पूर्वतयारी
९१वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कवी कट्टा या काव्य मंचा साठी मी माझी कविता जानेवारीत पाठवली होती. त्यावेळेस मी काही प्रवासाचे ठरवले नव्हते. बहुतेक हा माझ्या नशीबात हा प्रवास लिहिलेला असेल. माझ्या कारने मला मोठा प्रवास करता आला नाही म्हणून मग मी कारने जायचे ठरवले. मी त्यासाठी माझ्या दोन मित्रांना सुद्धा विचारले पण सुट्यांच्या कारणामुळे तो प्रयत्न काही यशस्वी झाला नाही. आम्ही घरातील तिघे जाणार होतो पण ते नियोजन सुद्धा बारगळले. आपण नियोजन केल्या प्रमाणे प्रवास झाला तर तो प्रवास मजेचा थोडेच वाटतो? पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर मग प्रवासाच्या ५ दिवस अगोदर रेल्वेचा प्रवास निश्चित केला आणि नशीबाने तिकीटे उपलब्ध होती. मग काय पटापट तिकीटे आरक्षित केली. बारा किंवा तेरा तारखेच्या घोळा मध्ये मला थेट बारा तारखेचे पुणे अहमदाबाद दुरंतो एक्सप्रेसचे तिकीट मिळाले. मग सगळे नियोजन अंबुजा सीमेंट प्रमाणे मजबूत झाले. मी तेरा तारखेला अहमदाबादला जाणार होतो आणि तेथून सोमनाथला दोन दिवस राहणार होतो. मी फक्त सोमनाथ, दिव, आणि सासण गीर नॅशनल पार्क बघायचे नियोजन केले होते. पण एक विलक्षण योगायोग जुळून आला होता. कारण मी ज्या वेळेस कारने प्रवास करणार होतो त्यावेळेस मी जास्तीत जास्त अहमदाबाद पर्यंत जाऊन वापस येणार होतो. त्यात सोमनाथ दर्शनाच्या नियोजनाची काहीच आखणी नव्हती. पण बहुतेक ‘त्याची’ इच्छा असेल. माझा छोटासा कविता वाचनाचा कार्यक्रम होता पण पर्यटनाची संधी सोडेल तर काय कामाचे? ज्याप्रमाणे डेटा, कॉलिंग, आणि इतर एका पॅकमध्ये रिचार्ज करतो, त्याच प्रमाणे कुठेही जायचे असेल तर मी त्यात पर्यटन घुसवतोच. एकाच वेळेत ३ काम करायची सवय काही जात नाही.
दिनांक – १३ फेब्रुवारी (अहमदाबाद)तेरा तारखेला मी रेल्वेने पहाटे ६.४० ला अहमदाबाद पोहोचलो. मग आम्ही दोघं प्रतीक्षालयात गेलो आणि थोडा आराम केला. मी नाश्ता करून आलो तर राधाने(पत्नी) सांगीतले आज महाशिवरात्री आहे. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी सोमनाथाच्या दर्शनाची वेळ, पुढील गाडीची वेळ, हा सगळा हिशोब मांडला आणि बहुतेक माझा सगळा हिशोब चुकणार होता. माझी पुढील गाडी अहमदाबाद – सोमनाथ १०.४० ला सुटुन ८.०० ला तिथे पोहोचणार होती. मग मी विचार केला दर्शनाचा जुळून आलेला योगायोग हुकला. पण हार मानून चालणार नव्हते. मी हॉटेल मध्ये प्रवेश केल्या-केल्या मंदिराविषयी माहिती काढली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी रात्रभर मंदिर चालू राहणार होते. मग काय आम्ही तयार होऊन दीड तासात मंदिराजवळ पोहोचलो आणि मंदिरामध्ये Light And Sound कार्यक्रम चालू होता. तो बाहेरूनच ५ मिनिटे पाहीला. नेहमी प्रमाणे वाट चुकत आणि मंदिर शोधत एकदाचा नवीन मंदिरात गेलो. तर तिथे ११ वाजता आरती सुरू झाली होती मग तो ही प्रसाद पदरात पाडून शेवटी सुख कारक असे महादेवाचे दर्शन झाले. दर्शनाला दीड तास लागला परंतु अनुभव मात्र अवर्णनीय होता. एकदम नवीन मंदिर बांधले आहे आणि त्यावर सणा निमित्त रोषणाई उठून दिसत होती. Light and Sound कार्यक्रमाचा अनुभव सुद्धा एकदम छान आणि ताजातवाना करून जातो. महाशिवरात्री निमित्त मंदिर उजळून निघाले होते. जुने मंदिर बाजूलाच आहे. मग जुन्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. बहुतेक प्रवाश्याच्या जाण्या-येण्या मुळे हा परिसर गजबजला होता.हे महादेवा…तूच जन्म, तूच मृत्युतूच स्तब्धता, तूच संगीततूच शक्ती, तूच भक्ती
सोमनाथा, तुला करितो वंदन
दिनांक – १४ फेब्रुवारी (दिव)
सकाळी उठल्यावर चहा पिऊन लगेच दिव या केंद्र शासित प्रदेशाची माहिती काढली. दिव तेथून फक्त ८० कि. मी. वर आहे. मग लगेच तयार होऊन आजचा दिवस दिव च्या नावे लिहिला. नेहमी प्रमाणे वाटेत नाष्टा केला. १ तासात दिवचे पहिले ठिकाण गंगेश्वर मंदिर आले. पाच पांडव इथे थोडा वेळ होते. तिथे पाच महादेवाच्या पिंडी आहेत. समुद्राच्या पाण्याने ह्या पाचही पिंडीना नैसर्गिक अभिषेक होतो. गुंफे सारखे मंदिर आहे आणि वरील बाजूला टेकडी असून खास बसण्यासाठी जागा आहे. तेथूनच आम्ही रहस्यमय नायडा गुंफा बघण्यासाठी गेलो आणि तिथे निसर्ग निर्मित दगडाच्या विविध छटा बघून हरखून गेलो. मस्त गुंफा आहेत. काही गुंफा मध्ये पायऱ्या कोरलेल्या आहेत. आणि तिथे दोन दगड निमुळते होत खाली आले आहेत. मी लगेच तिथे कृष्णा प्रमाणे करंगळी लावत त्याचे नाव सुदर्शन चक्र पॉइंट केले.
पूर्ण गुंफा बघितल्यानंतर आम्ही आईएनएस खुकरी(युद्धपोत) स्मारक बघायला गेलो. तिथे बसण्यासाठी मस्त विविध आकाराचे घुमट तयार केले आहेत. त्यात शंख, गोलाकार यांच्या प्रतिकृती आहेत. आईएनएस खुकरीची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे आणि बाजूला माहिती फलक ठेवले आहेत. युद्धात आईएनएस खुकरीच्या कप्तानाने कसे बलिदान दिले त्याबद्दल सविस्तर माहिती आहे. त्यानंतर आम्ही मग दिव किल्ला बघण्यासाठी गेलो आणि तिथे जाऊन किल्याच्या प्रेमात पडलो. अजस्त्र असा किल्ला आहे. पूर्ण किल्ल्याच सौंदर्यावलोकन करण्यासाठी संपूर्ण एक दिवस लागेल. पण आमच्या कडे तेवढा वेळ नसल्यामुळे आम्ही ४ तासात किल्ला बघितला. आजही किल्ल्यावर तोफा मजबूत स्थितीत आहेत. एकाही बाजूची पडझड झाली नाही. किल्ल्याचे बांधकाम कल्पक दृष्टीने केले आहे. तिन्ही बाजूने समुद्राने बंदिस्त आहे. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी आत येते. एक अरूंद वाट सोडली तर किल्ल्याच्या आत जाण्यासाठी दुसरी वाट नाही. आत जाण्यासाठी शत्रूला समुद्र हा एकच मार्ग आहे. शत्रूला समुद्र मार्गेच आक्रमण करता येऊ शकते. पण प्रचंड अश्या तोफा पुढे त्यांचा निभाव लागणे महाकठीण असते. किल्यातील दीपस्तंभ(light house) बघण्यासाठी सुद्धा भरपूर दमछाक करावी लागली. दुसऱ्या दीपस्तंभावर जाण्यासाठी भरपूर पायऱ्या असल्यामुळे मी तिकडे गेलोच नाही. किल्ला आज सुद्धा सुस्थितीत आहे. कुठेही दुरावस्था झाली नाही आणि आज सुद्धा लढाई साठी सुसज्ज आहे.
पुढील पॉईट होता सेंट पॉल चर्च आणि दुसर्या एका चर्चला रूपांतरित केलेले आधुनिक संग्रहालय. पण शेवटी दिवचे मुख्य आकर्षण म्हणजे समुद्र किनारा. तिथे फेरफटका मारण्यासाठी आम्ही गेलो. माफक गर्दी… सूर्य मावळतीचे क्षण… समोर अथांग सागर… कोणी आराम करतोय… काही वेलेंटाइन साजरा करण्यात मशगुल… कोणी फक्त मोजक्या क्षणांचा आस्वाद घेतोय… बाजूला इंग्रजी मध्ये दिव असे लिहिलेले…. कोणी बनाना राईड घेऊन आनंद लुटतयं… तर कोणी डेझर्ट बाईक वर मजेत फिरतयं… आसपासचे वातावरण जर मजेत आणि सुखी असेल तर आपण सुद्धा आनंदी होतो. आम्ही सागर किनारी वाळूत फिरून चालण्याची मजा लुटली. मग फुटबॉल कम व्हॉलीबॉल कम क्रिकेट असा सरमिसळ खेळ खेळला. त्या सोबत वाळू वर नाव लिहिण्या सारखे नसते उद्योग सुद्धा केले. शेवटी आमच्या प्रयत्नावर सागराने पाणी टाकले. सूर्यास्ताचे मनमोहक दृष्य डोळ्यात साठवून आम्ही तेथून निघालो. २ तास प्रवास करून आम्ही सोमनाथाला हॉटेल वर पोहोचलो.
दिनांक – १५ फेब्रुवारी (गीर नॅशनल पार्क)
जेवढी उत्सुकता मला लहानपणी पहिल्यांदा शाळेची पुस्तक घेण्यासाठी झाली होती किंवा अलीकडे कार घेण्यासाठी उत्सुकता होती तेवढीच उत्सुकता किंबहुना जास्त मला सासण गीर नॅशनल पार्क मध्ये जंगलाच्या राजाला भर जंगलात खुल्या जीप सफारी मध्ये पाहण्याची होती. आम्हाला जीप सफारीचा ९ ते १२ असा ३ तासाचा वेळ दिलेला होता. सफारी बुक करताना जेवढा त्रास मला झाला तेवढा कुठेच प्रवासात झाला नाही. सफारी बुकिंगची सुरुवात सावळ्या गोंधळातून झाली. Girlion.com या वेबसाईट वर पॅरमिट ८०० रुपयाला दाखवत होते आणि दुसर्या ठिकाणी सफारीची ५३०० रुपये किंमत होती. एवढा शुल्क फरक बघून माझे डोळे पांढरे होण्या अगोदर मी गीर स्वागत कक्षास ७-८ वेळेस फोन केला पण त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मी नेहमीचे प्रश्न आणि उत्तर सदरात गेलो आणि माहिती वाचली. ६ लोकां पर्यंत ८०० रुपये फक्त पॅरमिट शुल्क आहे. त्यात गाईड, जीप, कॅमेरा शुल्क अंतर्भूत नव्हते. आम्ही दोघ असल्यामुळे आम्हाला सूट नव्हती. मी ५३०० भरून जीप सफारीचे तिकीट नोंदवले. त्यांना मी स्वागत कक्षात येणार असे सांगीतल्या मुळे त्यांनी १००० रुपये परत केले. तिथे जाऊन मला लक्षात आले की जीप मध्ये आणखी ४ जण जाऊ शकतात तर मी कोणी येणार का याची विचारपूस केली. तेवढेच माझे शुल्क कमी झाले असते पण तिथे मला कोणी भेटले नाही.
एकदाची ओळखपत्र परेड पार पडल्यावर आणि जीप सोबत गाईड दिल्याचे सोपस्कार पार पाडल्या नंतर आमची सफारी सुरु झाली. १ किमी वर परत पॅरमिटची फेरतपासणी झाली आणि आम्ही गीर मध्ये प्रवेश केला. सफारीचा पहिला तास मी एवढा सतर्क होतो की जंगलात झाडाचा आवाज जरी झाला तरी मला सिंह येत असल्याचा भास होत होता. गाईडने सुद्धा जंगलाच्या राजाचे दर्शन होणार याचे आश्वासन दिले. पण पहिल्या अर्ध्या तासात सिंहिण आणि सिंहिणीच्या बछडे यांच्या पावलाचे ठशे तेवढेच बघायला भेटले. बाकी हरण मुबलक प्रमाणात होती. १-२ दुचाकी समोरून येत होत्या तर मी गॉईडला हटकले तर त्यांनी सांगीतले की, आज ही जंगलात आदिवासी लोक राहतात आणि त्यांचा मुख्य व्यवसाय दुग्धविक्री असून आजूबाजूला ते दूध पुरवठा करतात. त्यांची घरे लाकडाची असतात आणि बाहेर गोठ्यात गाई असतात. मध्येच २ दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दिसल्या. त्यामुळे आमच्या समोरील दोन-तीन जीप सफारी सुद्धा थांबल्या. ही अभयारण्यातील विशेष तज्ञ सिंहाची ठेहळणी करत होती. हे लोक सिंहांचा सुगावा काढून त्यांची आरोग्य तपासणी करतात. गाईड त्यांना विचारात होते कुठे सिंह दिसला का? पण आमच्या नशीबात सिंह काय सिंहाचे नखं सुद्धा दृष्टीत पडले नाही. घड्याळीचा काटा जसा-जसा १०च्या पुढे जात होता तशी आमच्या उत्सुकतेचे रंग फिके पडू लागले. सिंहाची जागा काही इतर प्राणी किंवा पक्षांना भरून काढता आली नाही. तिथे वेगवेगळे पक्षी होते. बहुतेक जसे-जसे ऊन वाढते तसे सिंह जंगलांच्या दुर्गम भागात जातात असे गॉईडने सांगीतले. आमचा भ्रमनिरास झाला. शेवटी भरपूर हरीण, पक्षी, मोर, मगर, पोपट, सुतार पक्षी, घुबड आणि काही माकडे बघून आमची जीप सफारीचा प्रवास संपला. जंगलातून मीटरगेज रेल्वे जाते तेवढी दिसली.पण मला काही आनंद वाटला नाही. मग मी थोडी विचारपूस करून १२ किमी वरील देवालिया नॅशनल पार्कला भेट द्यायचे निश्चित केले. तिकडे गाडीने निघालो. देवालिया नॅशनल पार्क हे बंदिस्त असून तिथे १००% सिंह दिसतोच असी माहिती मिळाली. तिथे ३ वाजता बंदिस्त १४ सीटर(सफारी) गाडीतून फिरवून आणतात असे सांगण्यात आले. ३ वाजायला वेळ होता म्हणून आम्ही काठीयावाडी जेवण करून मस्त १ तास आराम केला. ३ वाजता १५० रुपये शुल्क भरून गाडीत जाऊन बसलो. तर काय ३० मिनिटाच्या सफारीत आम्हाला २ सिंह, भरपूर हरण, मोर, लांडोर आणि शेवटी बंदिस्त केलेले बिबटे सुद्धा दिसले. मग काय DSLR वरचे बटण १०० फोटो क्लिक करूनच थांबले. ४३०० रुपये देऊन पंचतारांकित हॉटेल मध्ये जेवण केले तर त्या भोजना मुळे पोटभर जेवण केल्या सारखे वाटले नाही. त्यामुळे जवळच्या खानावळीत जाऊन १५० रुपयात मनसोक्त भोजन केले आणि त्यात समाधान आणि पोट भरल्याचा आनंद मिळाला. म्हणजे जी गोष्ट ४३०० रुपयात झाली नाही ती फक्त १५० रुपयात झाली. पैश्या मध्ये सर्व आनंद मोजता येत नाही हेच खरे. तिथे सिंहाचे संग्रहालय बघून आम्ही ४ वाजता परत सोमनाथाला पोहोचलो. सोमनाथ मंदिर समुद्र किनार्यावर आहे, तिथे जाऊन एक फेरफटका मारला आणि परत मंदिरात जाऊन सोमनाथाचे दर्शन घेतले. यावेळेस महादेवाच्या आरतीचा पुरे पूर लाभ घेतला. रेल्वेने अहमदाबादला जाण्यासाठी वेरावल या स्थानकात वाट पहात बसलो.
दिनांक – १६ फेब्रुवारी (चलो बडोदे)
आम्ही परत वेरावल हून अहमदाबादला पहाटे ५.४० ला परतलो. तेथून माहिती काढून अक्षरधाम मंदिराकडे निघालो. तेथून मंदिर २८ किमी वर आहे. पण ऑटो रिक्षाने तिथे १ तासात पोहोचलो. उत्कृष्ट, भव्यदिव्य आणि शांत परिसर असलेले मंदिर बघितले. मंदिर पूर्ण बघण्यासाठी २.३० तास लागले आणि तेथील शो साठी ४ तास सुद्धा कमी पडतात. आम्ही शो न बघता परत फिरलो. मंदिर बांधकाम, सजावट आणि ठेवण अति उत्तम आहे. संध्याकाळी सोनेरी झोतात मंदिर आणखी सुंदर दिसत असावे. सुंदर आठवणी घेऊन आम्ही मंदिर सोडले आणि अहमदाबादच्या बिकट ट्रैफिक मध्ये अडकलो. मला परत मंदिरातून अहमदाबादच्या स्थानकात जाण्यासाठी २ तास लागले. अहमदाबादच्या बसस्थानकातून बडौदाला पोहोचण्यासाठी २ तास लागले. शेवटी हॉटेलवरती जाऊन ताजातवाना होऊन लक्ष्मी विलास पॅलेसला भेट दिली.अबब! प्रवेश शुल्क २२५ रुपये पॅलेसला साठी होते. पण पॅलेस कमीत कमी एकदा बघण्या सारखा आहे. भव्य हा शब्द कमी पडेल असा लक्ष्मी विलास पॅलेस आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते तुम्हाला एक टेप रेकॉर्डर देतात त्यात सगळी माहिती आहे आणि त्यावर जवळपास १२ पॉइंटची सविस्तर माहिती सांगितली आहे. त्यामुळे विशेष गाईडची गरज नव्हती. त्यात गायकवाड घराण्याची पूर्ण माहिती होती. त्यांच रहाणीमान, त्यांच्या तलवारी, कला दालन, राजेशाही व्यवस्था, त्यांची सौंदर्य दृष्टी आणि लढाईत गाजवलेला पराक्रम आणि रयते साठी केलेली मेहनत सगळ काही त्या रेकॉर्डर मध्ये उपलब्ध आहे. शस्त्र विभागात ‘सामुराई’ तलवार सुद्धा होती तोच भाग मला खुप आवडला. शस्त्र पेलायच्या वजना वरून त्यांच्या शक्तीचा अंदाज येत होता. एका-एका तलवारीचा काय अंदाज होता? वज्रमुठ, लांब, लहान, मोठ्या अशी अनेक प्रकारच्या तलवारी होत्या. त्यात भाले सुद्धा होते. राजांना जर कॉफी प्यायची असेल तर नोकरांना लांबून आणण्यासाठी अर्धा तास लागत असे. राहण्यासाठी ३ माणसे आणि १२० खोल्या होत्या. गार्डन आता पोलो खेळा साठी वापरले जाते आणि पुढील हॉलचा हॉटेल म्हणून उपयोग केला जातो. बाजूला मोठ्या जागेचा उपयोग मोर आणि दुसरे पक्षी ठेवण्यासाठी होतो. खुप मोठा परिसराचा अर्धा भाग पॅलेस ने व्यापला आहे. तेथून सरळ हॉटेल वर जाऊन थोडा आराम केला आणि कविता वाचनाची तयारी केली. कविता कशी सादर करावी हेच एक मोठे कोडे होते. बाहेर जेवण करून परत हॉटेल मध्ये जाऊन दिवसाची विश्रांती घेतली.
दिनांक – १७ फेब्रुवारी (कविता वाचन)
ज्या दिवसाची मी १ महिन्या पासून वाट पाहत होतो तो दिवस उजाडला. दोन्ही हातांनी भरभरून देऊन गेला. सकाळी चहा साठी बाहेर गेलो तर राकेश(मित्र) भेटला त्याचे कविता वाचन रात्री होते. तो पूर्ण कुटुंबा सोबत आला होता. मग तयार होऊन आम्ही सयाजीराव गायकवाड साहित्य नगरीला गेलो आणि कवी कट्टा वर भेट दिली. आता कुठे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आल्या सारखे वाटले. तोच जोश, तोच उन्माद आणि तेच रसरसून कविता वाचन. देव देतो असंख्य हातांनी आणि आपण घेतो दोन हातांनी. एका दिवसात कविता वाचन, कार्यशाळा, विविध ग्रंथदालन भेट, रात्री संगीताचा कार्यक्रम. विविध कार्यक्रमाची लयलूट होती. पण मी आधी ठरवल्या प्रमाणे एक कार्यशाळा, माझे आणि राधाचे कविता वाचन आणि काही कुबेर करांच्या भेटी ह्याच कार्यक्रमाला हजर राहिलो. कथा, कविता आणि निवेदन ही कार्यशाळा उत्तम झाली. या कार्यशाळे साठी निधी पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. निवेदनाचे निवडक विनोदी किस्से सांगीतले. निधी पटवर्धन स्वत: प्राध्यापक असून त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित आहेत. त्यात कार्वालहो(Carvalho) मॅडम नी कविता कशी करावी या विषयावर १ तासाची कार्यशाळा घेतली. काय व्यासंग आहे या मार्गदर्शिकेचा? आम्ही तर थक्क झालो. संत तुकाराम महाराज ते आताच्या कवी पर्यंत त्यांनी माहिती दिली आणि कानांना तृप्त केले. एखाद्या गोष्टीचा व्यासंग, आवड आणि परिपूर्णता हे त्यांच्याकडे बघून जाणवले. मग राधाचे ६.०० वाजता छान कविता वाचन झाले. मग मी जवळपास ७.०० वाजता कविता वाचना साठी बिचकत-बिचकत सुरुवात केली. आणखी चांगले होऊ शकते ही शक्यता धूडकावून मी २ मिनिटातच ठीक-ठाक कविता वाचन करून झाले. आणि तिथे श्रीनिवास खळे यांच्या वर संगीताचा भव्य दिव्य कार्यक्रम चालू होता. तेथून पाय निघत नव्हता पण ९.०० वाजता जेवून करून आम्ही हॉटेलला पोहोचलो. १८ तारखेला सकाळी ११.४० ला सुविधा एक्सप्रेस ने पुण्याकडे प्रयाण केले.दिनांक – १३ फेब्रुवारीप्रकाशचित्र – सोमनाथ मंदिरदिनांक – १४ फेब्रुवारीप्रकाशचित्र – गंगेश्वर महादेव मंदिर
प्रकाशचित्र – आईएनएस खुकरी स्मारक
प्रकाशचित्र – दिव नायडा गुंफा
प्रकाशचित्र – दिव सेंट पाॅल चर्च
प्रकाशचित्र – दिव किल्ला
प्रकाशचित्र – गीर नॅशनल पार्क
प्रकाशचित्र – देवालिया नॅशनल पार्क
प्रकाशचित्र – लक्ष्मी विलास पॅलेस
दिनांक – १७ फेब्रुवारी
प्रकाशचित्र – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – कावि कट्टा
प्रकाशचित्र – श्रीनिवास खळे संगीत कार्यक्रम
Views: 138