मी नाळ या चित्रपटाचा ट्रेलर बघितला आणि “जाऊ दे न व” हे गाणं पाहीलं आणि हा चित्रपट आपण बघायचाच असे ठरवले. हा चित्रपट “सुधाकर रेड्डी येक्कांटी” यांनी दिग्दर्शित केला आहे. “सुधाकर” हा प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर, लेखक आहे. नागराज मंजुळे आणि सुधारक यांचे चित्रपटाचे संवाद कागदावर नाही तर प्रेक्षकांच्या हृदयात कोरले जातात. चित्रपटाला दमदार पार्श्वसंगीत “अद्वैत निमलेकर” यांनी दिले आहे. अ.व. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले आहे. चित्रपटात एकच गाणे आहे पण तेच गाणे चित्रपटाचे कथा सार ३.४४ मिनिटात दाखवते. प्रमुख भूमिका “नागराज मंजुळे”, “देविका दफ्तरदार” आणि “श्रीनिवास पोकळे” यांची आहे.
चैत्या आणि त्याची आई यांच्या कथानका सोबत म्हैस आणि तिच्या रेडकूची एक समांतर कथा चालू असते. चैत्याला त्याचा मामा भेटे पर्यंत चैत्याचा एक स्वप्नवत आणि सुंदर प्रवास सुरू असतो. मामाचे शब्द या छोट्या चैत्याच्या जीवनात वावटळ आणतात. जसे की त्याला कटू स्वप्न पडते आणि तो त्या अज्ञात गोष्टीचा पाठपुरावा करून त्यामागे धावतो. त्याला वाटते आपली आई आपल्या वर प्रेम करतच नाही. त्याच्या साठी रडत सुद्धा नाही.
“नागराज मंजुळे” यांनी सावकाराची भूमिका उत्तम निभावली आहे. त्यांनी एका सशक्त वडीलांची भूमिका साकारली आहे आणि चित्रपटाचे संवाद सुद्धा लिहिले आहेत. तसे प्रमुख भूमिका सोडल्यास आज्जीच्या पात्राने जान आणली आणि दिली आहे. आज्जी आणि सुनेचे नाते विळा भोपळ्याचे दाखवले आहे. आजी चैत्याचे खूप लाड करते आणि गोष्टी सांगते. चैत्या आज्जी वर रेडकू सोडतो तो दृश्य जमून आले आहे. आज्जीला बैलगाडी मधून नदी पात्रातून प्रवास करतात तो भावनिक क्षण सुद्धा उत्कृष्ट झालाय. त्या अवघड प्रसंगी डोळ्यातून फक्त एक अश्रु निखळतो हे मात्र खटकते. पण पुढचाच क्षण सुंदर झालाय. बच्चन आणि मामा हे पात्र सुद्धा भाव खाऊन जाते. बाकी शेवटच्या १५ मिनिटा करिता दीप्ती देवी यांनी दमदार भूमिका केली आहे. शब्द कमी आहेत पण डोळ्याचा पुरे पूर उपयोग करून अभिनय साकारला आहे.
दमदार कथा, नाविन्यपूर्ण गाणे, प्रभावी सुरुवात आणि परिणामकारक शेवट, चांगले पार्श्वसंगीत, विनोदाची उत्कृष्ट पेरणी, सह कलाकाराची उत्तम साथ, मानवी संवेदना, भावनांसंबंधीवर भाष्य, आई आणि मुलांचे भावपूर्ण नातं, उत्कृष्ट अभिनयाने परिपूर्ण चित्रपट पाहायचा असेल तर नाळ एकदा पहाच. प्रेक्षकांची कथे सोबत नाळ जोडणारा चित्रपट एकदा अनिवार्य बघितलाच पाहिजे. मला या चित्रपटाला ५ पैकी कमीत कमी ४ स्टार द्यायला आवडेल.
परीक्षण अभिवाचन https://youtu.be/-yhTOnTaomw
Views: 93