग सुद्धा झाला. शिक्षकाला स्वत:च्या प्रगती पेक्षा विद्यार्थाची प्रगती झाली तर अतीव आनंद होत असतो. काही इंजीनियर मुले जेव्हा मला त्यांच्या इंडस्ट्रीयल यूनिट च्या उद्घाटनाचे निमंत्रण देत असत त्यावेळेस माझा आनंद गगनात मावायचा नाही. मॅनेजमेंटला सुद्धा माझी प्रगती कळली असेल. त्यांनी मला पूर्ण कॉलेजला NBA मान्यता मिळवायची कामगिरी दिली. त्यात सुद्धा मी यशस्वी झालो आणि शेवटी आमचा मॅनेजमेंट सोबतचा संघर्ष मिटला. त्यांनी आमच्या वर टाकलेली बंधने हटवली. मग सर्व काही पूर्ववत झाले. त्यामुळे आमच्या बंडखोर संघाने विरोधाच्या तलवारी म्यान केल्या. तर अश्या प्रकारे मॅनेजमेंट आमची लढाई 8-9 वर्षा नंतर संपली. त्यात आमचे खूप हाल झाले पण संघटनेचे बळ, सकारात्मक शक्ती यामुळे आम्ही पैलतीरी गेलो. मेघा, सुमेधला एकट्याने का होईना संघर्ष करू दे. सुमेध, संस्थेला मात्र कमी लेखायचे नाही. माणसे बदलतात संस्था माणसावर अवलंबून असते. तू तुझे काम प्रामाणिकपणे कर. सम विचारी माणसे जोड, आव्हाने स्वीकार, संघर्ष कर, शिकत जा आणि महत्त्वाचे म्हणजे चांगल्या अर्थाने बंडखोरपणा करत जा.
दुसर्या दिवशी सोमवारी सुमेध ऑफिसला जातो. समविचारी लोकांची एखादी फळी तयार होते का पाहतो. मॅनेजमेंटच्या लोकांना भेटण्या अगोदर समविचारी मित्रा सोबत चर्चा करतो. मित्रा सोबत चर्चेतून प्रश्न सुटले आणि काही प्रश्न निर्माण झाले. सुमेधने मॅनेजमेंट ला भेटण्या अगोदर पॉईंट्स तयार केले. मॅनेजमेंटशी बोलताना त्याने आधी कर्मचार्याच्या समस्या, अडचणी, गैरसोयी, आणि प्रश्न मांडले. त्या सोबत या प्रश्नांना त्याच्या कुवती प्रमाणे काय उत्तर असेल हे ही सांगीतले. मॅनेजमेंट ला किती गोष्टी पटल्या हे सुमेधला कळले नाही. महत्त्वाचे म्हणजे या गैरसोयी टाळण्यासाठी तो स्वत: काय करू शकतो हे सांगीतले.
तळटीप – ही कथा काल्पनिक घटनांवर आधारित आहे. कथेचा कोणाशीही संबंध नाही. कथा निखळ मनोरंजना साठी लिहिलेली आहे. त्यात कोणाला दुखावण्याचा हेतु पण नाही.
Views: 186