चित्रपटा कधी यशस्वी होतो याचे एकमात्र प्रमाण म्हणजे दिग्दर्शक ३ तासात एका जादुई दुनियेत आणि त्याने रचलेल्या कथेत आपल्याला फिरवून आणतो. आणि प्रेक्षक अलगद त्या कथेत मिसळून जातात. कोणते पात्र आपल्याला भावते, कोणाचा राग येतो आणि कोणाला प्रेक्षक द्वेष करतात. प्रेक्षक त्या कथेत स्वतःला शोधतो आणि क्षणभर दुसरे विचार विसरून मनोरंजन करून घेतो. यातच दिग्दर्शन त्यांच्या कार्यात यशस्वी होतो. या सर्व कसोटीवर ‘प्रशांत नील’ खरे उतरतात. खरे तर सिक्वेल हे पहिल्या चित्रपटाच्या कसोटीवर आणि एक पायरी चढून जाणे जमत नाही. पण ‘प्रशांत नील’ हा दिग्दर्शक यावर मात करून एक पायरी नाहीतर दहा पायर्या चढून वर जातो. एका गॅंगस्टर कथेत आईला दिलेले वचन हा भावनिक दृष्टिकोण देऊन दिग्दर्शक थेट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतो. याच ठिकाणी हीरो फक्त पैसे कमावण्याच्या दृष्टीने मारधाड करतो असे दाखवले असते तर हा चित्रपट प्रेक्षकांना भिडला आणि भावला नसता. आईला दिलेले वचन रॉकी कसे पूर्ण करतो यावरच पूर्ण चित्रपट आहे. कथेला पूर्ण न्याय देऊन दिग्दर्शकाने आपली दिग्दर्शकीय उत्कृष्ट कसब दाखवली आहे. पुढील काही वर्षात हा दिग्दर्शक भारतीय चित्रपट सृष्टी वर राज करणार आहे. काही दृश्य तर अफलातून आहेत. चित्रपटातील काही दृश्यांना तोडच नाही. प्रशांतची खासियत म्हणजे भावनिक आणि अॅक्शन यांचे उत्तम संतुलन. खतरनाक अॅक्शन सोबत काळजाला भिडणारे कथानक पाहताना मजा येते. सुरुवात आणि शेवट एकाच उंचीवर नेऊन समतोल साधला आहे. त्यामुळे कथा कर्कश वाटत नाही. कथेला उत्तम गती देऊन, मुख्य आणि सह कलाकारांना योग्य पद्धतीने कथेत प्रस्थापित करताना कथेला कुठेही धक्का लागणार नाही. याची काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. काही दृश्यांना योग्य रित्या खुलवून आणि काहींना लगेच संपून परिणामकारकता साधली आहे. शेवटच्या अर्ध्या तासात चित्रपट आपली खरी ताकत दाखवतो. कथा शेवट पर्यंत कधी कोणत्या वेळेस नागमोडी वळण घेईल सांगता येत नाही. चित्रपट रेटिंग मधील 1 स्टार तर कथेला देणे अति गरजेचे आहे.
गाणे चित्रपटाला साजेसे असे आहेत. ‘तूफान’, ‘सुलतान’, ‘फलक तू गरज तू’, ‘मेहबूबा’ या पैकी 2 उडत्या चालीचे आणि 2 मधुर गाणे आहेत. यात सुद्धा समतोल. बॅकग्राऊंड स्कोर साठी एकदा ‘रवी बसरूर’ यांचे मन:पूर्वक अभिनंदन करावे लागेल. बॅकग्राऊंड स्कोर हॉलीवुड पातळी पेक्षा जबरदस्त आहे. पण कधी प्रत्येक वाक्याला बॅकग्राऊंड चा अति वापर कंटाळवाणा आहे. मात्र चित्रपटात पार्श्वसंगीताचा वापर अत्यंत प्रभावीपणे केला आहे. बर्याच मान्यवर चित्रपटाच्या पार्श्वसंगीताला टक्कर देण्याचे काम रवी बसरूर करतात. चित्रपटा मधील 1 स्टार तर पार्श्वसंगीतालाच जातो.
केजीएफ फ्रेंचायझी म्हणजे सर्वस्वी रॉकीभाईचा अड्डा. भाईचा हटके स्वॅग, भाईचे जबरदस्त स्टाइल, थांबण्याचा, बसण्याचा, बोलण्याचा अंदाज, भाईचे दमदार संवाद, भाईची स्वत:च्या जिवावर उदार होऊन दुसर्यांची जीवघेणी खतरनाक मारधाड, भाईची विरोधकांना पाणी पाजणारी हुशारी, रॉकीचे आईला दिलेले वचन, ते वचन पूर्ण करण्यासाठी वेचलेले आयुष्य, भाईची गोड आणि सुंदर मैत्रीण, याच गोष्टी चित्रपटाच्या भोवती फिरत अविभाज्य भाग बनून राहतात. सगळा चित्रपट यश च्या अवतीभोवतीच फिरतो. संवादाची फटकेबाजी, अॅक्शनचा तडका, आणि सोबत कॉमेडी थोडा वापर करून वरुण माल मसाला टाकून हे समीकरण घट्ट बनते. रॉकीभाईने हा चित्रपट समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलला आहे. रॉकी पात्र थेट आपल्या हृदयात उतरते. त्यासाठी त्याला चित्रपटा मधील एक महत्वपूर्ण 1 स्टार देणे प्रेक्षकांची जबाबदारी आहे.
संजय दत्त ने साकारलेला ‘अधिरा’ आणि रविना टंडन ने साकारलेली ‘रमिका सेन’ अतिशय प्रभावी आहेत. ‘अधिरा’ खुनसी, चलाख, आणि क्रूर आहे. संजय दत्त ही भूमिका साकारून खलनायक ल जिवंत केले आहे. रॉकी आणि अधिरा मधील संघर्ष आणि अॅक्शन अत्यंत उत्कंठावर्धक आहे. मला असे वाटते की आणखी थोडा वेळ संजय दत्तला द्यायला पाहिजे होता. रविनाने जबरदस्त पंतप्रधानाची भूमिका साकारून भूमिकेला न्याय दिला आहे. रविनाने छोट्या भूमिकेत भाव खाऊन जाते. श्रीनिधी शेट्टीने रीनाची भूमिका वठवली आहे. श्रीनिधीने भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. पण पहिल्या भागात तिचे वागणे खटकते. केजीएफ चॅप्टर 1 पेक्षा तिची भूमिका मोठी आहे. तरल भावनांचे हळुवार प्रेम रॉकी आणि रीना मध्ये फुलत जाते. इतर सह कलाकारांनी अतिशय उत्तम साथ दिली आहे. प्रत्येक सह कलाकाराची भूमिका लक्षात राहील अशीच आहे.
या चित्रपटात तुफानी संवादाची रेलचेल आहे. संवाद अतिशय तडाखेबाज, खुषखुशीत, आणि तर्रेबाज आहेत. छायांकन(Cinematography) विषयी तर काहीच बोलणे नाही. छायांकन जबराट आहे. ब्लॅक व्हाइट या दोन रंगाचा अतिशय प्रभावी वापर या सिनेमात केला आहे. असा वेगळा विचार हॉलीवुड पट 300 मध्ये आहे. छायांकन औथेंटिक आहे. क्लास अॅक्शन sequence हे तर चित्रपटाचा जीव आहेत. सर्वात उत्तम म्हणजे चित्रपटाची संपादन (editing) अतिशय धारदार आणि उत्कृष्ट आहे. निर्मिती मूल्य सुद्धा उच्चतम आहे. तरी पण केजीएफ चॅप्टर1 प्रमाणे भावनिक समतोल कमी आहे. सह कलाकाराची आणि चित्रपट मूल्य साठी चित्रपटा मधील एक महत्त्वाचा १ स्टार देतो.
रॉकीभाईचा जलवा, अधिराचा खलनायक, रविनाची रमिका, रीनाची गोड प्रेयशी, उत्कृष्ट निर्मिती मूल्य, दमदार आणि जबरदस्त संपादन (editing), क्लास अॅक्शन sequence, कथा, पटकथेतील नाविन्य आणि प्रभावी मांडणी, तडाखेबाज संवाद, शेवटच्या अर्ध्या तासातील वेगवान वळणाची कथा, जबरदस्त आणि तुफानी शेवट, स्टंट, डिझाइन, आर्ट आणि साऊंड विभाग, ट्विस्ट आणि टर्न कथा, सुंदर छायांकन (cinematography), प्रेक्षकांना मजबूत मनोरंजन करणारा, या सगळ्यांना एका वेगळ्या ऊंचीवर घेऊन जाणारा आणि एकूण एक जबरदस्त चित्रपट मुल्ये त्यासाठी मी चित्रपटाला देतो ५ पैकी ४ स्टार. हा चित्रपट एकदाच काय 2-3 वेळेस बघायला हरकत नाही. केजीएफ चॅप्टर 2 नावाचे वादळ बॉक्स ऑफिस वर थांबणे कठीण आहे. प्रेक्षकांना नवनवीन कन्सेप्ट आवडत आहेत यातच सगळे आले.