काही दिवसाखाली तिरूपतीला जायचा योग आला. तिथे तिरुमला तिरूपती देवस्थान तर्फे मोफत भोजनाची व्यवस्था राबवली जाते. मी तिथे बऱ्याच वेळेस भोजन ग्रहण केले आहे. बालाजीचे दर्शन झाल्या नंतर आमची पावले आपोआप तिकडे गेली. दर्शनाला मोठी रांग होती तेवढीच रांग भोजनालयात होती. पध्दतशीर रांग… 4 मोठे हॉल… माडून ठेवलेल्या टेबल आणि खुर्च्या… रांगेत मांडून ठेवलेली केळीची पाने… हॉलच्या बाहेर भली मोठी पेंटीग… वाढण्यासाठी मोठ्या ट्राॅली… तेथील जबरदस्त व्यवस्थापन… आणी जोडीला अप्रतिम स्वयंपाक…
मी दररोज च्या जेवणात भात कमी खातो. पण स्वयंपाकाला अवीट चव असल्या मुळे मी दोनदा डोंगरा एवढा भात कधी फस्त केला हे मला कळलेच नाही. पहिल्यांदा वरण, दुसर्यांदा सांबर, शेवटी ताक. आणि या तिन्हीचे रसमिसळ होऊन आलेली अप्रतिम चव. याला तोडच नव्हती. सगळीजण भोजनाचा आस्वाद घेत होती. माझ्या आईची बालाजी वर अटूट श्रद्धा असल्या मुळे आई भोजन हा बालाजीचा प्रसाद म्हणुन ग्रहण करत होती. तर आम्ही फक्त भोजन करत होतो. असे म्हणतात समाधानी होऊन भोजन केले तर ते व्यवस्थित पचते. मी खुप आनंदाने खात होतो. आम्ही तेथुन समाधानी होऊन बाहेर पडलो. मी तिथे 2 दिवस होतो. परत दुसर्या दिवशी मी भोजनालयात मधे भोजन करून तृप्ती ची ढेकर दिली.
मी असाच अनुभव गोंदवलेकर महाराज मंदिरात घेतला आहे. तेथील व्यवस्था सुध्दा सुरेख आहे. भोजनाला अप्रतिम आणी अवीट गोडवा आहे.
आमच्या कॉलोनी मधे गणपती बसवल्या नंतर बरेच कार्यक्रम होतात. त्या मधे एक दिवस जेवणं सगळ्यांना भोजन असते. तेव्हा सुध्दा स्वयंपाकाची चव जबरदस्त असते. भोजनात फक्त साधे वरण भात आणी एखादे स्वीट असते. परंतु ते सुध्दा एकदम चविष्ट लागते.
आचाऱ्याने मन लावून मेहनत घेतली होती का देवाचा प्रसाद असल्या मुळे जेवणाला अप्रतिम चव आली होती हे कळतच नाही.
आमच्या गावी गोपाळकाला होतो. त्या मधे सगळ्यांनी सोबत आणलेले पोहे, चुरमुरे, हिरवा ठेसा मिसळतात आणी प्रसाद म्हणुन वाटतात. गोपाळकाला सुध्दा खुपच छान लागतो.
असेच एकदा मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. तिथे हनुमान जयंती निमित्त भात, वरण आणी शिरा होता भोजन प्रसाद होता. आम्ही सगळे चटई वर पंगत करून बसलो. साधाच वरणभात पण प्रसाद असल्या मुळे त्याला जबरदस्त चव होती.
असे भोजन कितीही पैसे मोजून हॉटेल किंवा कुठेही मिळणार नाही. मला सार्वजनिक ठिकाणी भोजन खुप चांगले का होते हा प्रश्न पडला आहे? बहुतेक निरपेक्ष वृतीने, आणी अत्मियतेने सगळ्यांनी केलेले काम. मनापासून केल्यामुळे त्याला आलेली स्वर्गीय चव याची मिसळ होऊन ते अन्न अन्न न राहता देवाचा प्रसाद बनते. असा गोड चवीचा प्रसाद ग्रहण केल्यावर मनाला समाधान मिळते.
Views: 38