ब्लॉग – व्यक्तीविशेष – जागतिक महिला दिन

व्यक्ती विशेष – जागतिक महिला दिन
8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा झाला. आपल्या आजूबाजूला स्त्री विविध रुपात आपल्याला भेटत असते. प्रत्येकात माणसाला चांगुलपणाचा सुवास येत असतो. प्रत्येकात घेण्या सारखा एक तरी चांगला गुण असतो. त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्या नंतर आपल्याला त्या व्यक्तीची माहिती कळते. तर अश्या अनेक माणसाच्या गराड्यात आपण आपल्याला लागणारे गुण दुसर्‍याकडून घ्यायचे असतात. स्त्री एकाच वेळेस असंख्य पात्र साकारत असते. कधी ती बहीण, वहिनी, मैत्रिण, डॉक्टर, मार्गदर्शक, गुरू, कधी आई तर कधी शिक्षिका असते. प्रत्येक महिलांचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. मी मा‍झ्या परिवारातील स्त्रियांना जागतिक महिला दिना निमित्त शब्दरूपी अभिवादन करणार आहे.

द्वितीय पुष्प – गीता ताई
ताई या शब्दातच आई हा शब्द उच्चारला जातो. आणि माझी ताई म्हणजे प्रेम आणि माया यांचे मूर्तिमंत रूप. तिच्या बोलण्यात जिव्हाळा तर ओथंबून वाहत राहतो. मी ताईशी कोणत्याही विषयावर बोलू शकतो. लहानपणी मी आणि ताई नवीन घराच्या बांधकामा वर पाणी टाकण्यासाठी जात असू. त्या सोबत कामगारांना चहा सुद्धा नेत असू त्या वेळे पासून मी ताईचे अनुकरण करतो. भिंतींना पाणी कसे टाकावे इथून सर्व ताईचे बघून शिकलो. पण तिने कधी शिकवणीची फी घेतली नाही हा! लहानपणी शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ताईचे सर्व पुस्तके मला भेटत. आमचे काका प्रत्येक पुस्तकाला पुठ्ठा लावायचा हे शिकवायचे. पुस्तके एक वर्ष जुनी असली तरी ही व्यवस्थित वापरल्या मुळे नवीन असल्या सारखी वाटायची. ताईने टापटीप हा गुण लहानपणा पासूनच जोपासलाय. बोलक्या स्वभावामुळे ताईचे शाळेत आणि पुढे कॉलेज मध्ये मित्र-मैत्रिणी खूप होत्या. आम्ही एकदा चाकूरला यूथ फेस्टिव्हल सुद्धा गेलो होतो. तिला वाचनाची खूपच गोडी असल्याने मी सुद्धा वाचनालयात जाऊन पुस्तके वाचायला लागलो. माझ्यातील अनेक चांगल्या सवयी आणि पुस्तका बद्दल रूची ताई मुळे निर्माण झाली. तिने मा‍झ्या चांगल्या वाईट काळात, कडू गोड प्रसंगात कणखर राहून साथ दिली आहे आणि मार्गदर्शक केले आहे. लिखाणात सतत प्रोत्साहन दिले. ताई पत्नी, आई, बहीण, सून, मैत्रिण, आणि वहिनी अश्या सर्व जबाबदार्‍या मन:पूर्वक पार पडत असते. ती स्वत:हून कधी फोन करणार नाही पण योग्य वेळी तिचा पहिला फोन येतो. सगळ्यांच्या अडचणी सोडवण्यात अतिशय पटाईत आहे. कुशाग्र बुद्धी आणि परिस्थिती मुळे निर्माण झालेला संयम याचा उपयोग करून जीवनात पुढे मार्गक्रमण करते आहे. जगावेगळे निर्णय घ्यायला ताई मागे पुढे पाहत नाही. तिरुपती बालाजी इथे पूर्ण केस दान करण्याचा निर्णय सुद्धा असाच जगावेगळा होता. पूर्ण केस काढल्यावर एक वेगळंच तेज दिसत होतं चेहर्‍यावर. मुलं महत्त्वाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला असताना उगाच वर्षभर टेन्शन न घेता, अति अपेक्षा न ठेवता सर्व प्रयत्न करणारी आई ही वेगळीच भासली. लहानपणा पासून एकत्र असल्याने ताई वर आणखी लिहिता येईल पण सध्या तरी संक्षिप्त लिहिले आहे. एकच तक्रार आहे ताई लेखन, चारोळी चांगली करत असताना सुद्धा जास्त काही लिहित नाही.
अश्या मा‍झ्या कणखर, संयमी, आणि मार्गदर्शक बहि‍णीला 8 मार्च जागतिक महिला दिन निमित्ताने द्वितीय पुष्प देऊन अभिवादन करतो!!!

ब्लॉग – व्यक्तीविशेष – जागतिक महिला दिन Read More »